आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वर्धापनदिन:पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवकांसह लोकप्रतिनिधींची ध्वजारोहणाला दांडी

उस्मानाबाद9 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • राष्ट्रवादीच्या वर्धापनात चर्चा, पक्षात कोण, बाहेर काेण?

राष्ट्रवादी काँग्रेसचा २१ वा वर्धापनदिन बुधवारी (दि.१०)साजरा करण्यात आला. वर्धापनदिनाच्या निमित्ताने पक्षाच्या जिल्हा कार्यालयात ध्वजारोहण कार्यक्रम घेण्यात आला. मात्र, या कार्यक्रमाला पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले शहरातील बहुसंख्य नगरसेवक, जिल्हा परिषदेचे तसेच पंचायत समितीचे सदस्यही गैरहजर होते. त्यामुळे पक्षाच्या चिन्हावर निवडून अाले तरी दांडी मारणारे लोकप्रतिनिधी नेमके पक्षात आहेत की बाहेर याबद्दलचा प्रश्न उपस्थित नेते एकमेकांना विचारत होते. दरम्यान,जिल्हाध्यक्षांनी ध्वजारोहण न करता अन्य नेत्यांच्या हातात दोरी दिल्याने पक्षाची धुरा नेमकी कुणाच्या खांद्यावर, अशीही कुजबुज सुरू होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजीमंत्री व पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय असलेले डॉ.पद्मसिंह पाटील, त्यांचे पूत्र आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी काही महिन्यापूर्वी पक्षाला सोडचिट्टी दिल्याने जिल्ह्यात पक्षाची धुरा कुणाच्या खांद्यावर असेल, असा प्रश्न उपस्थित झाला होता. डॉ.पद्मसिंह पाटील यांचे पुत्र आमदार राणा पाटील यांच्या माध्यमातून जिल्ह्यात पक्षाला बळकटी मिळाली होती. मात्र त्यांनी भाजपत प्रवेश केल्यानंतर त्यांना मानणारी कार्यकर्त्यांची फौज त्यांच्यासोबत भाजपमध्ये गेली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेले नगरसेवक, जिल्हा परिषद-पंचायत समिती सदस्य तांत्रिकदृष्ट्यात पक्षातच असल्याचे सांगत आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसकडे जिल्ह्यात आवाका असलेला नेता नाही. त्यामुळे पक्षावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांची घुसमट सुरू आहे. आपल्या पक्षात नेता कुणाला म्हणावं, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडत आहे. मोठ्या प्रमाणावर पडझड झाल्यानंतर शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षाने जिल्ह्यात मोठा मेळावा घेतला. मात्र, विधानसभा निवडणुकीत या मेळाव्याचा विशेष परिणाम झाला नाही. उलट जिल्ह्यात असलेल्या दोन्ही जागा पक्षाने गमावल्या. तरीही पक्षाकडून विस्कटलेली घडी सावरण्यासाठी विशेष प्रयत्न झाले नाहीत. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेचे नेते संजय निंबाळकर, संजय दुधगावकर, भाजपचे डॉ.प्रतापसिंह पाटील आदी नेते पक्षात आले आहेत. मात्र, जुने पदाधिकारी, नेते नव्यांना सामावून घेत नाहीत, अशी तक्रार आहे. पक्षातील घराणेशाही सुरूच असल्याचा आरोप होत आहे. परिणामी चिन्हावर निवडून आलेले अनेक सदस्य, नगरसेवक आदी लोकप्रतिनिधी पक्षाच्या वर्धापनदिनी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमालाही उपस्थित राहत नाहीत. येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेना-भाजपमध्ये खरी लढत होणार आहे. या लढतीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्पर्धेत तरी दिसेल का, असा प्रश्न कार्यकर्ते एकमेकांना विचारत आहेत. दरम्यान,पक्षाच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाला मोजकेच पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. कोरेानाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी हे योग्य असले तरी पक्षाने दिलेले लोकप्रतिनिधी गैरहजर असणे संयुक्तिक नव्हते. शिवाय जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्याऐवजी अन्य नेते ध्वजारोहण करत असतील तर जिल्हाध्यक्षांनी त्यांचा अधिकार कधी वापरायचा, असा सवाल कार्यकर्ते विचारत आहेत.

भाजप-सेनेचे आव्हान

डॉ.पद्मसिंह पाटील तसेच आमदार राणा पाटील यांनी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा दबदबा निर्माण केला होता.मात्र, आता पक्षाला चेहरा नाही.जुन्या नेत्यांना नवे कार्यकर्ते स्विकारत नाहीत. नव्याने पक्षात आलेल्या नेत्यांना जुने नेते जवळ करत नाहीत.त्यामुळे येणाऱ्या काळात निवडणुका कशा लढवल्या जाणार, पक्षामध्ये ऐक्य कसे राहणार, नव्या-जुन्यांचा मेळ कसा साधला जाणार, की पक्षात पुन्हा घराणेशाहीच चालणार, असे अनेक प्रश्न पक्षासमाेर आहेत.जनतेने शिवसेनेचा एक खासदार, तीन आमदार दिले आहेत. प्रथमच भाजपच्या तिकीटावर एक आमदार निवडून आले आहेत. अशावेळी दोन तगड्या पक्षासमोर राष्ट्रवादी काँग्रेसकडून कसे तोंड दिले जाणार, असा प्रश्न आहे.

बातम्या आणखी आहेत...