आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:पार्डीच्या शेतकऱ्याने तीन एकरवर केळीच्या बागेवर चालविला कोयता, बाजारपेठेत दर मिळत नसल्याने उचलले पाऊल

हिंगोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनामुळे संचारबंदी व बाजारपेठ बंद असल्याने केळीला योग्य भाव मिळत नसल्याने वसमत तालुक्यातील बागल पार्डी येथील शेतकरी दिगांबर पवार यांनी तीन एकर केळीच्या बागेवर कोयता चालविला आहे. हाताला आलेली बाग तोडतांना पवार यांच्या डोळ्यात आश्रू तरळू लागले होते.

वसमत तालुुक्यातील बागल पार्डी या परिसरातील शेतकरी ऊस, केळी, हळदीचे पिक घेतात. या तालुक्यामध्ये सिंचनासाठी पाण्याची व्यवस्था असल्याने हि पिके घेतली जात आहेत. या ठिकाणी घेतलेले केळी अर्धापूर, नांदेड येथील व्यापारी खरेदी करून नेतात.

बागलपार्डी येथील शेतकरी दिगांबर पवार यांनी त्यांच्या दहा एकर शेतापैकी तीन एकर शेतात केळीची बाग घेतली होती. मागील वर्षी मे महिन्यात केळीची लागवड केली. केळीपासून चांगले उत्पन्न मिळेल या आशेवर त्यांनी बागेला वेळोवेळी खत व पाणी देखील दिले. सध्या बागेतील घड काढणीच्या अवस्थेत आहेत. एका घडापासून सुमारे २० ते २५ किलो केळी मिळतात. बाजारपेठेतील दरानुसार उत्पन्न मिळते. बाजारपेठेत सुमारे ८०० ते १००० रुपये क्विंटल दर मिळाल्यास एका एकरातून किमान तीन लाख रुपये उत्पन्न मिळते.

मात्र कोरोनामुळे बाजारपेठ बंद असल्याने केळीचे दर चांगलेच घसरले आहे. सध्या केवळ दोनशे रुपये क्विंटल प्रमाणे केळी खरेदी केली जात आहे. त्यामुळे लागवडीचा खर्चही निघणे कठीण झाले आहे. खत व इतर मशागतीमध्ये एका एकरसाठी किमान सव्वा लाख रुपये खर्च येतो. मात्र यावर्षी दरच मिळाले नसल्याने व्यापारीही केळी खरेदीसाठी येईनासे झाले आहेत. त्यामुळे केळीची बाग तोडून आता खरीप हंगामात सोयाबीन घेण्याचा निर्णय त्यांनी घेतली.

कोरोनामुळे उदभवलेल्या या परिस्थितीमुळे हतबल झालेल्या शेतकरी पवार यांनी हाती कोयता घेऊन तीन एकरावरील बाग उध्वस्त केली. तळहाताच्या फोडासारखी जपलेल्या बागेवर कोयता चालवितांना त्यांच्या डोळ्यात आश्रू उभे राहिले होते.

कोरोनामुळे परिस्थिती अडचणीची : दिगांबर पवार, शेतकरी बागलपार्डी
मागील काही वर्षापासून शेतात केळीचे पिक घेतो. यावर्षी चांगलेच पिक हाती येईल या अपेक्षेने केळीची लागवड केली होती. मात्र सध्या बाजारपेठेत दर नाहीत. त्यामुळे लागवडीचा खर्चही मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे बाग कापून टाकण्याचे टोकाचे पाऊल उचलले. आता खरीप हंगामात सोयाबीनचे पिक घेणार आहे.

बातम्या आणखी आहेत...