आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परभणी:जिल्ह्यातील जलप्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
ढलेगाव उच्च पातळी बंधारा - Divya Marathi
ढलेगाव उच्च पातळी बंधारा

परभणी जिल्ह्यातील जलप्रकलांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने आणि ऊर्ध्व भागातील जलप्रकल्पातून होणारा विसर्ग पाहता जिल्ह्यातील जलप्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे.

येलदरी धरण 100 टक्के भरले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात झालेला पाऊस आणि उर्ध्वभागात असलेल्या खडकपूर्णा धरणातून ही विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे येलदरी धरणात पाण्याची आवक वाढल्याने धरणाच्या 10 दरवाज्यामधून बुधवार रोजी 1 लाख 3 हजार 261 क्यूसेगने पूर्णा नदी पात्रात विसर्ग सुरू होता. त्यामुळे धरणाच्यासमोर मराठवाडा आणि विदर्भाला सेनगाव मार्गे जोडणारा कमी उंचीचा पूल पाण्याखाली गेल्याने वाहतुकीसाठी बंद झाला. तर धरण परिसरात नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत होते. त्यामुळे याठिकाणी कोणतीही दुर्घटना घडू नये, म्हणून येलदरी धरण आणि धरणासमोरील नदी पात्राच्या 500 मिटर परिसरात दि. 6 ऑक्टोबर रोजीच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 चे कलम 144 नुसार मनाई आदेश जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी जारी केले आहेत. त्यामुळे या क्षेत्रात लोकांना जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच येथे छायाचित्र अथवा सेल्फी काढणे इत्यादी बाबीसही मनाई करण्यात आली आहे.

दरम्यान, निम्न दुधना प्रकल्पही 100 टक्के भरला आहे. बुधवारी प्रकल्पाच्या 10 गेटमधून 21 हजार 660 क्यूसेगने दुधना नदी पत्रात विसर्ग करण्यात येत आहे. तर दुसरीकडे बुधवारी सायंकाळच्या सुमारास गोदावरी नदीवरील ढलेगाव उच्च पातळी बंधाऱ्याच्या 8 गेट मधून 48 हजार 633 क्यूसेगने विसर्ग सुरू होता. तारुगव्हान बंधाऱ्याच्या 17 गेट मधून 1 लाख 36 हजार 719 क्यूसेगने विसर्ग सुरू होता. मुद्द्गल बंधाऱ्याच्या 15 गेट मधून 1 लाख 79 हजार 278.44 क्यूसेगने विसर्ग सुरू होता. तर डिग्रस बंधाऱ्याच्या 14 गेट मधून 3 लाख 74 हजार 341 क्यूसेगने विसर्ग सुरू होता. यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत होती. तर जायकवाडी धरणातून होणारा विसर्ग पाहता या बंधाऱ्यातुन होणारा विसर्ग कमी जास्त केला जाऊ शकत असल्याने नदी काठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

पुलावरून पाणी जात असलेल्या मार्गाने प्रवास करणे टाळावे-

जिल्ह्यातील धरणे, उच्च पातळी बंधारे, मध्यम प्रकल्प, साठवण तलाव इत्यादी मधून सद्यस्थितीत अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तरी जिल्ह्यातील बऱ्याचशा रस्त्यावरील कमी उंचीच्या पुलावरून पाणी जात असल्याने नागरिकांनी या पुलावरून प्रवास करू नये, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सचिव महेश वडदकर यांनी केले आहे.

जिल्ह्यात पूर्णा तालुक्यातील माटेगाव, चुडावा, धानोरा काळे,आहेरवाडी आणि पूर्णा तर पाथरी तालुक्यातील रेनापुर, बोरगव्हाण, खेरडा, हादगाव, तुरा, वाघाळा आणि सोनपेठ तालुक्यातील गोरदळे नाला, शिरोरी, विटा खु, कान्हेगाव, डोबाडी तांडा आदी जिल्ह्यातील कमी उंचीच्या पुलाची ठिकाणे आहेत. तरी या मार्गावरून प्रवास करणे नागरिकांनी टाळावे. असेही कळविण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...