आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येत्या 14 मार्चला होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाविरोधात राज्यात एमपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी आक्रमक झाले. यानंतर पुण्यासह राज्यातील अनेक शहरांमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाद्वारे संवाद साधला यावेळी त्यांनी मोठी घोषणा करत येत्या आठवडाभरात परीक्षा होणार असल्याचे सांगितले आहे.
राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलल्यानंतर राज्यभरातील हजारो-लाखो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. पुण्यात विद्यार्थ्यांच्या आंदोलनावेळी पोलिसांनी विद्यार्थ्यांवर सौम्य लाठीमारही केला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लाइव्ह येत येत्या आठवडाभरात परीक्षा होणार असल्याचे सांगितले. तसेच, शुक्रवारी या परीक्षेची नवीन तारीख जाहीर होईल, असेही ते म्हणाले.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, 'मी नेहमी रविवारी बोलतो पण, आज राज्यात तयार झालेल्या वातावरणामुळे आज बोलावं लागत आहे. गेल्यावर्षी दिवाळीआधी या परीक्षांची तारीख जाहीर झाली होती. नंतर आपण ती पुढे ढकलली. ती पुढे ढकलल्यानंतर सांगितले होते, या पुढे जी तारीख जाहीर होईल तेव्हा ती कोणत्याही कारणाने पुढे ढकलली जाणार नाही. तशी ती तारीख या 14 मार्चला जाहीर झाली. आता परत ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली. मी जाणतो की, विद्यार्थी अनेक दिवसांपासून परिश्रम करुन अभ्यास करत आहेत.'
'ही परीक्षा काही दिवसांसाठी पुढे ढकलली आहे. मी स्वत: मुख्य सचिवांना आणि एमपीएससीच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. परीक्षेची तारीख पुढच्या आठ दिवसातीलच असणार आहे. त्यामुळे, उगाच कुणी भडकवतोय म्हणून भडकून जाऊ नका. आपला अभ्यास सुरु ठेवा. मी तुम्हाला वचन देतो की, येत्या आठवड्याभरात परीक्षा होईल.'
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, 'परीक्षा पुढे ढकलण्यामागे फक्त कोरोना हेच कारण आहे. तुम्हाला माहिती असेल की या परीक्षेला संपूर्ण शासकीय यंत्रणा लागते. त्यासाठी कर्मचाऱ्यांची तयारी करुन घ्यावी लागणार आहे. कोरोनाचा राक्षस पुन्हा डोके वर काढतोय. त्यामुळे जे कर्मचारी परीक्षेसाठी काम करणार आहेत त्यांची टेस्ट केली जाणे महत्त्वाचे आहे. ज्यांना लस दिली गेली तेच कर्मचारी यासाठी काम करतील, असा माझा आग्रहच नाही तर सूचना आहे. विद्यार्थी परीक्षेत आल्यानंतर कोणत्याही दडपणात राहू नयेत, अशी सरकारची भूमिका आहे.'
'परीक्षाचे केंद्र प्रतिबंधात्मक क्षेत्रात असेल तर आपला प्लान बी काय असेल, आपण परीक्षा कुठे घेऊ शकतो याबाबत निर्णय घेणे गरजेचे आहे. बंदिस्त खोलीत जास्त वेळ राहणे धोकादायक आहे. मला कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या भावनांशी आणि आरोग्याशी खेळायचे नाही. महाराष्ट्रातील विद्यार्थी निरोगी असले पाहिजेत. या सर्व गोष्टींची खबरदारी घेऊन पुढच्या आठवड्यात परीक्षा होणार आहे,'असेही मुख्यमंत्री म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.