आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोजगार बुडेल म्हणून लसीकडे पाठ:नक्षलींचा रेस्ट कॅम्प, तीन राज्यांचा बेस कॅम्प असलेल्या गावाचा लाइव्ह रिपोर्ट

गणेश सुरसे, मंदार जोशी | मुरकटडोह दंडारी (जि.गोंदिया)4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
विकासाचा एकमेव पुरावा असलेली मुरकटडोह दंडारी शाळेची इमारत. बांधल्यापासून कधी सुरूच झाली नाही. आता गुरे बांधण्याच्या कामी येतेय. - Divya Marathi
विकासाचा एकमेव पुरावा असलेली मुरकटडोह दंडारी शाळेची इमारत. बांधल्यापासून कधी सुरूच झाली नाही. आता गुरे बांधण्याच्या कामी येतेय.
  • सत्तर वर्षांपासून ‘क्वाॅरंटाइन’ नक्षलग्रस्त मुरकोटडोह दंडारीची व्यथा

सकाळी साडेअकराच्या सुमारास गावातील जवळपास सर्वच घरे बंद. गल्लीत लहान मुले खेळत होती. एखाद-दुसऱ्या घरातच कुणीतरी दिसत होते. गावात कर्फ्यूसारखी स्थिती होती. नंतर कळले की संपूर्ण गाव जंगलात तेंदूपत्ते तोडण्यासाठी गेले आहे. ऊन डोक्यावर आले की सगळे परत येतात. छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या सीमेलगतचे हे मुरकुटडोह दंडारीचे जंगल नक्षलींचा रेस्ट कॅम्प. म्हणूनच या तीन राज्यांचा संयुक्त बेस कॅम्प इथे उभा आहे.

गावातील एका तरुणाला गावात लॉकडाऊन नाही का, असे विचारले असता तो म्हणाला, ‘देश स्वतंत्र झाला असला तरी आम्ही मागील ७० वर्षांपासून क्वाॅरंटाइनच आहोत. आम्हाला कोरोना होणार नाही अशी गावकऱ्यांची मानसिकता आहे. नक्षलवाद्यांची भीती आणि असुविधा या मुळे या गावात सरकारी कर्मचारी अधिकारी येण्यास घाबरतात. पोलिसांमार्फतच गावात सुविधा पुरवल्या जातात. गावात आरोग्य उपकेंद्रही नाही, अंगणवाडीच्या पुढे शिकण्याची सोय नाही. त्यामुळे गावात आतापर्यंत ना कोरोनाची चाचणी लागली ना लसीकरण शिबिर झाले.

सात पाड्यांचे गाव : अर्धा अर्धा किलोमीटरवर ५० ते ६० घरे वसलेली आहे. आशा सात पाड्यांचे हे गाव आहे. सात पाडे मिळूल लोकसंख्या सातशे ते आठशे. या पाड्यांना आदिवासी लोक टोला असे म्हणतात. त्यातील मुरकुटडोहचे तीन आणि दंडारीचे दोन असे पाच पाडे. महाराष्ट्रात कटीपार १ आणि कटीपार २ हे पाडे मध्य प्रदेशात येतात. तर कटेमा छत्तीसगडमध्ये. कटेमा आणि कटीपार या दोन्ही पाड्यांवर जाण्यासाठी महाराष्ट्रातूनच रस्ते आहेत. आतापर्यंत या गावात जाणे कठीण होते. पाऊल वाटांशिवाय पर्याय नव्हता. कोणाला दवाखान्यात न्यायचे असले तर खाटेवर उचलून नेण्याशिवाय पर्याय नव्हता. कोरोनामुळे रोजगार जाणे हीच यांची मोठी समस्या. त्यात तेंदुपत्यांचे भाव पडले मनरेगाची काही कामे मिळत होती, पण ती कामे देखील बंद झाल्याचे गावकरी सांगतात.ताप आल्यास काम बंद
लसीकरणासाठी ग्रा.पं. ने सूचना केल्या,पण लस घेतल्याने ताप येतो. दोन-तीन दिवस घरात बसावे लागते. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची वेळ येते किंवा मृत्यू होऊ शकतो या अफवेमुळे गावात अजून कोणीच लस घेतली नाही. गावकरी सांगतात, काही दिवसांपूर्वी काही जणांना टायफाॅइड व ताप आला होता. तेव्हा सागर झाडाच्या तीन बिया खायच्या आणि दोन बिया गळ्यात बांधल्यास आजार बरा होतो. तोच उपचार आम्ही करतो.

पोलिसांपासून दुरावा
नक्षलवाद्यांच्या दलमची (गट) भीती गावकऱ्यांच्या मनात कायम आहे. तीन महिन्यांपूर्वी पोलिसांचा खबऱ्या असल्याचे कळताच नक्षल्यांनी एकाचा गळा चिरला. ज्याने बेस कॅम्पसाठी जागा दिली त्यालाही मारून टाकले. २०१९ मध्ये तीन राज्यांनी एकत्र उभा केलेला हा पहिला कॅम्प. येथून ३५ किलोमीटरवरील सालेकसा हेच मोठे गाव, तर दरेकसा हे ग्रामपंचायतीचे गाव. दुपारी रस्त्यावर एकही माणूस दिसत नाही. काही महिन्यांपूर्वी नक्षलवाद्यांनी या ठिकाणी भूसुरुंग लपवल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

काही लोक आजारी पडले होते. मात्र जंगलातील औषधीने बरे झाले. गावात आरोग्य सुविधाही नाही. शाळाही बंदच आहे. आरोग्य उपकेंद्र मंजूर आहे. पण ते अजून आले नाही. देश स्वतंत्र झाला. पण हे गाव अजून स्वतंत्र झाले असे वाटत नाही. - मनाेज इनवाटे, ग्रामसेवक, मुरकुटडोह

बातम्या आणखी आहेत...