आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश:'नाथाभाऊ राष्ट्रवादीत आल्याने आता पक्षाला गती येईल, नाथाभाऊ काय चीज आहे दाखवून देऊ'- शरद पवार

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आज अखेर भाजपचे बंडखोर नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी हाती घड्याळ घेतले. यावेळी शरद पवार यांनी भाजपवर निशाना साधला. 'नाथाभाऊंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने आता संपूर्ण खान्देश राष्ट्रवादीमय होईल. आता नाथाभाऊ काय चीज आहे तुम्हाला दाखवून देऊ,' असा सूचक टोला शरद पवारांनी विरोधकांना लगावला.

पवार पुढे म्हणाले की, 'खान्देश हा संपूर्ण परिसर गांधी-नेहरुंच्या विचाराचा होता. मध्यंतरी त्याला उतरती कळा लागली. या काळात नवी पिढी तयार झाली. ही पिढी घडवण्याचे काम नाथाभाऊंनी केले. त्यांनी जिल्हा परिषद, खासदार, नगरपरिषद, पंचायत समित्या आणल्या. इतिहासाचा हा पहिला टप्पा संपला आहे. आता दुसरा टप्पा सुरू झाला आहे. नाथाभाऊ राष्ट्रवादीत आल्याने आता पक्षाला गती येईल. नाथाभाऊंनी खान्देशात पक्ष वाढवण्याचा शब्द दिला आहे. ते जेव्हा शब्द देतात तेव्हा तो पूर्ण करतात. त्यावरून मागे हटत नाहीत. ही त्यांची खासियत आहे. आता कोरोनाच्या संकटातून बाहेर पडल्यावर आपण जळगावात जाणार असून नाथाभाऊ काय चीज आहे हे दाखवून देणार आहोत,' असे पवार म्हणाले.

मंत्रिमंडळात कोणतेही बदल होणार नाहीत- शरद पवार

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर त्यांना मंत्रिमंडळात जागा देण्यात येईल, अशा चर्चा सध्या सुरू आहेत. यावर आता स्वतः शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पवार म्हणाले की, 'खडसेंच्या पक्षप्रवेशानंतर मंत्रिमंडळात कोणताही बदल केला जाणार नाही. सगळेजणं आहे त्या ठिकाणी आहेत आणि राहतील, असे पवार यांनी स्पष्ट केले. यासोबतच, अजित पवारांच्या अनुपस्तितीवरुन ते नाराज नसल्याचेही पवारांनी सांगितले. कोरोना संकटामुळे काळजी घ्यावी लागते, त्यामुळे ते घरी आहेत, असे शरद पवारांनी स्पष्ट केले.