आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nanaded | Wedding | Poisoning | Hundred People At A Wedding Meal; Incidents In Kandhar Taluka, Vomiting On Brides

प्रकृती स्थिर:लग्नामधील जेवणातून शंभर जणांना विषबाधा; कंधार तालुक्यातील घटना, वऱ्हाडींना उलट्या

प्रतिनिधी | नांदेड14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील दिग्रस (खु.) येथे एका लग्नसमारंभात नवरदेवासह शंभरपेक्षा अधिक जणांना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना घडली. २२ नोव्हेंबर रोजी हा विवाह समारंभ पार पडला. ४८ तासांनंतर मंगळवारी (ता.२३) सकाळी ७ वाजेपासून नागरिकांना उलट्या, मळमळ, डोकेदुखीचा त्रास सुरू झाला. त्यांच्यावर कंधार उपआरोग्य केंद्रात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे.

नांदेड जिल्ह्यात विवाह समारंभाना सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागात सध्या धूम दिसत आहे. दरम्यान, कंधार तालुक्यातील दिग्रस खु. येथे २२ नोव्हेंबर रोजी सूर्यवंशी आणि मुसांडे यांचा विवाह सोहळा पार पडला. मुखेड येथील वधू असून दिग्रस खु. येथील वर आहे. सूर्यवंशी या वरपक्षाकडे धूमधडाक्यात विवाह सोहळा पार पडला. यानंतर जवळपास ४८ तासांनंतर मंगळवारी सकाळी सात वाजल्यापासून नवरदेवासह नातेवाईक, नागरिकांना उलट्या, मळमळ, जुलाब, डोकेदुखीचा त्रास सुरू झाला.

कंधार येथील उपआरोग्य केंद्रात एक-एक वऱ्हाडी दाखल हाेण्यास सुरुवात झाली. रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य विभागाने गावातच रुग्णवाहिकेची व्यवस्था केली. त्यामुळे ज्याला त्रास होत आहे, तो लगेच दाखल होत आहे. जिल्हा शल्यचिकित्सक निळकंठ भोसीकर यांच्यासह जिल्हा, तालुका प्रशासनातील अधिकारी यांनी भेट दिली आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य केंद्रात नातेवाइकांनी एकच गर्दी केली होती. यावेळी नगरसेवक सुधाकर कांबळे यांनी गर्दी कमी करण्यासाठी आरोग्य प्रशासनाला मदत केली.

तसेच औषध निर्माता यशवंत पदरे यांनी तत्काळ औंषधींचा पुरवठा केला. वधू पक्षाकडील अनेक जण खासगी रुग्णालयात उपचार घेत असून सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे कंधार उपआरोग्य केंद्राच्या वतीने सांगण्यात आले.

नवरदेवावर खासगी रुग्णालयात उपचार
सायंकाळपर्यंत जवळपास १०० जण उपआरोग्य केंद्रात दाखल झाले होते. यात महिला, पुरुष, लहान मुलांचही समावेश आहे. यातील नवरदेवावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, उपकेंद्राचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सूर्यकांत लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. हिरके, डॉ. महेश मोकले, परिचारिका वाघमारे यांनी विषबाधेचे नमुने घेतले असून ते तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत.

बातम्या आणखी आहेत...