आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्राणघातक नायलॉन मांजामुळे औरंगाबाद येथील एका विद्यार्थ्याचा, तर नागपुरात एका मुलीचा गळा कापल्याची संतापजनक घटना घडली आहे. औरंगाबादेतील विद्यार्थी जेवणाचा डब्बा घेऊन जाताना मांजा त्याच्या गळ्यात अडकला. त्यात तो गंभीर जखमी झाला. पण वेळीच उपचार मिळाल्याने त्याचा जीव वाचला. दुसरीकडे, नागपुरच्या मुलीच्य गळ्याला या मांजामुळे तब्बल 26 टाके पडल्याची माहिती आहे.
यासंबंधीच्या वृत्तानुसार, औरंगाबादचा चैतन्य शंकर मुंढे नामक 19 वर्षीय विद्यार्थी जेवणाचा डब्बा घेऊन शहराीतल बेगमपुरा भागातून विद्यापीठ गेटकडे जात होता. दुचाकीवर जात असताना अचानक विद्यापीठ गेटवर त्याच्या गळ्याला नायलॉन मांजा अडकला. त्याने गाडी थांबवून गळ्यावर हात फिरवला असता त्याला गळ्याला गंभीर दुखापत झाल्याचे आढळले. त्याचा गळा तब्बल 7 ते 8 इंच कापला गेला होता.
चैतन्यने ही गोष्ट आपल्या मामाला फोन करून सांगितली. त्यानंतर त्याचे मामा सुदर्शन लटपटे यांनी तत्काळ त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. तिथे वेळीच उपचार मिळाल्याने मोठा अनर्थ टळला. चैतन्य मूळचा परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील आहे. तो नीटची तयारी करण्यासाठी विद्यापीठ परिसरातील बेगमपुरा भागात राहतो.
प्रशासनाचे पथक कुचकामी
औरंगाबाद शहरात अनेक ठिकाणी बंदी असलेला नायलॉन मांजा बिनधोकपणे विक्री केला जातो. त्यामुळे अशा लोकांवर कारवाई करण्यासाठी पोलिस आयुक्त निखील गुप्ता यांनी एक विशेष पथक नियुक्त केले आहे. या पथकाकडून मांजा विक्रेत्यांवर कारवाई केली जात आहे. पण या घटनेमुळे अजूनही जिवितास धोका उत्पन्न करणारा हा मांजा विक्री होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ग्रामीण पोलिसांकडून 23 पथकांची स्थापना
नायलॉन मांजा खरेदी व विक्री करणाऱ्यांविरोधात ग्रामीण पोलिसांनीही विशेष पथकांची स्थापना केली आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, औरंगाबाद जिल्हयातील सर्व 23 पोलीस ठाण्यांमध्ये नायलॉन मांजा विरोधात कारवाई करण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच नायलॉन मांजा खरेदी-विक्री करणाऱ्या व्यक्तीची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला देण्याचे आवाहनही या प्रकरणी करण्यात आले आहे.
नागपुरात मुलीचा गळा कापला
नागपुरातही नायलॉन मांजामुळे मुलीचा गळा कापल्याची घटना घडली आहे. नागपूरच्या फारूक नगरात शुक्रवारी ही घटना घडली. यात सुदैवाने मुलीचा जावी वाचला असून, तिला 26 टाके पडल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित मुलगी रस्त्यावर खेळताना तिचा मांजाने गळा कापला गेला. तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.