आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी पाठपुरावा:बालविवाह प्रकरणात परभणीतील चाइल्डलाइनचे पथक मंजरथला, गावात चौकशी करून कारवाईची ठरणार दिशा

परभणी2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिनांक १९ जुलै रोजीचे वृत्त. - Divya Marathi
दिनांक १९ जुलै रोजीचे वृत्त.

शेतात खुरपणी करताना आई व तिच्या १३ वर्षीय मुलीला उसाच्या फडात नेत २८ वर्षीय तरुणासोबत तिचा बालविवाह लावल्याचा धक्कादायक प्रकार पाथरी तालुक्यातील मंजरथ येथे घडला होता. १९ जुलै रोजी “दिव्य मराठी’मध्ये हे वृत्त प्रकाशित होताच प्रशासन खडबडून जागे झाले असून जिल्ह्यातील चाइल्डलाइनचे तीन कर्मचारी व पाथरी पोलिस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांचे पथक चौकशीसाठी मंजरथ या गावात पोहोचले. या प्रकरणात सर्व चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची भूमिका अधिकाऱ्यांनी मांडली.

या प्रकरणात सोमवारी बऱ्याच घडामोडी झाल्या. मुलीचे मामा गणेश थोरात सकाळीच पाथरी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी पोहोचले असल्याचे त्यांनी सांगितले. पण दुपारी ४ वाजेपर्यंत याबाबत तक्रार दाखल घेण्यात आली नव्हती. वयाचा दाखला व इतर पुरावे घेऊन हजर होण्याचे पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. दरम्यान, याबाबतची बातमी प्रकाशित होताच सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. मुलीचे नातेवाईक व विवाहासाठी मध्यस्थी करणाऱ्यांची पथकाने माहिती घेतली. पथकात सहभागी मिलिंद साळवी म्हणाले की, अल्पवयीन मुलगी व तिचे पालक मूळ सेलू तालुक्यातील असून ऊसतोड करण्यासाठी पाथरीत आल्याची प्राथमिक माहिती आहे. आता या प्रकरणात मुलीच्या वयाचा दाखला आम्हाला मिळवायचा आहे. यासंदर्भातील सर्व माहिती आम्ही गोळा केली असून मुलगी सुरक्षित असल्याचीही खात्री करण्यात आली आहे. जिल्हा महिला बाल विकास अधिकारी गाेविंद अंधारे म्हणाले की, या प्रकरणात आधी चाैकशी करून ग्राम संरक्षण समितीच्या समक्ष या प्रकाराची माहिती घेतली जाईल व कारवाई करण्याच्या दृष्टीने काम सुरू होईल.

ठाण्यात कुणीच आले नाही
पोलिस अधीक्षक व मी स्वत: सकाळपासून पोलिस ठाण्यातच आहोत. पण अद्याप मुलीचा कुठलाही नातेवाइक तक्रार देण्यासाठी आला नाही. परभणीहून चाइल्डलाइनचे पथक निघाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. चौकशीनंतर निश्चित कायदेशीर कारवाई करू. - वसंत चव्हाण, पो. निरीक्षक, पाथरी

दु. ४ पर्यंत ठाण्यात होतो
बालविवाहाच्या प्रकरणात तक्रार देण्यासाठी मी पाथरी पोलिस ठाण्यात गेलो होतो. दुपारी ४ पर्यंत तेथे थांबलो. पण मुलीच्या वयाचा दाखला आणण्याची सूचना ठाण्यातील कर्मचाऱ्याने दिली. उद्या तक्रार दाखल करण्यास जाणार आहे. - गणेश थोरात, मुलीचे मामा.

चौकशीनंतर कारवाई होणार
मंजरथच्या घटनेबाबत उशिरा माहिती कळली. नेमका प्रकार काय घडला आणि यात कोण सहभागी होते त्यांची नावे शोधावी लागतील. कायद्याचे उल्लंघन झाले असे समोर आले तर दोषींविरुद्ध गुन्हे दाखल होतील. - संदीप बेंडसुरे, जिल्हा समन्वयक, चाइल्डलाइन, परभणी.

बातम्या आणखी आहेत...