आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोटनिवडणूक:पंढरपुरात भाजपला प्रथमच ‘समाधान’, राष्ट्रवादीचे ‘भगीरथ’ प्रयत्न फसले, पंढरपूर विधानसभा अन् बेळगाव लोकसभा मतदारसंघात भाजप विजयी

पंढरपूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • एक लाखावर मताधिक्य घेत शुभम शेळकेंनी दाखवले मराठी सामर्थ्य

राज्याचे लक्ष लागून असलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांचा ३ हजार ७३३ मतांनी पराभव केला. या मतदारसंघात भाजपने प्रथमच विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या महाविकास आघाडीला या प्रतिष्ठेच्या लढाईत पराभवास सामोरे जावे लागले. दरम्यान, बेळगाव लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीतही भाजपच्या मंगला अंगडी यांनी काँग्रेसच्या सतीश जारकीहोळी यांचा ५,२४० मतांनी पराभव केला.

पंढरपुरात भाजपच्या समाधान आवताडे यांना १ लाख ९ हजार ४५०, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांना १ लाख ५ हजार ७१७ मते मिळाली. आवताडे यांनी ३ हजार ७३३ मतांनी भालके यांचा पराभव केला. राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक झाली. मतमोजणीच्या एकूण ३८ फेऱ्या झाल्या. एकूण १९ उमेदवार रिंगणात होते. भाजपच्या आवताडे यांनी सहाव्या फेरीपासून अखेरपर्यंत आघाडी घेतली. एकेका फेरीची आकडेवारी जाहीर होत गेली तसतसा भाजप समर्थकांनी विजयी जल्लोष सुरू केला.

१९ व्या फेरीपर्यंत म्हणजे पंढरपूर शहर आणि ग्रामीण भागातील मतमोजणी होईपर्यंत आघाडी कायम ठेवली. त्यानंतर मंगळवेढा येथील मतमोजणी सुरू होताच मतांच्या आघाडीत चांगल्या वाढीचे सातत्य दिसले. आवताडे यांना ३५ व्या फेरीअखेर ४ हजार ५४९ मतांची आघाडी होती.

अजित पवार, जयंत पाटलांची मेहनत व्यर्थ : शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन भाजपविरुद्ध या निवडणुकीत रणशिंग फुंकले होते. मात्र, तरीही राष्ट्रवादीला जागा राखता आली नाही. विशेष म्हणजे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मतदारसंघात मुक्काम ठोकला होता. गावोगावी जाऊन प्रचाराची रणनीती आखली होती. मात्र, तरीही भाजपने ही जागा राष्ट्रवादीच्या तावडीतून आपल्याकडे खेचून आणली आहे.

भेगडे, परिचारक, मोहिते आणि निंबाळकर यशस्वी :पोटनिवडणुकीसाठी भाजपचे बाळा भेगडे, आमदार प्रशांत परिचारक, युटोपियन शुगर्सचे अध्यक्ष उमेश परिचारक, आमदार रणजितसिंह मोहिते, धैर्यशील मोहिते, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, गोपीचंद पडळकर, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी भाजपच्या प्रचाराची भिस्त यशस्वीरीत्या सांभाळली.

पहिल्यांदाच मतदारसंघात कमळ फुलले
सत्ताधारी आणि विरोधकांकडून ही पोटनिवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची करण्यात आलेली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच विरोधी भाजपकडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या निवडणुकीत वैयक्तिक लक्ष घातले होते. आपण केलेल्या कामांची पावती राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या विजयामुळे आम्हाला मिळणार असे सत्ताधारी महाविकास आघाडीकडून सांगितले जात होते, तर दुसरीकडे राज्य सरकारच्या विरोधात जनतेमधील रोष या निवडणुकीद्वारे प्रकट होणार, ही निवडणूक म्हणजे आमच्या दृष्टीने लिटमस टेस्ट असल्याचे विरोधक सांगत होते. अखेर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात आवताडेंच्या विजयाने भाजपचे कमळ फुलले.या निवडणुकीत शिवसेना आणि काँग्रेसच्या राज्यपातळीवर नेत्यांनी प्रचारासाठी पाठ फिरवल्याने राष्ट्रवादीने नाराजी व्यक्त केली,.

ममता बॅनर्जींंच्या विजयाने ‘ठाकरे’ सरकारवरचे विघ्न टळले
अशोक अडसूळ | मुंबई
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपचा सपशेल पराभव केल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकारला मोठाच दिलासा मिळाला आहे. बंगालमधील नामुष्कीच्या पराभवाने भाजप बॅकफूटवर गेला असून २ मेनंतर राज्यात ‘आॅपरेशन कमळ’ घडवून आणून सत्ता काबीज करण्याच्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या इराद्याला ब्रेक लागला आहे. आपल्याकडे सर्वाधिक १०५ संख्याबळ असूनही विरोधी पक्षात बसलो आहोत आणि काँग्रेससारखा लहान पक्ष मात्र सत्तेत आहे, अशी सल राज्यातील भाजप नेत्यांना आहे. सरकारच्या गेल्या दीड वर्षाच्या काळात भाजप नेत्यांकडून उद्धव सरकार पाडण्याचे अनेकदा जाहीर इशारे दिले गेले आहेत. त्यामुळेच पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर महाराष्ट्रातील राजकीय हालचाली गतिमान होतील, अशी चर्चा दिल्लीपासून मुंबईपर्यंत होती. त्यामागे पश्चिम बंगालमध्ये भाजप सहज २०० जागा जिंकेल असा होरा होता. तोच धागा पकडून पंढरपूर पोटनिवडणुकीच्या प्रचारात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘हे सरकार कधी बदलायचे ते माझ्यावर सोडा, आपण सरकारचा करेक्ट कार्यक्रम करू,’ अशी जाहीर वाच्यता केली होती.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘उद्धव सरकार कधी पडणार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माहिती आहे,’ असे म्हटले होते. भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ‘कुछ देर की खामोशी है, सिर्फ तीन महिने बाकी है, हमारा दाैर फिरसे आयेगा,’ असा इशारा मार्च महिन्यात झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिला होता.

एकतर सत्ताधारी पक्षातील आमदार पैशाचे आमिष दाखवून अन्यथा चौकशीचा ससेमिरा लावण्याची भीती घालून भाजपकडून फोडले जाऊ शकतात. नाहीतर कोरोना संसर्ग रोखण्यात राज्य सरकारला अपयश आल्याचे कारण दाखवून राष्ट्रपती राजवट लावली जाण्याची भीती होती, अशी कबुली शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी रविवारी दिली.

आज ना उद्या आपले सरकार येणार आहे, असे भाजप नेते बोलून दाखवत होते. त्याच भूमिकेतून आघाडी सरकारचे अनेक मोठे निर्णय राज्यपाल अन् केंद्राने प्रलंबित ठेवले आहेत. विधान परिषदेवरील १२ राज्यपाल नामनियुक्त जागांची मंजुरी प्रलंबित ठेवण्यामागे आॅपरेशन कमळचा आत्मविश्वास कारणीभूत आहे.

मोदी-शहा आणि भाजपचा पराभव करता येऊ शकतो हे पश्चिम बंगालने दाखवून दिले. त्यामुळे राष्ट्रवादी, शिवसेना सारख्या प्रादेशिक पक्षांचा आत्मविश्वास दुणावला असून ममतांचा विजय उद्धव सरकारच्या पथ्यावर पडला आहे. कारण राज्यातील आॅपरेशन कमळला काही काळासाठी तरी ब्रेक लागला आहे.

प्रिया सरीकर | कोल्हापूर
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या मंगला अंगडी यांनी ५ हजार २४० मतांनी विजय मिळवला आहे.बेळगाव लोकसभा मतदारसंघांत निवडून येणाऱ्या मंगला अंगडी पहिल्या महिला खासदार ठरल्या आहेत. दरम्यान, या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांनी तब्बल एक लाखाचा टप्पा ओलांडून घेतलेली १ लाख १७ हजार मते सीमाभागातील मराठी भाषिक मतदारांत नवचैतन्य निर्माण केले आहे. सप्टेंबर २०२० मध्ये केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री आणि बेळगावचे दिवंगत खासदार सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे निधन झाले होते. त्यामुळे बेळगावात पोटनिवडणूक घेण्यात आली. भाजपने अंगडी यांच्या पत्नीलाच उमेदवारी दिली होती. एकूण १० उमेदवार रिंगणात होते. भाजपकडून मंगला अंगडी, काँग्रेसकडून सतीश जारकीहोळी तर महाराष्ट्र एकिकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके हे रिंगणात होते. कर्नाटक राष्ट्र समितीकडून विवेकानंद बाबू घंटी उमेदवार होते. बेळगाव लोकसभा मतदारसंघात एकूण ८ विधानसभा मतदारसंघ येतात. ज्यामध्ये बेळगाव उत्तर, बेळगाव दक्षिण, बेळगाव ग्रामीण, गोकाक, रामदुर्ग, अरभावी, सौदत्ती यल्लमा या विधानसभा मतदारसंघाचा समावेश होता.

बातम्या आणखी आहेत...