आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देश मेला तरी चालेल ही भाजपची रणनीती:काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा हल्लाबोल; गुजरातमधील पराभवाचे आत्मपरीक्षण करू

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देश मेला तरी चालेल पण राज्य कसे जिंकता येईल ही भाजपची रणनीती आहे, हे पाप काँग्रेसच कधीच करणार नाही, असे म्हणत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर हल्लाबोल केला. गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचे कौल समोर येत असताना नाना पटोले यांनी ही प्रतिक्रिया दिली.

पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले की, काँग्रेसची भूमिका संविधान सुरक्षित करणे ही आहे, निवडणुका येतील जातील पण त्यापेक्षा देश वाचवणे हा संकल्प घेऊन राहुल गांधी भारत जोडोसाठी निघाले आहेत. भाजपला जनमताचे काही देणे घेणे नाही. कर्नाटक आणि मध्यप्रदेशमध्ये जनतेने काँग्रेसला बहुमत दिले होते. पण भाजप तिने घुसखोरी करून त्यांची सत्ता स्थापन केली.

हिमाचलमध्ये सत्ता येणार

हिमाचलमध्ये कौल हा काँग्रेसला पाहायला मिळतोय आणि काँग्रेसचीच सत्ता स्थापन होणार, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला. गुजरात हा आता 'उडता गुजरात' झाला आहे. गुजरातमध्ये तरुणांचा कल हा ड्रग्जकडे वळाला आहे, गुजरातचे निकाल जरी भाजपाच्या बाजूने आज दिसत असले तरी ते लोकशाहीने नव्हे, तर दबावतंत्राच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत. गुजरातमध्ये खरी परिस्थिती भयावह आहे. आमच्याकडे जे काही रिपोर्ट आले आहेत ते धक्कादायक आहेत. तिथे तरुणांना व्यसनाधीन आणि ड्रग्जच्या आहारी नेण्याचे पाप भाजपा करत आहेत. जसे उडता पंजाब आपण पाहिले तसे उडता गुजरात झाले आहे", असे नाना पटोले म्हणाले.

पराभवाचे आत्मपरिक्षण करू

गुजरातच्या जनतेने कौल दिला आहे. आम्ही आमच्या पराभवाचे आत्मपरिक्षण करू. गुजरातमध्ये भाजपाचे दबावतंत्र चालले असले तरी हिमाचलमध्ये दबावतंत्र चाललेले नाही. काँग्रेसला तिथे चांगले यश मिळत आहे. तिथे आमचेच सरकार स्थापन होईल", असेही नाना पटोले म्हणाले.

जमीन कशाच्या आधारावर दिली?

धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी भाजप सरकारने 5 हजार कोटी रुपयांची शेकडो एकर जमीन एका उद्योगपतीच्या घशात घातल्याचा आरोपही नाना पटोले यांनी बुधवारी केला. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात या प्रश्नावर शिंदे-फडणवीस सरकारकडून उत्तर मागितले जाणार असल्याचेही ते म्हणाले. धारावी प्रकल्पासाठी कोणती निविदा प्रक्रिया स्वीकारण्यात आली? एवढी मौल्यवान जमीन कशाच्या आधारावर दिली? राज्य आणि केंद्र सरकारने अचानक ही प्रक्रिया कशी राबवली? धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी दुबईच्या सी-लिंकने 7,500 कोटी रुपयांची निविदा सादर केली होती. परंतु नंतर सरकारने ती रद्द केली. महाराष्ट्र सरकारने रेल्वेच्या जमिनीसाठी 700 कोटी रुपये दिले होते, मात्र त्यावेळी रेल्वेने महाराष्ट्र सरकारला जमीन दिली नाही.

मुंबई लुटण्याचा प्रयत्न

या उद्योगपतीला जमीन देऊन भाजपने एकप्रकारे मुंबईला लुटण्याचा प्रयत्न केला असल्याचे पटोले म्हणाले. केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार उद्योगपतींच्या हितासाठी सर्व काही करत आहे. धारावीचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असून येत्या 17 मार्च रोजी होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीत धारावीच्या प्रश्नावर चर्चा करणार आहोत. राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता, शिंदे-फडणवीस सरकार हे महाराष्ट्रातील आतापर्यंतचे सर्वात वाईट सरकार असल्याचेही पटोले म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...