आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:हिंगोलीत वाहनांविरुध्द कारवाईच्या मोहिमेत विना नंबरची 70 पेक्षा अधिक वाहने पकडली, वाहतुक शाखेकडून कारवाई सुरु

हिंगोली19 दिवसांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक
  • वाहन चालकांनी कागदपत्रे सोबत बाळगावीत

हिंगोली शहरात विना नंबरच्या वाहनांवर कारवाईची मोहिम हाती घेण्यात आली असून या मोहिमेत शनिवारी ता. ४ अवघ्या दोन तासात ७० वाहने पकडण्यात आली आहेत. हि सर्व वाहने वाहतुक शाखेत आणण्यात आली आहेत. नुतन पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम पाटील यांनी पहिल्याच दिवशी वाहन चालकांना चांगलाच दणका दिला आहे. हिंगोली शहरात मागील काही दिवसांपासून वाहतुक नियमांचे उल्लंघन करून भरधाव वेगाने वाहने चालवली जात होती. विशेष म्हणजे काही वाहनांवर नंबर नाही तर काही ठिकाणी दादा, मामा, भाऊ अशा स्वरुपाची नंबर प्लेट तयार करण्यात आली होती. दरम्यान, दोन दिवसांपुर्वीच शहरातील खुराणा पेट्रोल पंपा जवळ एका व्यक्तीचे २.८० लाख रुपये पळविले. यावेळी चोरटे विना क्रमांकाच्या दुचाकीवर होते. त्यामुळे चोरट्यांचा माग काढणे कठीण झाले आहे.

त्यानंतर पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांनी विना क्रमांकाच्या वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश वाहतुक शाखेला दिले. त्यानुसार आज सकाळीच वाहतुक शाखेचे निरीक्षक चंद्रशेखर कदम पाटील, जमादार फुलाजी सावळे, बळीराम शिंदे, रावसाहेब घुमनर, गजानन राठोड, गजानन सांगळे, किरण चव्हाण, शिवाजी पारीसकर, अमित मोडक यांच्या पथकाने इंदिरा गांधी चौक, महात्मा गांधी चौकात वाहन तपासणी मोहिम सुरु केली. अचानक सुरु केलेल्या या मोहिमेत अवघ्या दोन तासात तब्बल ७० वाहने पकडली. यामध्ये काही वाहनांवर नंबर नव्हते तर काही वाहनांवर फॅन्सी नंबर टाकण्यात आल्याचे दिसून आले.

सदरील वाहने ताब्यात घेऊन वाहतुक शाखेत आणण्यात आली असून वाहन चालकांनी उपप्रादेशीक परिवहन कार्यालयात वाहनाची नोंदणी केल्याची कागदपत्रे दाखविल्यानंतरच दंडात्मक कारवाई करून वाहन सोडले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

वाहन चालकांनी कागदपत्रे सोबत बाळगावीत : चंद्रशेखर कदम पाटील
हिंगोली शहरातील वाहतुक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. वाहन चालकांनी तातडीने वाहनांची नोंदणी करून नियमानुसार वाहनांवर नंबर टाकावेत. तसेच वाहन चालवितांना वाहन चालविण्याचा परवाना, कागदपत्रे सोबत बाळगावीत. सदर मोहिम यापुढेही सुरुच राहणार आहे.

बातम्या आणखी आहेत...