आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा:एमपीएससी पूर्वपरीक्षा तिसऱ्यांदा लांबली; पुढच्या वेळी ठरलेल्या तारखेलाच परीक्षा, नवी तारीख आयोग लवकर जाहीर करणार

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून रविवारी (११ आॅक्टोबर) होणारी एमपीएससी पूर्वपरीक्षा अखेर रद्द करण्यात आली आहे. पुढची नवी तारीख आयोग लवकरच जाहीर करेल. या परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना पुढे नव्याने जाहीर होणाऱ्या परीक्षेस बसता येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दिली.

मराठा समाजाच्या संघटनांकडून ही परीक्षा रद्द करण्यासाठी सातत्याने मागणी करण्यात येत होती. त्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ मंत्र्यांची सह्याद्री अतिथिगृहावर शुक्रवारी दुपारी बैठक बोलावली हाेती.

मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात अजूनही कोरोनाचा संसर्ग आहे. त्यामुळे आपण रविवार, ११ आॅक्टोबरची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) पूर्वपरीक्षा रद्द करत आहोत. नवी तारीख लोकसेवा आयोग लवकरच जाहीर करेल. ही परीक्षा यापूर्वी दोन वेळा रद्द झाली आहे. आता जी नवी तारीख निश्चित होईल, त्यानुसार मात्र परीक्षा पार पडेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

आरक्षण व परीक्षा रद्दचा संबंध नाही : सरकार
1
. मराठा समाजाच्या नेत्यांची व संघटनांची एमपीएससी परीक्षा रद्द करण्याची आग्रही मागणी होती. त्यावर सरकारने सकारात्मक निर्णय घेतल्याचे राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.
2. मराठा आरक्षणाचा व परीक्षा रद्द करण्याचा काही संबंध नाही. कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन परीक्षा रद्द केली, असे एसईबीसी आरक्षण उपसमिती अध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले.
3. भुजबळ व वडेट्टीवार हे मंत्री व अॅड. प्रकाश आंबेडकरांसह काही मराठा संघटना - परीक्षार्थींनी मात्र एमपीएससीसी पूर्वपरीक्षा नियोजित वेळेपत्रकाप्रमाणे घेण्याची मागणी केली हाेती.

पुढे काय : वय अट गणना दिनांक एप्रिल २०२० हाच
एमपीएससी पूर्वपरीक्षेचा सुधारित कार्यक्रम राज्य लोकसेवा आयोगाकडून स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल. ११ ऑक्टोबर २०२० च्या परीक्षेत प्रवेशपत्र देण्यात आलेल्या सर्व उमेदवारांना सुधारित दिनांकाच्या परीक्षेत बसता येईल. म्हणजे जाहिरातीनुसार वयोमर्यादा गणण्याचा दिनांक १ एप्रिल २०२० हाच कायम राहील.

या पदांसाठी होणार होती एमपीएससीची पूर्वपरीक्षा
राज्य सेवेतील विविध २०० पदांच्या भरतीसाठी राज्यसेवेची ही पूर्वपरीक्षा घेतली जाणार आहे. त्यात नायब तहसीलदार, सहायक विक्रीकर आयुक्त, पोलिस उपअधीक्षक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, उपशिक्षणाधिकारी, कक्ष अधिकारी, सहायक आयुक्त अशी पदे आहेत. ११ ऑक्टोबरला राज्यातील ३७ केंद्रांवर ही परीक्षा होणार होती.

इतर परीक्षांना शिवसेनेचा होता विरोध : शिवसेनेने यापूर्वी विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या तसेच जेईई, नीट परीक्षांना विरोध केला होता. त्यामुळे केंद्र व महाराष्ट्र सरकारमध्ये वाद झाले होते त्यामुळे शिवसेनेला आज परीक्षा न घेण्याचा निर्णय घ्यावा लागला, असे सेनेतील सूत्रांनी सांगितले.

ओबीसी आरक्षण कायम राहील; प्रश्न सोडवण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना : मुख्यमंत्री
ओबीसी समाजाचे प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दिली. ओबीसी समाज शिष्टमंडळांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते. ओबीसी समाजाचे आरक्षण कमी होणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले, ओबीसी समाजाच्या मागण्या, प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापन केली जाईल. या समितीने ओबीसी मागण्यांचा साकल्याने विचार करावा. निर्णयांची प्रक्रिया गतिमान करावी. याच पद्धतीने निधीसाठीही मागणी करताना प्राधान्याने हाती घ्यावयाची कामे निश्चित करावीत.

कारण काेरोनाचे, मात्र रेटा मराठा समाजाचा
मुख्यमंत्र्यांनी जरी कोरोना स्थितीचे कारण पुढे केले असले तरी मराठा समाजाच्या संघटना, त्यातही खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासमोर सरकारने परीक्षा रद्द करण्यासंदर्भात नमते घेतल्याचे शुक्रवारच्या निर्णयाने अधोरेखित झाले आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser