आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी नाॅलेज:स्थलांतरित पक्ष्यांत ‘फ्लू’चा नैसर्गिक विषाणू, ते फक्त कॅरियर, संक्रांत मात्र काेंबड्यांवर

नांदेड / शरद काटकर6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘बर्ड फ्लू’चा धोका लक्षात घेऊन जायकवाडीवर अधिकारी-कर्मचाऱ्यांची पाहणी - Divya Marathi
‘बर्ड फ्लू’चा धोका लक्षात घेऊन जायकवाडीवर अधिकारी-कर्मचाऱ्यांची पाहणी
  • मराठवाड्यात अद्याप एकही स्थलांतरित पक्षी मृत सापडला नाही

महाराष्ट्रात “बर्ड फ्लू’चा शिरकाव झाल्यानंतर एकच खळबळ माजली. परभणीत तर परदेशी पक्ष्यांनीच हा आजार आणल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे होते. विशेषत: मराठवाड्यात कोंबड्या, कावळे दगावण्याचे प्रकार घडत असताना पैठण येथील जायकवाडी असो वा परभणी, नांदेड भागात परदेशी पक्षी वास्तव्य करत असलेल्या एकाही ठिकाणाहून स्थलांतरित पक्षी दगावल्याची बातमी अद्याप आलेली नाही. परदेशी पक्ष्यांच्या श्वसनसंस्थेत फ्लूचा नैसर्गिक विषाणू आधीच असल्याने त्यांना बर्ड फ्लू झाला तरी त्याचा त्यांना धोका संभवत नाही. पण ते कॅरिअर ठरतात आणि त्यांच्यामुळे कोंबड्यांना हा आजार झाल्याने त्या दगावत असल्याचे निरीक्षण नांदेड येथील पक्षी अभ्यासक व जनरल फिजिशियन डॉ. अरुण माणिककर यांनी नोंदवले.

हिमाचल प्रदेशमध्ये थंड वातावरण असते. त्यामुळे तेथे फ्लूसारखा आजार जास्त काळ टिकून राहतो. शिवाय तेथे स्थलांतरित पक्षी जास्त येत असतात. त्यामुळे काही दिवसांपूर्वी बर्ड फ्लू झालेले बार हेडेड गूज पक्षी मोठ्या संख्येने दगावले होते. पण तुलनेत मराठवाड्यात थंड वातावरण कमी असते व पक्ष्यांची संख्याही त्या तुलनेत कमी असल्याने स्थलांतरित पक्ष्यांना फ्लूचा धोका संभवत नाही. पण आजार घेऊन येणाऱ्या या पक्ष्यांमुळे काेंबड्या मात्र दगावत असल्याचे समोर येत आहे. आणखी एक बाब म्हणजे कोंबड्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी राहत असल्याने त्यांना या आजाराचा विळखा लवकर पडतो आणि याचा सामना ते जास्त काळ करू शकत नाहीत.

फ्लू हा आजार प्रामुख्याने थंड वातावरणातच होतो. कोरोनाचेही अगदी तसेच आहे. पाश्चात्त्य देशांत हे प्रमाण अधिक आहे. विषाणू हे बाहेर निर्जीव असतात. पण, जेव्हा पेशीत प्रवेश करतात तेव्हा तेथील साधनसामग्री वापरून अनेक विषाणू बनवतात. लाखोंच्या स्वरूपात हे विषाणू तयार होतात. अशा वेळी पेशी फुटते व बाहेर पडतात. छपाई केल्यासारखी ही पद्धत आहे. ही प्रक्रिया थंडीमध्ये जास्त होऊन जास्त काळ टिकून राहते. थंड प्रदेशात हे जास्त काळ टिकून राहत असल्याने धोका जास्त असतो. स्थलांतरित पक्षी हे आजार घेऊन येतात. पण याचा माणसाला धोका होण्याची शक्यता अगदी नगण्य असल्याचे डॉ. माणिककर यांनी सांगितले.

उस्मानाबादेत ४ कावळे मृतावस्थेत आढळले
दरम्यान, बर्ड फ्लूमुळे मराठवाड्यात कोंबड्या दगावत असतानाच मंगळवारी उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यामध्ये खेड गावात ४ कावळे मृतावस्थेत आढळले. याचे सॅम्पल पुण्यातील प्रयोगशाळेला पाठवले आहेत.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser