आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परभणी कोरोना अपडेट:25 दिवसांची तपश्‍चर्या ठरली फोल, परभणीत आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण

परभणीएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • ग्रीन झोन मधून जिल्हा पडला बाहेर, आता ऑरेंज झोनमध्ये

लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यापूर्वीचे दोन दिवस, लॉकडाऊनचे 21 दिवस व नंतरचे दोन दिवस अशी तब्बल 25 दिवसांची प्रशासनाने केलेली तपश्‍चर्या गुरुवारी (दि.16) अखेर फोल ठरली. पुण्याहून आलेल्या एका युवक कामगाराचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ग्रीन झोनमध्ये असलेला हा जिल्हा आता ऑरेंज झोनमध्ये गेला आहे.

परभणी शहराच्या नव्याने असलेल्या एका वसाहतीतील  21 वर्षीय युवक कामगार पुण्याहून तीन दिवसांपूर्वीच परभणीत दाखल झाला होता. त्याला सर्दी, ताप व खोकला असल्याने मंगळवारी (दि.14) तो येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाला होता. वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी नंतर त्याचा स्वॅब अहवाल प्रयोगशाळेस पाठविला होता. तो अहवाल गुरुवारी सकाळी 11 च्या सुमारास प्राप्त झाल्यानंतर प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. हा अहवाल पॉझिटीव्ह असल्याची वार्ता लगेचच सर्वत्र पसरल्यानंतर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

तपश्‍चर्या ठरली फोल

जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनपूर्वीच दोन दिवस अगोदर बंद पाळला होता. 21 दिवसांतही अत्यंत कठोरपणे निर्णय घेत लोकांना रस्त्यावर येण्यापासून रोखले होते. किराणा, भाजीपाला आदी अत्यावश्यक सेवांमध्ये देखील प्रशासनाने कडक निर्बंध घातल्याने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये रुग्ण पॉझिटिव्ह आढळून येत असतांना परभणी मात्र निरंक होते. याचाच आनंद प्रशासकीय वर्तूळासह सर्वसामान्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर होता. विशेषतः शासनाने एकही रुग्ण नसल्याने ग्रीन झोनमध्ये जिल्ह्याचा समावेश केल्याने येत्या 20 एप्रिल पासून काही प्रमाणात लॉकडाऊनमध्ये शिथिलता येईल, असे अपेक्षित होते. परंतू मध्येच माशी शिंकली अन् या युवकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे प्रशासनासह सर्वांचीच तपश्‍चर्या फोल ठरली आहे.

परभणीतील प्रवेश आश्‍चर्यकारक

शहरातील रहिवाशी असलेला व कुशल कामगार असलेला हा युवक पुण्यामध्ये कारागिरी करीत होता. लॉकडाऊनच्या काळात त्याचा या जिल्ह्यातील प्रवेश कसा झाला, असा मोठा प्रश्‍न या निमित्ताने निर्माण होत आहे. तो हिंगोली जिल्ह्यातील एका खेडेगावातील दोन तरुणांसोबत मोटारसायकलवरुन पुण्यातून निघाला होता. परभणीत तो मोटारसायकलवरच दाखल झाला. त्यानंतर तो तालुक्यातीलच एका गावात दोन दिवस वास्तव्यासही होता, अशी माहिती आहे. यासर्व बाबींची प्रशासन खातरजमा करीत असून त्याच्याशी संबंधित सर्वांनाच सायंकाळी उशीरापर्यंत क्वॉरंटाईन करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...