आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छत्रपती संभाजी राजेंनी घेतली फडणवीस यांची भेट:प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले, सर्वच बहुजन समाजाचे नेतृत्व करणार

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांनी समाजातील सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी काम केले. त्यांनी सर्व समाजासाठी काम केले आहे, त्यामुळे माझे नेतृत्व देखील सर्वांसाठी असेल. पुढील काळातही सर्वांचेच नेतृत्व करण्याची तयारी असल्याचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले. त्यांच्या खासदारकीच्या सहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. या निमित्ताने त्यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आपली ही भेट केवळ आभार व्यक्त करण्यासाठी होती, असे त्यांनी प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना सांगितले.

राज्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर मोर्चे निघत असताना भारतीय जनता पक्षाच्या वतीने छत्रपती संभाजीराजे यांना राज्यसभेत खासदारकी देण्यात आली होती. मात्र, आता त्यांचा कार्यकाळ संपला आहे. मधल्या काळामध्ये खासदारकीमुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात काम करण्याची संधी मिळाली, त्यामुळे खासदारकी दिल्याबद्दल फडणवीस यांना भेटून आपण आभार मानले असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले.

नवीन पक्ष स्थापनेची चर्चा

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी आंदोलन केले होते. मात्र, राज्य सरकारच्या वतीने या आंदोलनाला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. किंबहुना आंदोलनामुळे राज्य सरकारने संभाजीराजेंना दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. त्यामुळे आता संभाजीराजे छत्रपती काय निर्णय घेतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. आगामी काळात ते स्वतःचा पक्ष स्थापन करण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे

12 तारखेला बोलवली बैठक

खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी 12 तारखेला समर्थकांची बैठक बोलवली आहे. त्यामुळे या बैठकीमध्ये कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माझे नेतृत्व हे सर्व समाजासाठी असून ओबीसी समाजालाही आरक्षण मिळाले पाहिजे, यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले.

महाविकास आघाडी कडून खासदारकी

राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारकडून छत्रपती संभाजीराजे यांना खासदारकी देण्याची चर्चा सुरू आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील संकेत दिले होते. मात्र यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर संभाजीराजांनी कोणतेही उत्तर दिले नाही. माझी भूमिका मी 12 तारखेला स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपसाठी छत्रपतींची भूमिका महत्त्वाची

राज्यातील मराठा समाजातील आंदोलन हे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच दिसून आले. मुख्यमंत्रीपदी मराठेतर चेहरा असल्यामुळे मराठा समाजासाठी छत्रपती संभाजीराजे भाजपसोबत असल्यास त्याचा फायदा पक्षाला होऊ शकतो. त्यामुळे छत्रपती संभाजीराजे यांच्या भूमिकेकडे भाजपचे देखील लक्ष असेल.

बातम्या आणखी आहेत...