आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:कुरुंदा येथील दोन सांगाडे प्रकरणात तब्बल आठ वर्षानंतर खूनाचा गुन्हा दाखल, सांगड्याची हाडे फ्रॅक्चर असल्याचा अहवाल

हिंगोली18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2012 मध्ये पाण्याच्या टाकीत दोन मानवी सांगाडे आढळून आले होते

वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील पाण्याच्या टाकीत सापडेलल्या दोन सांगाड्यांची हाडे फ्रॅक्चर असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अखेर तब्बल आठ वर्षानंतर अज्ञात व्यक्ती विरुध्द कुरुंदा पोलिस ठाण्यात गुरुवारी ता. १८ पहाटे खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील ३३ केव्ही उपकेंद्राच्या पाठीमागे असलेल्या न वापरल्या जात असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ ता. १४ नोव्हेंबर २०१२ रोजी काही मुले क्रिकेट खेळत होती. त्यांचा चेंडू पाण्याच्या टाकीत गेल्यानंतर काही मुले पाण्याच्या टाकीवर गेली असता टाकीत दोन मानवी सांगाडे आढळून आले होते. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर कुरुंदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. याप्रकरणी कुरुंदा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली होती.

दरम्यान, अधिक तपासामध्ये गावातील साईनाथ पुंजाजी इंगोले (२५) हे बेपत्ता असल्याने एक मृतदेह साईनाथ इंगोले यांचा असल्याचे स्पष्ट झाले तर दुसरा मृतदेह कोणाचा हे स्पष्ट झाले नाही. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळावरील सांगाड्याचे काही नमुने तपासणीसाठी अंबाजोगाई येथील वैद्यकिय महाविद्यालयात पाठविले होते. त्यानंतर एक सांगाडा पुरुषाचा तर एक सांगाडा महिलेचा असून दोघांच्या सांगाड्याची काही हाडे फॅक्चर असल्याचेही अहवालात नमुद केले होते. त्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी गावांतूनच काही माहिती घेण्याचा प्रयत्न चालविला होता.

दरम्यान, आंबाजोगाई वैद्यकिय महाविद्यालच्या अहवालावरून कुरुंदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गोपीनवार यांनी सरकारतर्फे आज तक्रार दाखल केली. यामध्ये साईनाथ इंगोले व एका महिलेस मारहाण करून त्यांचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह न वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या टाकीत फेकून दिल्याचे नमुद केले. मयत साईनाथ इंगोले यांच्या कवटीला व फासळीला फ्रॅक्चर झाले तर महिलेच्या खांद्यावर मारून त्यांचे हाड फॅक्चर केल्याचे तक्रारीत नमुद केले. त्यावरून अज्ञात व्यक्ती विरुध्द कुरुंदा पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे, उपाधिक्षक वसीम हाश्‍मी, सहाय्यक पोलिस निरीक्षक गोपीनवार यांनी या प्रकरणात तपास सुरु केला आहे.

बातम्या आणखी आहेत...