आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परभणी:पुरामध्ये वाहून जाणाऱ्या पाच नागरिकांना आधी वाचवले, नंतर त्याच पाण्यात ग्रामस्थांचा ठिय्या

परभणी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथील फाल्गुनी नदीत ट्रॅक्टरसह वाहून जाणाऱ्या पाच जणांचे प्राण शेळगाव ग्रामस्थांनी वाचवल्याची घटना रविवारी (दि.१७) रात्री घडली.

शनिवारी सोनपेठ तालुक्यातील गोदाकाठला जोडणाऱ्या शेळगाव उक्कडगाव रोडवरील फाल्गुनी नदीला रविवारी सकाळपासूनच पूर आला होता. एका ट्रॅक्टरचालकाने रात्री आठ वाजता पूल ओलांडण्याचे धाडस केले. दुचाकी घेऊन इतर दोघेही यात बसले. सर्वच जण वाहून जात होते. यातील दोघांना पोहता येत नसल्याने ते बुडत होते. परंतु, नदीपात्रातील एका चिल्लरीच्या झाडाला ते अडकले. तर पोहता येणाऱ्या तिघांनी झाडाचा आसरा घेतला. ग्रामस्थांच्या मदतीने दीपक गुलाब कदम (२७), बाबासाहेब सुभाष कदम (३२, दोघे रा. थंडीपिंपळगाव), गोट्या राजेभाऊ कांबळे (४५, रा. शेळगाव), रामा धुराजी उफाडे (४३, रा गंगापिंपरी), शिवाजी बबन आडे (४२, रा. शेळगाव तांडा) यांना वाचवण्यात यश आले.

वारंवार मागणी करून पुलाची उंची वाढेना म्हणून आंदोलन
परभणी | सोनपेठ तालुक्यातील शेळगाव उक्कडगाव रोडवरील फाल्गुनी नदीच्या लहान पुलावरुन नेहमीच पाणी वाहते. या पुलावरुन पाणी गेल्यास गोदाकाठच्या अकरा गावांचा संपर्क तुटतो. रविवारी रात्रीही याच पुलावरून ट्रॅक्टरसह पाच जण वाहून जात हाेते. पण ग्रामस्थांनी प्रयत्नांची शर्थ करून सर्वांना बाहेर काढले. सोमवारी मात्र पुलावरून वाहणाऱ्या पाण्यात बसून आंदोलन केले व पुलाची उंची वाढवून दुरूस्तीची मागणी त्यांनी केली. या पुलावरून सतत नागरिक, जनावरे वाहुन जाण्याच्या घटना घडत असतात. यामुळे शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुधीर बिंदू यांच्या नेतृत्वाखाली विश्वंभर गोरवे, अनिल रोडे, सोमनाथ नागुरे यांनी आंदोलन केले. या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मीकांत देशमुख यांच्यासह शेळगाव येथील ग्रामपंचायत सरपंच, सदस्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. पोलिस निरीक्षक प्रदीप काकडे, नायब तहसीलदार अनिल घनसावंत यांनी निवेदन स्विकारले.

बातम्या आणखी आहेत...