आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावारसास्थळावर मातीची चाचणी केल्यास गुन्हे दाखल करू : उद्धव
कोकणी माणसाला उद्ध्वस्त करणारा रिफायनरीचा प्रकल्प मी नाणारमध्ये होऊ दिला नाही. आता बारसूमध्येही होऊ देणार नाही, असा इशारा उद्धव सेनेचे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी महाड येथे आयोजित ‘शिवगर्जना’ मेळाव्यात सरकारला दिला.
तत्पूर्वी सकाळी ठाकरेंनी बारसूत जाऊन शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतली. तेे म्हणाले, ‘जागतिक वारसा असलेली अनेक कातळशिल्पे बारसूत आहेत. त्यांच्या संवर्धनाचा प्रस्ताव युनेस्कोला पाठवला आहे. प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पापासून ही जागा १०० मीटरवरच आहे. नियमानुसार इथे कुठलेही विकासकाम करता येत नाही. पण रिफायनरीसाठी मातीची चाचणी केली जात आहे. असे करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील,’ असा इशारा ठाकरेंनी दिला.
महाडच्या सभेतही त्यांनी भाजप व शिंदेसेनेचा समाचार घेतला. गद्दारांनी मलिदा खाऊन उपऱ्यांना इथल्या जमिनी विकल्या. हे गद्दार माझ्याकडे बारसू प्रकल्पासाठी यायचे म्हणून मी तेव्हा पत्र दिले होते. पण जोवर कोकणी बांधव संमती देत नाही तोपर्यंत मी हा प्रकल्प होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
टार्गेट राणे : माझ्यावर टीका केली तरच भाकरी मिळते
राणे पिता-पुत्रांवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘इथे काही जणांना माझ्यावर रोज टीका केली तरच भाकरी मिळते. विशेष म्हणजे ते एकावर दोन फ्री आहेत. काय करावे त्यांना समजत नाही. डोक्यावरचा टोप सांभाळावा तर दोन्ही पोरं सुटतात अन् दोन पोरं सांभाळायची तर डोक्यावरचा टोप जाईल अशी भीती त्यांना वाटते.’
टार्गेट शिंदे : कर्नाटकात जाऊन भांडी घासली
‘आमच्या मिंध्यांनी कर्नाटकात जाऊन त्यांची भांडली घासली. आपले मुख्यमंत्री तिकडे कानडीत जाहिरात करत आहेत. तर तेथील मुख्यमंत्री बोम्मई मराठी माणसाविरोधात पुन्हा बरळले आहेत. अनेक वर्षे तिथे भाषिक अत्याचार सुरू आहे. तिथे जाऊन त्यांना जाब विचारण्याची मिंध्यांमध्ये हिंमत आहे का?’ असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
कातळशिल्पांच्या ३ किमी भागात प्रकल्प होऊच शकत नाही : राज ठाकरे
बारसूजवळ युनेस्कोला कातळशिल्पे सापडलीत. जागतिक वारसास्थळ असलेल्या अशा ठिकाणापासून सुमारे ३ किमीवर कोणतेही बांधकाम, प्रकल्प उभारणी करताच येत नाही.त्यामुळे इथे रिफायनरीही होऊ शकत नाही. माझी कोकणवासीयांना विनंती आहे, आपल्या जमिनी कवडीमोल दरात कुणालाही विकू नका, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शनिवारी रत्नागिरीतील सभेत केले.
‘कोकणात मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक संपदा आहे. केरळसारखे राज्य पर्यटनावर चालते तितकीच इथेही क्षमता अाहे. संपूर्ण महाराष्ट्राला एकटा कोकण पोसू शकतो. मात्र इथे तशी विकासकामे झाली नाहीत. कोकणातील जमिनी कवडीमाेल दरात घेऊन नंतर त्या प्रकल्पांसाठी कोट्यवधीत विकायच्या, असा धंदा लोकप्रतिनिधींनी केला. दाभोळ, जैतापूर, नाणार व बारसूमध्ये हेच झाले. तिकडे समृद्धी महामार्ग चारच वर्षंात शिर्डीपर्यंत पूर्ण झाला. गोवा-मुंबई महामार्गाचे काम मात्र १६ वर्षांपासून रखडले आहे. तुमचे आमदार-खासदार याबाबत जाब विचारत नाहीत. कारण त्यांनी तुम्हाला गृहीत धरलेय. अशा नेत्यांना आता तरी धडा शिकवा,’ असे आवाहन राज यांनी केले.
टार्गेट पवार : ‘दादा’गिरीस घाबरले असतील काका
मला वाटते शरद पवारांना राजीनामा द्यायचाच होता. पण ज्या वेळी त्यांनी हा निर्णय जाहीर केला तेव्हा अजित पवार कसे बोलत होते? ते पाहूनच कदाचित त्यांनी निर्णय मागे घेतला असेल. ‘हा अाताच उर्मट बोलतोय, उद्या आपल्याला राजीनामा दिल्यावर कसा बोलेल याची चिंता त्यांना पडली असेल,’ असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.
टार्गेट उद्धव : मग महापौर बंगला कसा हडपलात?
उद्धव ठाकरेंवर टीका करताना राज म्हणाले, ‘शिवसेनेची भूमिका नक्की काय आहे? त्यांचे खासदार रिफायनरीला समर्थन देतात. तर पक्ष नसलेले प्रमुख म्हणतात लोकांच्या भावना असतील तसे होईल. मग मुंबईचा महापौर बंगला बाळासाहेबांच्या स्मारकासाठी हडपलात तेव्हा तेथील जनतेला विचारले होते का?’
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.