आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादी काँग्रेसचा राज ठाकरेंवर निशाणा:तपासे म्हणाले, '...तर मराठी माणसासमोर त्यांना तोंड उघडता येणार नाही'

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना सध्या राज्यात पाहायला मिळत आहे. राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत घेतलेल्या भूमिकेनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर प्रतिहल्ला चढवला होता. आता राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची देखील जोरदार चर्चा आहे.

राज यांच्या आयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीनेही अयोध्येत बॅनरबाजी करण्यात आली आहे. तर भाजपच्या उत्तर प्रदेश मधील खासदारांनी देखील राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी या सर्व घडामोडींवर टीका केली आहे. राज ठाकरे उत्तर भारतीयांची माफी मागतील मात्र, नंतर मराठी माणसासमोर त्यांना तोंड उघडता येणार नाही, असे तपासे यांनी म्हटले आहे.

भाजपकडून राजकीय कोंडी

यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत सोशल मिडीया अकाउंट च्या माध्यमातून राज ठाकरे तसेच भारतीय जनता पक्षावर निशाणा साधण्यात आला आहे. यामध्ये त्यांनी राज ठाकरे यांची भाजपनेच राजकीय कोंडी केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

काय म्हणाले महेश तपासे

उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर येण्याआधी सबंध उत्तर भारतीयांची जाहीर माफी राज ठाकरे यांनी मागावी अशी अट भाजप खासदार ब्रिजभूषण शरणसिंह यांनी घातली असून ही अट फक्त राज ठाकरेंचा फुगवलेला इगो पंक्चर करण्यासाठीच आहे. ज्या उद्देशासाठी राज ठाकरे यांना स्क्रिप्ट लिहून दिली होती त्या राजकीय डावाला महाविकास आघाडीने हाणून पाडले आहे आणि म्हणूनच राज ठाकरे व त्यांचा पक्ष एकाकी पडल्याचे चित्र दिसत आहे. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागितली तर अयोध्येचा दौरा नक्कीच पूर्ण होईल. परंतु महाराष्ट्रात मराठी माणसासमोर परत राज ठाकरे यांना तोंड उघडता येणार नाही. राज ठाकरेंची अशी राजकीय कोंडी भाजपनेच केली आहे.

राज ठाकरे यांचे पक्ष पदाधिकाऱ्यांना आदेश

विशेष करून आयोध्या दौऱ्याबाबत मनसेच्या एकाही पदाधिकाऱ्याने माध्यमांशी किंवा इतरांशी चर्चा करू नये, असे आदेश राज ठाकरे यांनी दिले आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याबाबत सस्पेन्स कायम आहे. राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा नेमका कसा असेल? त्यांच्या सोबत कोण असतील? त्यांची आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट होणार आहे? का याबाबत स्पष्टता समोर आलेली नाही.

बातम्या आणखी आहेत...