आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:जरोडा येथे वीज पडून एका महिलेचा जागीच मृत्यू, तर चार महिला जखमी; पिंपळदरी येथे दोन जनावरे दगावली

हिंगोलीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जखमी झालेल्या चारही महिलांना उपचारासाठी आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल

कळमनुरी तालुक्यातील जरोडा येथे झाडावर वीज पडल्याने झाडाखाली थांबलेल्या महिलेसह एक शेळी ठार झाली आहे. तर चार महिला जखमी झाल्या आहेत. सोमवारी ता. 7 दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. इंदिराबाई कोंडबाराव भिसे (78) असे मयत महिलेचे नाव असल्याचे महसुलच्या सुत्रांनी सांगितले.

याबाबत अधिक माहिती अशी की, कळमनुरी तालुक्यातील जरोडा शिवारात पेरणीपुर्व मशागतीची कामे सुरु आहेत. आज सकाळी गावातील काही महिला मजूर शेतकरी देवराव भिसे पाटील यांच्या शेतात कामासाठी गेल्या होत्या. त्यानंतर दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास अचानक विजेच्या कडकडाटास पावसाला सुरवात झाली. त्यामुळे इंदिराबाई व इतर महिला एका शेळीला घेऊन झाडाखाली थांबल्या. काही वेळातच झाडावर वीज कोसळली. यामध्ये इंदिराबाई यांचा मृत्यू झाला तर शेळी देखील दगावली. तसेच रेणुका प्रकाश भिसे, सुरेखा प्रभाकर भिसे, जिजाबाई गायकवाड, आकुबाई सूर्यवंशी या जखमी झाल्या.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावकऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी झालेल्या चारही महिलांना उपचारासाठी आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती आखाडा बाळापूर पोलिसांसोबतच कळमनुरी तहसील कार्यालयास देखील देण्यात आली आहे. घटनास्थळी आखाडा बाळापूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रवीकांत हुंडेकर, जमादार संजय मार्के, मधुकर नागरे यांच्या पथकाने भेट दिली आहे. मयत इंदिराबाई यांच्या पश्‍चात पती, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

पिंपळदरी येथे दोन जनावरे दगावली
औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथे वीज कोसळून दोन जनावरे दगावली आहेत. गावातील केशव रिठ्ठे यांनी त्यांच्या मालकीचा बैल व गाय घरासमोर झाडाखाली बांधली होती. दुपारी अचानक वीज कोसळून बैल व गायीचा मृत्यू झाला. यामुळे रिठ्ठे यांचे मोठे नुकसान झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...