आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नारायण राणे यांचा घणाघात:पुन्हा तुरुंगाचा दरवाजा दाखवणार; संजय राऊतांचा पलटवार- कायद्याचे बाप झालात का? माझ्या नादाला लागू नका!

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संजय राऊत यांना आपण पुन्हा जेलवारी घडवणार, असल्याचा घणाघात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. तर नारायण राणेंनी केलेल्या हल्ल्यानंतर संजय राऊत यांनी देखील तिखट शब्दांमध्ये 'माझ्या नादाला लागू नका. झाकली मुठ सव्वा लाखाची', असे म्हणत पलटवार केलाय.

26 डिसेंबरच्या सामनाच्या अग्रलेखाचे कात्रण आपण जपून ठेवले असल्याचे वक्तव्य कणकवलीत आयोजित एका कार्यक्रमात नारायण राणेंनी केले आहे. आता संजय राऊत यांनी देखील त्यांच्याच शब्दांमध्ये प्रत्युत्तर दिले आहे.

मी विसरणारा नाही

नारायण राणे म्हणाले, नारायण राणेवर बोलले की पत्रकारांची ब्रेकिंग न्यूज होते. याचमुळे सामनाचे कात्रण मी जपून ठेवले आहे. ते मी वकीलाकडे पाठवले आहे. मी वाचून विसरणारा नाही दखल घेणारा आहे. माझा स्वभाव वाईट असल्याचा टोला राणे यांनी संजय राऊतांना लगावला.

रस्ता मोकळा करत आहे

नारायण राणे म्हणाले, 26 डिसेंबरचा अग्रलेख मी राखून ठेवलाय. त्यातील प्रत्येक वाक्य न वाक्य मी लक्षात ठेवले आहे. संजय राऊतला मी सोडणार नाही. त्याच्यावर लवकरच केस दाखल करणार. संजय राऊतने 100 दिवस तुरुंगात घालवले. ते कमी पडलेत. त्यामुळे पुन्हा एकदा मी रस्ता मोकळा करत असल्याचा इशारा यावेळी नारायण राणे यांनी दिला आहे.

यावेळी नारायण राणे यांनी मीडियाला एक विनंती केली आहे. ते म्हणाले, कोकणासाठी काम करणारे जे कोणी लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या चांगल्या कामाला पोचपावती द्या. चांगले शब्द त्यांच्यासाठी लिहा.

आम्ही डरपोक-पळपुटे नाही

संजय राऊत नारायण राणे यांच्यावर पलटवार करताना म्हणाले, यांच्यासारखे डरपोक आणि पळपुटे ईडीची नोटीस येताच पक्ष बदलणारे आम्ही नाही. मी अजूनपर्यंत त्यांच्यावर काहीच बोललेलो नाही. माझ्या नादाला लागू नका. झाकली मुठ सव्वा लाखाची, असू द्या.

तुम्ही कायद्याचे बाप झालात का?

पुढे संजय राऊत म्हणाले, आणि हे परत सांगतो, हे काय मला जेलमध्ये टाकतील. माझ्या पक्षासाठी मी हिंमतीने जेलमध्ये गेलोय. आम्ही शरणागती पत्करली नाही. आम्ही नामर्द नाही, बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. तुम्ही कायद्याचे बाप झालात का? कोणकोण मला जेलमध्ये टाकण्याची धमकी देत आहे याची नोंद मी ठेवली आहे. नारायण राणेंनी आम्हाला धमक्या देऊ नये. त्यांचे घोटाळे बाहेर काढले तर त्यांना 50 वर्षे जेलमध्ये राहावे लागेल. असा ईशाराही संजय राऊत यांनी दिला.

या प्रकरणात झाली होती जेलवारी

पत्राचाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये अटक झाल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांना गेल्या वर्षी 9 नोव्हेंबर रोजी जामीन मिळाला. 102 दिवस आर्थर रोड तुरुंगात राहिल्यानंतर अखेर न्यायालयाने संजय राऊतांना दिलासा दिला होता. 31 जुलै 2022 रोजी ईडीच्या अधिकाऱ्यांनी संजय राऊत यांना चौकशीनंतर अटक केली होती.

बातम्या आणखी आहेत...