आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
हिंगोली येथील शासकीय रुग्णालयामध्ये यशस्वी उपचार घेऊन कोरोना मुक्त झालेल्या रुग्णाला शुक्रवारी (17 एप्रिल) सत्कार करून टाळ्याच्या गजरामध्ये शासकीय रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. यावेळी रुग्णाच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.
हिंगोली येथील शासकीय रुग्णालयात 31 मार्च रोजी सर्दी खोकला व ताप यामुळे एका रुग्णाला आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर या रुग्णांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठवल्यानंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. हिंगोलीमध्ये कोरोनाचा पॉझीटीव्ह रुग्ण सापडल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाविनोद शर्मा पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी प्रशासनाच्या इतर बाजू सांभाळल्या. तर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ किशोर श्रीवास, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवाजी पवार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.गोपाल कदम, डॉ.नारायण भालेराव, यांच्या पथकाने मागील चौदा दिवसापासून त्या रुग्णावर उपचार केले होते. दररोज दिवसभरातून किमान आठ ते दहा वेळेस त्या रुग्णाच्या प्रकृतीची तपासणी केली जात होती. वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नामुळे त्या रुग्णाची प्रकृती स्थिर होती. आयसोलेशन वार्डमधील 14 दिवसाचा कालावधी संपल्यानंतर त्याचे 48 तासातील दोन स्वॅब नमुने तपासणीसाठी औरंगाबाद येथे पाठवले होते. सदर दोन्ही नमुने निगेटिव्ह आल्यानंतर प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला. आज दुपारी शासकीय रुग्णालय मधून सुट्टी देण्यात आली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीवास निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.कदम, डॉ. भालेराव यांच्यासह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. यावेळी त्या रुग्णाचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच टाळ्याच्या गजरामध्ये त्याला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. रुग्णालयातून सुट्टी मिळताच त्या रुग्णाच्या चेहर्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.