आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनआशीर्वाद यात्रा:नारायण राणेंच्या यात्रेचा ‘दौरा’ झाला; बंदोबस्तात चाैपट वाढ, टीका मात्र सुरूच

रायगड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमेश्वरमध्ये अटक आणि महाडमध्ये जामीन मिळाल्यानंतर नारायण राणे यांची स्थगित झालेली जनआशीर्वाद यात्रा आता फक्त केंद्रीय मंत्र्यांच्या दौऱ्यात परिवर्तित करण्यात आली आहे. शुक्रवारपासून राणेंचा रत्नागिरीतून दौरा सुरू झाला. या दौऱ्यासाठी आता चौपट बंदाेबस्त वाढवण्यात आला आहे. तर शिवसेना आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी १४९ च्या नोटिसाही बजावल्या आहेत. दुसरीकडे राणेंची भाषाही आता मवाळ झाली असल्याचे दिसत आहे.

कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात प्रशासनाने मनाई आदेश लागू केला आहे. यामुळे राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेसमोर प्रश्नचिन्ह होते. मात्र केंद्रीय मंत्र्यांच्या दौऱ्याच्या आडून रत्नागिरीत थांबलेली ही यात्रा आता पुढे सरकत आहे. रत्नागिरीत या दौऱ्यातून जन आशीर्वाद यात्रेचा रथ हटवण्यात आला आहे.

चौपट बंदोबस्त : राणेंच्या या दौऱ्यात बंदोबस्त वाढवतानाच राणे ज्या-ज्या ठिकाणी जातील त्या-त्या ठिकाणी २५० पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर शिवसेना, भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाईच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

राणे शुक्रवारी उशिरा सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले. ज्या ठिकाणी राणे जातील तेथे जिल्ह्यातील १५० पोलिस आणि जिल्ह्याबाहेरील १०० पोलिस असा २५० पोलिसांचा ताफा बंदोबस्तासाठी राहणार आहे. यामध्ये एसआरपीएफचे जवान, दंगल नियंत्रण पथक तैनात असणार आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी दिली आहे.

एकेक प्रकरण बाहेर काढेन : एकेक प्रकरण बाहेर काढणार असल्याचे राणे यावेळी म्हणाले. बाळासाहेबांना जेव्हा दहशतवाद्यांकडून धोका होता तेव्हा त्यांना मातोश्री सोडायला सांगितले गेले. तेव्हा साहेबांनी सुपुत्राला सोबत घेतलं नाही. पिंजऱ्यात राहून काम करणारा मुख्यमंत्री पहिल्यांदा पाहिला. हे वर्षावर जाऊन गप्पा मारत बसतात, असा खोचक टोला राणे यांनी लगावला. सुशांतसिह राजपूतची हत्या आणि दिशा सालियानची बलात्कार करून हत्या झाली. त्याचे आरोपी सापडले नाहीत. नारायण राणेच्या मागे लागू नका. नाहीतर मी आता थोडं बोलतोय. सगळं बोलावं लागेल ते परवडणारं नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

भविष्यात आम्हीही सत्तेत येऊ : संजय राऊत आणि विनायक राऊत हे दोघेही माझ्या दृष्टीने वायफळ बडबड करणारे नेते आहेत. संजय राऊतांना त्याचसाठी ठेवलंय. संपादक सोडा त्यांना हे बोलायलाच ठेवलंय. काय तो विनायक राऊत. ते दोन राऊतच शिवसेनेला डुबवणार आहेत. अशी टीका राणे यांनी केली. तर आम्ही काही कायम विरोधी पक्षात राहण्यासाठी आलो नाही. भविष्यात आम्हीही सत्तेत येऊ. त्यामुळे अधिकारी, पोलिसांनी कायद्यात राहून काम करावं. कायद्याच्या बाहेर जाऊन काम कराल तर तुम्हाला कारवाईला सामोरं जावं लागेल, असा इशारा राणेंनी अधिकारी आणि पोलिसांना दिला.

आम्ही भाजपला परवडतोय ना : भाजपची ओरिजिनल आयडॉलॉजी स्वीकारूनच आम्ही पक्षात प्रवेश केला आहे. ओरिजिनल असो काही असो, भाजपला परवडतोय ना आम्ही. मग या बाहेरच्यांचं काय ऐकायचं, असा सवालही त्यांनी केला. पंतप्रधान मोदींच्या परवानगीने ही यात्रा सुरू केली आहे. पुन्हा दिल्लीत गेल्यावर मोदींना अहवाल सादर करणार असल्याचे राणे म्हणाले.

सूर मवाळ हो...
राणेंनी मुख्यमंत्र्यांवर केलेले वक्तव्य आणि त्यानंतरच्या नाट्यात न्यायालयाने घातलेली बंधने पाहता एरवी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीकेचा एककलमी कार्यक्रम राबवणारे राणे आता मवाळ झाले आहेत. या टीकेपेक्षा स्वतःच्या खात्याच्या योजनांसह केंद्राच्या योजनांचे गुणगान ते गाऊ लागले आहेत.

... अन् राणे बोलले!
राणे यांनी रत्नागिरी दौऱ्यादरम्यान ‘मुख्यमंत्र्यांवरील वादग्रस्त विधानाबाबत स्पष्टीकरण दिले. मी कोणताही गुन्हा केलेला नाही. जी घटना घडली ती कायदेशीर नव्हती. सत्तेच्या मस्तीतून ही कारवाई करण्यात आलेली आहे. माझ्या केसेस काढू म्हणता तर मला शाखाप्रमुख, मंत्री ते मुख्यमंत्री का केलात मग?’ असा प्रश्नही त्यांनी शिवसेनेला केला.

बातम्या आणखी आहेत...