आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा आरक्षण:राज्यात सत्ताधारी-विरोधक माझं-तुझं करण्यातच व्यग्र, खासदार छत्रपती संभाजीराजे यांचा आरोप

नांदेड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • घटनादुरुस्ती की पुनर्विचार याचिका या पर्यायावर विचार होणे अत्यंत गरजेचे

सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक माझं-तुझं करत एक-दुसऱ्याला दोष देत आहेत. मात्र, मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मिळावे यासाठी ते एकत्रितपणे प्रयत्न करीत नाहीत. यातून मार्ग काढण्याबाबत कोणीही बोलत नसल्याचा आरोप खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केला.

मराठा आरक्षणाच्या संदर्भात समाजाच्या भावना जाणून घेण्यासाठी तसेच पुढील पर्याय काय, याबाबत समाजबांधव, तज्ज्ञ, यांच्यासोबत चर्चा करण्याच्या अनुषंगाने खासदार छत्रपती संभाजीराजे मंगळवारी नांदेड दौऱ्यावर आले होते. दरम्यान, त्यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, मराठा आरक्षणाचा विषय हा कुण्या एका राजकीय पक्षाचा किंवा गटाचा नाही, तर तो समाजाचा प्रश्न आहे. सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्रितपणे हा प्रश्न मार्गी लावला पाहिजे. परंतु, दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. मराठा आरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी राज्यातील सर्व खासदार-आमदारांची आहे. मराठा आरक्षण प्रश्नावर मी चुका काढण्यासाठी नाही तर पर्याय काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

घटनादुरुस्ती की पुनर्विचार याचिका या पर्यायावर विचार होणे अत्यंत गरजेचे आहे. राज्यात निघालेल्या ५८ मोर्चांमधून मराठा समाजाच्या भावना सर्वांपर्यंत पोहोचलेल्या आहेत. यापुढे समाजाला वेठीस धरून आंदोलने केली जाऊ नये, अशी आमची भूमिका आहे. मात्र, आरक्षणासाठी लढा हा सुरूच राहील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह कायदेतज्ज्ञांशी चर्चा करणार आहे. त्यानंतर २७ किंवा २८ रोजी पुढील निर्णय घेण्यात येईल, असेही खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले.

गिरीश कुबेर यांचा निषेध
ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांनी त्यांच्या पुस्तकात संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह लिखाण केले आहे. राज्य सरकारने जबाबदारी घेऊन यावर बंदी आणावी. महाराष्ट्राने त्यांचा धिक्कार केला पाहिजे. महाराष्ट्रात त्यांना फिरकू देणार नाही. ते असं कसं लिहू शकतात, असा प्रश्न उपस्थित करत “गो बॅक कुबेर’, म्हणत खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी निषेध केला.

बातम्या आणखी आहेत...