आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राणेंचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात:'दादागिरी कराल तर गेल्या 40 वर्षातलं मातोश्रीच्या आतलं-बाहेरचं सगळं बाहेर काढेन'- नारायण राणे

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'बेडूक कोणाल म्हणता ? वाघ होतो म्हणून बाळासाहेबांनी मला मुख्यमंत्री केलं'

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात भाजप नेते नारायण राणे आणि त्यांच्या मुलांना बेडूक आणि बेडकाची पिल्ले, अशा अप्रत्यक्ष शब्दांत टोले लगावले होते. या टीकेला नारायण राणे यांनी सोमवारी मुंबईतील भाजप मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले. 'बेडूक कोणाला म्हणता ? वाघ होतो म्हणून बाळासाहेबांनी मला मुख्यमंत्री केलं. दादागिरी कराल तर गेल्या 40 वर्षातलं मातोश्रीच्या आतलं-बाहेरचं सगळं बाहेर काढेन', असा इशारा नारायण राणेंनी दिला.

यावेळी नारायण राणे म्हणाले की, 'मुख्यमंत्र्यांनी उगाच वाघ असल्याचा आव आणू नये. खालच्या स्तरावरची भाषा वापरू नये. केवळ शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आदर असल्याने मी शांत आहे. दादागिरी केली तर मातोश्रीच्या आतलं आणि बाहेरचं सगळं बाहेर काढेन. मुख्यमंत्र्यांचे कालचे भाषण शिवराळ आणि निर्बुद्ध होते. आजपर्यंत कोणत्याच मुख्यमंत्र्यांनी कधीच असे भाषण केले नव्हते. आजवरच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषण शैलीने आणि विचाराने पदाची आणि महाराष्ट्राची प्रतिष्ठा वाढवली. पण कालच्या भाषणात शिवराळपणा सोडून काय होते? भाषणात कसलाही ताळमेळ नव्हता. आपण काय बोलतो? कुणाबद्दल बोलतो? याचेही भान त्यांना नव्हते', असे राणे म्हणाले.

'कोरोनाच्या काळात उद्धव ठाकरे पिंजऱ्यात होते आत्ता कुठे एका दौऱ्याला बाहेर पडले. हे स्वतःला वाघ म्हणतात. हे पिंजऱ्यातील वाघ आहेत का? सभेत केवळ 47 लोक टाळ्या वाजवायला होते. मी शिवसेनेत होतो, अनेक पदे भुषवली. बाळासाहेब ठाकरेंनी अनेक पदे दिली. मी बेडूक नव्हतो. हे बेडूक आहेत म्हणून त्यांना मुख्यमंत्री केले नाही. बाळासाहेब असते तर त्यांना मुख्यमंत्री केलं नसते. स्वत:ला वाघ समजता कधी कोणाच्या कानफटात तरी मारली का? आम्ही शिवसेना उभी केली. आम्ही शिवसैनिकांनी अंगावर केसेस घेतल्या. तुम्ही नाही घेतल्या. तुम्ही तर शेळपट आहात,' असा घणाघातही राणेंनी केला.

'महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात बुद्धू मुख्यमंत्री बसलाय'

राणे पुढे म्हणाले की, 'उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्रीपदावर बसण्याची लायकी नाही. त्यांना ना अर्थव्यवस्था कळते ना जीडीपी कळतो. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात बुद्धू मुख्यमंत्री बसलाय. त्यांच्यावर अधिकारी हसतात. मुख्यमंत्रीपदावर बसल्यापासून एकही काम यांनी नीट केले नाही', असे राणे म्हणाले.

'मुख्यमंत्री पदासाठी बेइमानी केली'

राणे पुढे म्हणाले की, 'उद्धव ठाकरेंना हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नाही. त्यांच्याकडे नैतिकता नाही. निवडणुकीआधी भाजपसोबत युती केली. मोदींच्या नावावर 56 आमदार निवडून आले. ते नसते तर 25 खासदारही निवडून आले नसते. उद्धव ठाकरेंनी बेइमानी करुन मुख्यमंत्रीपद मिळवले. त्यांनी 56 आमदारांसाठी बेइमानी केली', अशी टीकाही राणेंनी केली.

'मुलाला क्लीन चिट देण्यासाठी मेळावा'

राणे पुढे म्हणाले की, 'कालचा दसरा मेळावा फक्त आदित्य ठाकरेंना क्लीन चिट देण्यासाठी होता. जनतेसाठी नव्हताच. आम्ही दिशा सालियन आणि सुशांतसिंह राजपूत प्रकरणात कधीही आदित्य ठाकरेंचे नाव घेतले नाही. त्यांनी क्लीन चिट दिली म्हणून आम्हाला बोलावे लागले. सुशांतची आत्महत्या नाही, तो खून आहे. आरोपी आज ना उद्या गजाआड जातील. त्यात त्यांचा पूत्र आदित्य ठाकरे तुरुंगात जाईल. आज मी स्पष्ट बोलतो. ते सत्तेचा दुरुपयोग करुन मुलाला वाचवत आहेत. सुशांतच्या प्रकरणातील सत्य लवकरच बाहेर येईल. त्याला कुणी मारलं आणि दिशाचा बलात्कार कुणी केला, तिला वरुन खाली कोणी टाकलं हे सर्व बाहेर येईल,' असा घणाघाती आरोपही राणेंनी केली.

'मोदींच्या धोरणावर बोलण्याची तुमची लायकी'

राणे पुढे म्हणाले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणावर बोलण्याची उद्धव ठाकरे यांची लायकी नाही. हा माणूस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठीही लायक नाही. दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरे यांचे भाषण म्हणजे ताळमेळ नसलेलं, निर्बुद्ध आणि शिवराळ बरळणे होते. मुख्यमंत्रिपदावरील व्यक्तीने कसं बोलावं, याचं उद्धव ठाकरेंना भान नाही. उद्धव ठाकरे म्हणजे पुळचट माणूस आहे.

'पुढच्या निवडणुकीत शिवसेनेचे 10-15 आमदारही निवडून येणार नाहीत'

'संजय राऊत हे महाराष्ट्रात पुढील पंचवीस वर्ष आमची सत्ता राहील, असा दावा करतात. परंतु, पुढील निवडणुकीत राज्यात शिवसेनेचे 10-15 आमदारही निवडून येणार नाहीत', असा दावा राणेंनी यावेळी केला. 'मागच्या वेळेस नरेंद्र मोदी यांच्या नावावरच शिवसेनेचे 56 आमदार निवडून आले. अन्यथा शिवसेनेचे 25 आमदारही जिंकले नसते', अशी टीकाही नारायण राणे यांनी केली.