आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवे संकट:मराठवाड्यात म्युकरमायकोसिसचा कहर ; एकाचा मृत्यू, 5 रुग्ण गंभीर

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
माजलगावमध्ये रुग्णांची तपासणी करताना डाॅ. स्वानंद कुलकर्णी. - Divya Marathi
माजलगावमध्ये रुग्णांची तपासणी करताना डाॅ. स्वानंद कुलकर्णी.
  • अंबाजोगाई, माजलगाव, बीड, हिंगोलीत आढळले संशयित
  • अंबाजोगाई 10, बीडमध्ये 1, हिंगोलीत 2 शस्त्रक्रिया

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या बीडमध्ये आता कोविडनंतर उद्भणाऱ्या म्युकरमायकोसिस म्हणजेच काळ्या बुरशीच्या आजाराचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याचे समोर आले आहे. स्वाराती रुग्णालयामध्ये अशा १० रुग्णांवर शस्त्रक्रिया केला गेली आहे. यापैकी पाच रुग्ण अतिगंभीर स्वरूपाचे आजारी आहेत. एका रुग्णाचे निधन झाले आहे. बीडमध्येही खासगी रुग्णालयात एक शस्त्रक्रिया पार पडली. तर, बीडसह माजलगावातही काही संशयित रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे.

वैद्यकीय भाषेत म्युकरमायकोसीस असे म्हटल्या जाणाऱ्या या आजाराने रुग्ण आता बीड जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात सापडू लागल्याने चिंतेची बाब आहे. वेळीच निदान न झाल्यास अथवा उपचार न मिळाल्यास हा अाजार बळावत जातो. यातून रुग्णाचा जबडा किंवा डोळा काढावा लागू शकतो. प्रसंगी प्राणही गमवावा लागू शकतो.

माजलगावात आढळले संशयित

माजलगावातही काही संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यांना उपचारांसाठी इतर ठिकाणी पाठवण्यात आले आहे. नागरिकांनी कोविडनंतर योग्य काळजी घ्यावी, लक्षणे दिसताच तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा - डॉ. स्वानंद कुलकर्णी, नेत्रतज्ज्ञ, माजलगाव

हिंगोली जिल्ह्यात आठ रुग्ण आढळले
हिंगोली जिल्ह्यात एक महिन्यात आठ रुग्ण आढळले. त्यापैकी दोन रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून इतर रुग्ण औषधोपचाराने बरे झाल्याची माहिती डॉ. फैजल खान यांनी दिली. ते म्हणाले की, म्युकरमायकोसिस हा आजार दुर्मिळ असला तरी नवा नाही. हिंगोली जिल्ह्यात कोरोनामधून बरे झालेल्या आठ रुग्णांना हा आजार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यापैकी दोन रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून इतर सहा रुग्णांवर औषधोपचार करण्यात आले आहेत. दरम्यान, तोंडात काळे चट्टे आल्यानंतर तातडीने दंतचिकित्सक यांचा सल्ला घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले.

म्युकरमायकोसिस म्हणजे काय?
मुकरमायकोसीस हा दुर्मिळ आजार आहे. मराठीत याला काळ्या बुरशीचा आजार म्हणतात. बुरशीचा संसर्ग झाल्यानंतर हा आजार होताे. पूर्वी हा आजार खूप कमी प्रमाणात होता मात्र, कोरोना नंतर रुग्णांमधील प्रतिकारशक्ती कमी होत असल्याने या आजाराचा संसर्ग झपाट्याने होत असल्याचे समाेर आले आहे. नाकातून किंवा तोंडातून हा बुरशीचा संसर्ग होतो.

काय आहेत लक्षणे?
काळ्या बुरशीचा संसर्ग झालेल्या व्यक्तींना हिरड्या दुखणे, दात दुखणे, हिरड्यांमधून रक्त येणे, पू येणे किंवा डोळे जळजळ करणे, डोळे लाल होणे, डोळे दुखणे अशी लक्षणे सुरुवातीच्या काळात आढळून येतात. हा संसर्ग ताेंड, डोळे, जबडा यातून पुढे मंेदूपर्यंत जाऊन तीव्र आघात करताे. अधिक संसर्गानंतर काही रुग्णांमध्ये डोळ्यांच्या खोबणीतून डोळा बाहेरही येतो. यात डोळा गमावण्याची शक्यता अधिक असते असे कान, नाक व घसा तज्ज्ञ डॉ. प्रशांत देशपांडे यांनी सांगितले.

वेळीच उपचार महत्त्वाचे
वेळीच तपासणी व उपचार केल्यास केल्या ब्लॅक फंगसचा हा आजार बरा होऊ शकतो. यासाठी रुग्णांनी लक्षणे दिसताच डोळ्यांचे डॉक्टर किंवा कान, नाक व घसा तज्ज्ञ यांच्याकडे जावे. स्वाराती रुग्णालयात यावर सध्या उपचार केले जात आहेत. - डॉ. भास्कर खैरे, नेत्रविभाग प्रमुख, स्वाराती.

काय काळजी घ्याल ?

कोरोनाची लागण झाल्यानंतर तिसऱ्या व चौथ्या आठवड्यामध्ये नाक नॉर्मल सलाइनने स्वच्छ करणे, रक्तातील साखरेचे प्रमाण १५ व्या व २२ व्या दिवशी तपासून पाहणे, ज्या रुग्णांना इंजेक्शन टॉसिलीझुमॅब, रेमडेसिविर इंजेक्शन दिले आहे किंवा पाच दिवसांपेक्षा जास्त ऑक्सिजन दिला आहे अशांनी नाकामध्ये बुरशीची लागण झाली आहे की नाही हे पाहण्याकरिता नाकातील स्वॅब पंधराव्या व बाविसाव्या दिवशी तपासून घ्यावा.

बातम्या आणखी आहेत...