आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राणेंना सबुरीचा सल्ला:आता ‘पॅचअप’ यात्रा! मुख्यमंत्री-फडणवीस चर्चेनंतर शिवसेना-भाजप मवाळ; राणे, आपण मंत्री आहात, कुणाच्याही कानाखाली मारायची नाही - सल्ला

रायगड/मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नारायण राणेंना दिल्लीहून फोन; टीकेचा सूर कायम, भाषा नरमली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील आक्षेपार्ह विधानामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले. मात्र जनआशीर्वाद यात्रेवरून जनतेचे लक्ष दुसरीकडे गेल्यामुळे दिल्लीतील भाजप नेतृत्वाने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. आपण केंद्रीय मंत्री असल्याने ‘कुणाच्याही कानाखाली मारायची नाही’ अशा सूचक शब्दांत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने राणेंना सल्ला दिल्यामुळे राजकीय वैर ‘पॅचअप’ करायचे, असे धोरण उभय पक्षांनी स्वीकारलेले दिसत आहे. मुख्यमंत्र्यांवरील कडवट टीकेमुळे शिवसेना-भाजपमध्ये वितुष्ट निर्माण झाले. मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकाही भाजप नेत्याने राणेंच्या ‘त्या’ वक्तव्याचे जाहीर समर्थन केले नव्हते.

राणेंना अटक झाली त्या दिवशीही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील २५ वर्षांच्या युतीचे दाखले देत होते. त्यानंतर शुक्रवारी सह्याद्रीवरील ओबीसी आरक्षणाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि फडणवीस या दोघांमध्ये सुमारे १५ ते २० मिनिटे बंदद्वार चर्चा झाली अन् शनिवारी नाशिकमध्ये शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत शिवसेना-भाजपचे वैचारिक नाते असल्याचे म्हणाले. तर तिकडे तळकोकणातील यात्रेवेळी एका जाहीर सभेत बोलताना राणे यांनीच दिल्लीहून फोन आल्याचे सांगून केंद्रीय नेतृत्वाने सबुरीचा सल्ला दिल्याचे सूचित केले.

नारायण राणेंना दिल्लीहून फोन; टीकेचा सूर कायम, भाषा नरमली
माझी एक सहनशक्ती आहे. माझ्या नेत्यांनी दिल्लीहून परवा फोन केला. राणे आता आपण मंत्री आहात, तेव्हा कुणाच्या कानाखाली नाही मारायचं म्हणाले. मी कानाच्या खाली नाही मारणार, बाकी अवयव आहेत ना ? कोर्टाने पण माझ्याकडून लिहून घेतलं. मला अटक करायला आलेला पोलिस अधीक्षक मी उठून उभा राहताच कापायला लागला. काल पुन्हा दौरा सुरू केला तर भेटायचं आहे म्हणून आमच्या माणसांना सांगायला लागला, असेही राणे या वेळी म्हणाले.

संजय, मग पवार साहेबांचे काय?
‘संजय राऊत राज्यसभेत भेटतो तिथे राणे वेल डन म्हणतो. बाहेर जाऊन टीका का करतो ? असे विचारले असता तो म्हणतो, हे राजकारण आहे. मला अजून कळत नाही तो किती प्रामाणिक आहे. उद्धव ठाकरेंसोबत आहे की पवारांसोबत आहे. मला म्हणतो, राणेजी मी तुमच्या सोबत आहे. मी म्हटले अरे शिवसेनेचं सगळं जमवाजमव तू करतोस, त्यांना सोडून माझ्याबरोबर येणार म्हणतोस. मग पवार साहेबांचं काय?’ अशा शब्दांत राणे यांनी राऊतांवर बोचरी टीका केली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे
जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करून कणकवलीत शुक्रवारी राणे यांची जनआशीर्वाद यात्रा दाखल झाली. त्यांचे स्वागत करण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. तसेच नरडवे नाका येथील शिवसेना कार्यालयात शिवसैनिकांनी गर्दी केली होती. त्यामुळे जिल्ह्यात जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे, शिवसेना आमदार वैभव नाईक, माजी खासदार नीलेश राणे यांच्यासह शिवसेना-भाजपच्या प्रत्येकी ५० ते ६० जणांवर कणकवली,मालवण, कुडाळमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कणकवलीपाठोपाठ देवगडमध्येही शिवसेनेकडून घोषणाबाजी
राणे यांची यात्रा जामसंडे येथून देवगडकडे येत असताना शिवसेना कार्यालयाबाहेर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. कुडाळ येथेही शिवसैनिकांची घोषणाबाजी सुरू होती. मात्र मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त असल्यामुळे अनुचित प्रकार घडला नाही.

बातम्या आणखी आहेत...