आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nisarg Cyclone Impact In Maharashtra | Mango And Cashew In Konkan And Cotton In Nagpur Damage; 2 Killed, 6 Injured

निसर्गाचा तडाखा:कोकणात आंबा, काजू तर नागपुरात कापसाला फटका; 2 जणांचा मृत्यू, 6 जखमी

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुणे जिल्ह्यात 420 हेक्टवरील पिकांची हानी; खान्देशात अतिवृष्टी, तर अनेक ठिकाणी वाहनांचे नुकसान

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या निसर्ग चक्रीवादळाचा महाराष्ट्राला मोठा तडाखा बसला आहे. कोकण, पश्चिण महाराष्ट्रासह विदर्भात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. तसेच कोकणात २ तर पुणे विभागात ३ जणांचा मृत्यू झाला. ‘निसर्ग’ने बुधवारी मुंबईपासून सुमारे ११० किलोमीटर दूर अलिबागमध्ये धडक दिली. याचा मुंबईवर फारसा परिणाम झाला नाही. मात्र उर्वरित महाराष्ट्रात अनेक ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

महाराष्ट्रात समुद्र किनारपट्टीलगत बुधवारी दुपारी १२० किमी प्रतितास वेगाने निसर्ग चक्रीवादळ धडकले. रायगड, पालघर आणि पुणे या किनारपट्टी जवळच्या जिल्ह्यात वादळाचा मोठा तडाखा बसला आहे. येथे जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडलाच तसेच समुद्रात उंच लाटा उसळल्या. किनारपट्टी भागातील काही ठिकाणी सहा ते आठ फूट लाटा उसळल्या. काही ठिकाणी निवासी अपार्टमेंटच्या छतावरील टीनचे छप्पर उडून केले तर अनेक झाडे व विजेचे खांब उन्मळून पडले. तसेच मुंबईसह ठाण्यामध्ये अनेक झाडे रस्त्यावर उन्मळून पडली.

मुंबईतून पुढे सरकल्यानंतर महाराष्ट्रातील इतर भागाला चक्रीवादाळाचा मोठा तडाखा बसला. यामुळे रायगडमध्ये दोघांचा मृत्यू व एकजण तर रत्नागिरीतील पाच जण जखमी झाले. तसेच यात पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात ६५ वर्षीय आई आणि ३८ वर्षांचा मुलगा तर हवेली तालुक्यातील एक जण अशा तिघांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान मुसळधार पावसामुळे नागपूर जिल्ह्यात पणन महासंघाचे सुमारे २५० कोटींचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. तर खान्देशातील काही तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली.

रायगड : कोकणात २४ तासांत ७१.८७ मि.मी.पाऊस; २ जणांचा मृत्यू, ६ जखमी

निसर्ग चक्रीवादळ रायगड जिल्ह्याच्या श्रीवर्धन मधील दिवे आगार समुद्र किनाऱ्यावर धडकल्याने कोकण किनारपट्टीवर मोठे नुकसान झाले आहे. या वादळाचा रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना मोठा फटका बसला. रायगडमधील दोघांचा मृत्यू व एकजण जखमी झाला असून वादळात रत्नागिरीतील पाच जण जखमी झाले आहेत. बऱ्याच ठिकाणी झाडे कोसळून घरांचे नुकसान झाले. तर, वीज वाहिन्या तुटल्याने काही काळ पुरवठा खंडित झाला होता. वादळानंतर येथील पाऊस थांबला असून जनजीवन पुन्हा एकदा पूर्वपदावर येत आहे.

कोकणातील तिन्ही जिल्ह्यांत वादळाचा प्रभाव जाणवला असून आंबा, काजू, माड बागायतीचेही मोठे नुकसान झाले आहे, किनारी भागातील घरांची छपरे उडून नुकसान झाले असून महसूल विभागाने पंचनाम्याला सुरुवात केली आहे. वादळादरम्यान २४ तासांत कोकणात ७१.८७ मि.मी.च्या सरासरीने पाऊस पडला.

वादळाचा सर्वाधिक फटका रायगडला बसला. जिल्ह्यात अलिबाग तालुक्यातील उमटे येथील दशरथ वाघमारे (५८) महावितरणचा पोल पडून, तर श्रीवर्धन मध्ये भिंत पडून एक असा दोन जणांचा मृत्यू झाला. अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन, रोहा, म्हसळा, पनवेल, उरण तालुक्यात खासगी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. वादळाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या घरात राहणाऱ्या सुमारे १५ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते. त्यामुळे जीवित हानी टळली.

निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा रत्नागिरी जिल्ह्यालाही बसला. वादळात झाडे कोसळून पाच जण जखमी झाले. मिरजोळे येथील एका घरावर झाड पडून तीन जण जखमी झाले. उंडी येथील एक महिला गंभीर जखमी झाली असून तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तसेच, पूर्णगड येथील एका घरावर झाड कोसळल्यामुळे एक जण जखमी झाला आहे. नाणीज येथील रत्नागिरी-कोल्हापूर रस्त्यावर झाड पडल्यामुळे वाहतूक काही काळ बंद होती. जिल्ह्यात दापोली तालुक्यातील जालगाव येथील नरेंद्र बर्वे या बागायतदार शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. बर्वे यांची जवळपास ५०० पोफळीची झाडे, २० आंबा कलमे, नारळ २०, फणसाची ३० झाडे उन्मळून पडली आहेत. विशेष म्हणजे आंब्याची झाडे तर ५० ते ६० वर्षांची होती.

पुणे : शेतीसह इमारतींचे मोठे नुकसान, तीन जणांचा मृत्यू

पुणे जिल्ह्यात बुधवारी निसर्ग चक्रीवादळामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात खेड तालुक्यात ६५ वर्षीय आई आणि ३८ वर्षांचा मुलगा तसेच हवेली तालुक्यातील एक जण अशा तिघांचा मृत्यू झाला आहे. यात जिल्ह्यात दीड हजार कच्च्या घरांचे, १०० पक्क्या घरांचे, ५७ अंगणवाडी, ३१ शाळा आणि ४ ग्रामपंचायत इमारतींचे नुकसान झाले. याशिवाय ४०२ हेक्टरवरील शेतपिकासह पोल्ट्री फार्म, पाॅलीहाऊस, कांदा बखारी आणि नेटशेडलाही मोठा फटका बसला आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. येत्या दोन दिवसांत संपूर्ण नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिले.

निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची माहिती जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी पत्रकार परिषदेत दिली. बुधवारी चक्रीवादळामुळे तीन व्यक्तींचा मृत्यू झाला असून, यामध्ये खेड तालुक्यातील वहागाव येथील एका घरातील आई आणि मुलगा आणि हवेली तालुक्यातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या प्रत्येकाला शासनाच्या नियमानुसार ४ लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचे राम यांनी स्पष्ट केले. या चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि कृषी अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. शाळा, अंगणवाड्यांची जिल्हा परिषदेमार्फत तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश दिले आहेत. या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका महावितरणला बसला आहे. परंतु आता ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने दुरुस्तीची कामे करण्यास सांगितले आहे. यासाठी गरज भासल्यास जिल्हा नियोजनमधून निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेदेखील जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी स्पष्ट केले.

जळगाव : चोपडा, यावल तालुक्यात अतिवृष्टी; घरावरील पत्रे उडाले, वृक्ष उन्मळून पडले

‘निसर्ग’ चक्रीवादळाचा तडाखा खान्देशलाही बसला. जळगाव जिल्ह्यात बुधवारी ४५.६१ मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी घरांवरील पत्रे उडाली. वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यावल व चोपडा तालुक्यात अतिवृष्टी झाली. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे जिल्ह्यात ३ ते ४ जून या कालावधीत गडगडाटासह मुसळधार पर्जन्यवृष्टी होण्याचा अंदाज आयएमडी, मुंबईने वर्तवला होता. या पार्श्वभूमीवर ५ जूनपर्यंत सर्व तहसील कार्यालयांतील नियंत्रण कक्ष २४ तास अद्ययावत करून कार्यान्वित केली होती.तसेच प्रत्येक तालुक्यातील नदी, धरणे, तलाव असलेल्या भागातील तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील यांनाही सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या होत्या. बुधवारी दुपारपासून पाऊस सुरु होता. मात्र, रात्री आठ वाजेनंतर सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसून अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. जिल्ह्यात एक ते चार जूनदरम्यान वार्षिक सरासरीच्या ८.१८ टक्के पाऊस झाला आहे.
 
 
 
नागपूर : पावसामुळे पणन महासंघाचे २५० कोटींचे नुकसान

अवकाळी पावसामुळे कापूस, सरकी ओली झाली व काही ठिकाणी सरकीला कोंब फुटले आहेत. यामुळे पणन महासंघाचे सुमारे २५० कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती महासंघाचे अध्यक्ष अनंत देशमुख यांनी दिली.

ओल्या कापसाचे जिनिंग करता येत नाही. तो सुकवावा लागतो व त्याकरता जागा व वेळ लागते, परंतु याचा विचार न करता कापूस खरेदी करण्यासाठी अनेक जिल्हाधिकारी जबरदस्ती करतात, असा आरोप कापूस पणन महासंघाचे अध्यक्ष अनंत देशमुख यांनी केला आहे. अशा जबरदस्ती करण्यामुळे ओल्या कापसावरच दुसरा कापूस टाकावा लागतो. परिणामी फेडरेशनचे व पर्यायाने शासनाचे करोडो रुपयांचे नुकसान होते, असे त्यांनी सांगितले.

२९ मे रोजी १६९ जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीमध्ये ४ लाख ४६ हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. तर २९ मे ते ४ जून या कालावधीत ३ लाख ६९ हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. ४ जून रोजी ५ लाख १० हजार क्विंटल कापूस शिल्लक होता. २९ मे रोजी ७ लाख ५३ हजार क्विंटल सरकी खरेदी करण्यात आली. तर ४ जून रोजी ७० हजार गाठी तयार होत्या. पावसामुळे यातील २० टक्के कापूस ओला झाल्यामुळे २ हजार रुपये प्रतिक्विंटल या प्रमाणे सुमारे १९० कोटींचे नुकसान झाले. त्यामुळे सुमारे ४७ ते ४८ कोटींचे आणि वाहतुकीदरम्यान गाठी ओल्या झाल्यामुळे २ हजार रुपये ७ ते ८ कोटी नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

नाशिक : शहरातील १३५ वृक्ष कोसळले

नाशिक चक्रीवादळाचा शहराला चांगलाच तडाखा बसला अाहे. शहर व परिसरातील तब्बल १३५ छाेटे-माेठे वृक्ष या वादळामुळे काेसळल्याची नोंद अग्निशमन दलाकडे करण्यात आली अाहे. मुसळधार पाऊस व वाऱ्यामुळे काेसळलेले वृक्ष, फांद्या दूर करण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून गुरुवारी दि. ४ युद्धपातळीवर सुरू हाेते.

निर्सग चक्रीवादळाने काेकण किनारपट्टीला धडल दिल्यानंतर अापला माेर्चा उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने वळवला हाेता. बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास वेगाने वाहणारे वारे व मुसळधार पावसामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले हाेते. दरम्यान, अापात्कालीन स्थितीसाठी अग्निशमन दलाच्या मुख्यालयासह पाचही केंद्रांवरील अधिकारी व कर्मचारी सतर्क हाेते. दरम्यान, बुधवारी सायंकाळपासून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे शहर व परिसरात ठिकठिकाणी छाेटे-माेठे वृक्ष काेसळल्याची घटना घडली. याबाबत माहिती समजताच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यंानी तातडीने धाव घेत रस्त्यावर पडलेले वृक्ष, फांद्या हटवल्या. दरम्यान, या वादळी वाऱ्यामुळे शहर व परिसरात काेणत्याही प्रकारची जीवित वा वित्त हानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...