आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परभणी:घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांचा पर्दाफाश; टोळीतील 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यात, 23 ठिकाणी गुन्हे केल्याची आरोपींकडून कबुली

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोडी, चोरी करणाऱ्या दोन गुन्हेगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. परभणी पोलिसांनी मोठ्या शिताफीने 14 सप्टेंबर रोजी मिळालेल्या माहितीनुसार कारवाई करत बीड जिल्ह्यातून ताब्यात घेतले. या आरोपींकडून रोख रक्कमेसह सोने, चांदी असा एकूण 7 लाख 30 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

आरोपींनी परभणी जिल्ह्यात 23 ठिकाणी गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. आता या आरोपींचे इतर 5 ते 6 साथीदार असल्याचा संशय पोलिसांना असून त्यांचा शोध सुरू आहे. या टोळीने महाराष्ट्राबाहेर ही गुन्हे केले असावेत असा ही संशय पोलिसांचा आहे. विशेष म्हणजे परभणी पोलिसांनी पकडलेले दोन्ही आरोपी पहिल्यांदाच पोलिसांच्या हाती लागले आहेत. तर यांची टोळी पाल ठोकून गावाबाहेर राहते. त्यानंतर रेकी करून घरफोडी करत. अशी त्यांची काम करण्याची पद्धत आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा आणि पालम पोलिसांनी तपास करत आरोपींना पकडले असल्याची माहिती परभणीचे पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी शनिवार 18 सप्टेंबर रोजी पत्रकार परिषदेत दिली आहे. याप्रकरणी अधिक माहिती अशी की, परभणीच्या पालम तालुक्यातील बनवस येथे जुलै महिन्यात एक घरफोडी झाली होती. या प्रकरणी पालम पोलीस ठाण्यात गुन्हा दखल झाल्या नंतर पोलिसांनी तपास सुरू केला. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे फिरवत या प्रकरणी परभणी शहरातील संत तुकाराम कॉलेजचे मैदाना मध्ये पाल टाकून राहणारा आरोपी सुरेश उर्फ गुप्ता जगदीश ऊर्फ शंकर शिंदे (रा.करमतांडा ता. सोनपढ़, जि. परभणी. ह.मु. टोकवाडी ता.परभणी जि. बीड) यास 17 जुलै रोजी ताब्यात घेवून त्याचेकडून एकूण चार गुन्हे उघडकीस आणले होते. यात आरोपीकडून चोरीला गेलेल्या मुद्देमालापैकी एकूण 11 तोळे सोने आणि 1 लाख 41 हजार 500 रुपयांच्या रोख रक्कमेस एकूण 6 लाख 41 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.

या आरोपीने सदर गुन्हा इतर साथीदारांच्या मदतीने केल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते. दरम्यान पालम पोलीस स्टेशनचे सपोनि विशाल बहात्तरे यांना या गुन्ह्यात पाहिजे असलेले इतर आरोपी हे पांगरी (ता. परळी) येथे असल्याची माहीती मिळाली. त्यानंतर परभणीचे पोलीस अधीक्षक जयंत मीना यांचे आदेशाने स्थानिक गुन्हे शाखा आणि पालम पोलीसांचे संयुक्त पथक बनवून सापळा लावून आरोपी अंबू ऊर्फ शिवराज जगदीश ऊर्फ शंकर शिंदे आणि विधीसंघर्षग्रस्त बालक ह्या दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना विश्वासात घेऊन पोलिसांनी विचारपुस केली असता त्यांनी त्यांचे साथीदारासह परभणी जिल्ह्यात 23 ठिकाणी घरफोडी आणि दरोडा असे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. या आरोपीकडून आतापर्यंत 8 तोळा सोने, 44 तोळे चांदी आणि रोख 2 लाख 41 हजार असा एकूण 7 लाख 30 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या आरोपींनी परभणी जिल्ह्यातील पालम, गंगाखेड, पूर्णा, दैठणा, पिंपळदरी, सोनपेठ, बोरी या पोलीस ठाण्याच्या हद्दीत 23 ठिकाणी गुन्हे केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...