आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअयोध्येतील रामजन्मभूमी ट्रस्टच्या जमीन खरेदीतील कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून बुधवारी शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. या राड्यानंतर भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. दरम्यान, या घटनेनंतर भाजप नेते नितेश राणे यांनी सेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले. 'तुमचा उद्धव…आमच्या मोदी साहेबांसमोर नाक घासून आला आहे. मग तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवता ??' असे ट्विट नितेश राणे यांनी केले.
काही दिवसांपूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिष्टमंडळासह पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्लीत भेट घेतली. त्या भेटीदरम्यान मराठा आरक्षण, राज्यपाल नियुक्त आमदार यासह अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांसह एकांतातही भेट झाली. त्या भेटीचे तपशील अद्याप समोर आले नाहीत. दरम्यान, त्याच भेटीचा संदर्भ देत भाजप नेते नितेश राणे यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
नितेश राणेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले, ''जाऊन सांगा आज सेना भवन समोर भिडणाऱ्या शिवसैनिकांना..तुमचा उद्धव.. आमच्या मोदी साहेबांसमोर नाक घासून आला आहे..मग तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवत आहात ??''
शिवसेना भवनासमोर नेमकं काय घडलं ?
अयोध्येतील रामजन्मभूमी ट्रस्टच्या जमीन खरेदीतील कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून बुधवारी शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. शिवसेनेच्या टीकेमुळे संतापलेले भाजप कार्यकर्ते शिवसेना भवनावर मोर्चा घेऊन गेले. जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. भाजपचा ‘फटकार मोर्चा’ श्रद्धास्थान असलेल्या शिवसेना भवनावर येत असल्याचे समजताच शिवसैनिक संतप्त झाले आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना रोखले. या वेळी शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री उडाली. दगडविटा घेऊन शिवसेना भवनाकडे निघालेल्या भाजप कार्यकर्त्यांना शिवसैनिकांनी चांगलाच चोप दिला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.