आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशरद पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत निवृत्तीची घोषणा केली. सध्या त्यांनी या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी कार्यकर्त्यांकडे दोन ते तीन दिवसांचा वेळ मागितला. मात्र, ते राजीनामा कितीपत मागे घेतील, याबद्दल शंका उपस्थित होत आहे.
आता शरद पवार यांच्या जागी राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष कोण होणार, याची चर्चा सुरू आहे. त्यातही पाच प्रमुख नावांची जोरदार चर्चा आहे.
चित्र बदलले
शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीचे मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये प्रकाशन झाले. यावेळी शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली. त्याला कार्यकर्त्यांनी विरोध केला. अनेकांनी तिथेच घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर सिल्व्हर ओकवर जाऊन अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील आदी ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी शरद पवारांची मनधरणी केली. मात्र, तेव्हाही त्यांनी आपला निर्णय बदलला नाही. तसेच कार्यकर्त्यांनी विरोध मागे घ्यावा. राजीनामा सत्र थांबवावे. त्यानंतर दोन ते तीन दिवसांत आपण फेरविचार करू, असे आवाहन त्यांनी केले.
पुढे काय होणार?
शरद पवार यांना निर्णय मागे घ्यायचा असल्यास त्यांनी तो तात्काळ घेतला असता. मात्र, ते आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे समजते. पुस्तक प्रकाशन सोहळ्यातही त्यांनी आपल्या निर्णयावर नंतर ठाम असल्याचे सांगितले. त्यामुळे शरद पवार राजीनामा मागे घेतील, याची खात्री नाही. त्यासाठी त्यांचे 82 वर्षांचे वय हे प्रमुख कारण सांगितले जाते. विशेष म्हणजे पवारांनी आता राजीनामा मागे घेऊ नये, असे पत्नी प्रतिभा पवार यांनाही वाटते. त्यामुळे ते सक्रिय राजकारणातून निवृत्त होतील, असा अंदाज आहे.
कोणाची नावे चर्चेत?
शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतलाच नाही, तर त्यांची जागा कोण घेणार? याची चर्चा सुरू आहे. त्यात पाच ते सहा नावे चर्चेत आहेत. त्यात सर्वात महत्त्वाचे नाव म्हणजे अर्थातच अजित पवार. मात्र, अजित पवार यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. हे पाहता ते संघटनात्मक कामात कितपत रस घेतील, हे काळच सांगेल. सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील आणि सुनील तटकरे यांचेही नाव चर्चेत आहे.
नाव पक्के झाले?
शरद पवार यांनी अचानक नव्हे, तर ठरवून आज आपल्या राजकीय निवृत्तीची घोषणा केल्याचे दिसते. कारण त्यांचे भाषण संपते न संपते तोच त्यांच्या भाषणाच्या प्रती माध्यमांकडे पोहचविण्यात आल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विकिपीडिया पेजवरील अध्यक्षपदाचे त्यांचे नाव हटवण्यात आले. पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष नेमण्यासाठी एक समिती नेमण्याची सूचना केली. हे सारे पाहता, त्यांच्या ध्येय आणि धोरणास योग्य अशा व्यक्तींची चर्चाही झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.
अध्यक्ष कोण निवडणार?
राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष नेमण्यासाठी शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, अजित पवार, जंयत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजळ, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, फौजिया खान, झिरवळ आदींची समिती नेमावी. या समितीने सर्व कार्यकर्ते, नेत्यांना अधिकाधिक वेळ देणारा, सर्वांना सोबत घेऊ जाणारा अध्यक्ष निवडावा असे आवाहन केले आहे.
संबंधित वृत्तः
लोक माझे सांगाती:अजितचा पहाटेचा शपथविधी माझ्या सहमतीविना; शरद पवारांनी पुस्तकातून सोडले मौन
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.