आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादळाचा कहर:रुग्ण ऑक्सिजनवर आणि उपचार यंत्रणा जनरेटरवर,तौक्तेने चुकवले काळजाचे ठोके

मंगेश फल्ले,मनोज व्हटकर| मालवण (सिंधुदुर्ग)4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
वीजपुरवठा बंद झाल्यानंतर जनरेटर लावल्याने आशा जिवंत आहेत. - Divya Marathi
वीजपुरवठा बंद झाल्यानंतर जनरेटर लावल्याने आशा जिवंत आहेत.
  • आधीच आरोग्य सुविधांचा अभाव, त्यात वादळाचा कहर

मालवण आणि परिसरातील ९० कोरोनाबाधित रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. चक्रीवादळामुळे रविवारपासूनच वीज गुल झाली. त्यामुळे ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांच्या नातलगांचे काळजाचे ठोके वाढले. पण आरोग्य प्रशासनाने हा धोका ओळखून जनरेटर सज्ज ठेवत ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवल्याने सर्वांनीच मोकळा श्वास घेतला. सध्या सिंधुदुर्ग आणि मालवणमध्ये वीज खंडित असून रुग्ण ऑक्सिजनवर व ऑक्सिजन आणि उपचार यंत्रणा जनरेटरवर असे चित्र आहे.

रविवारी आणि सोमवारी वादळामुळे विजेचे शेकडो खांब धराशायी झाल्याने वीज खंडित झाली. पण प्रशासकीय यंत्रणा सावध होती. पूर्ण क्षमतेचे जनरेटर तयार ठेवले होते. असे केले नसते तर ऑक्सिजनवरील रुग्णांचा श्वास थांबला असता. समुद्रकिनारा आणि सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पर्यटनाला आलेल्या मुंबईकरांनीच कोरोना वाढवल्याचा आरोप गावातले लोक करत आहेत. बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकही कोरोनाबाधित आढळल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

डॉ. बालाजी पाटील, आरोग्य अधिकारी
चार दिवसांत परिसरातील ६९२ लोकांनी लसीसाठी नोंदणी केली. मात्र लसच उपलब्ध नाही.

मंजू लक्ष्मी, जिल्हाधिकारी
आवश्यक ती सर्व मदत कोविड सेंटर, रुग्णालयांना पोहोचवत होतो. आता वीज जोडणीचे काम सुरू केले.

४८ तास बॅकअप देणारे जनरेटर बसवले
मालवणमध्ये चक्रीवादळाचा जोर अधिक होता. रविवारी वादळी वाऱ्यांमुळे आणि सोमवारी प्रत्यक्ष वादळ धडकल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजेचे शेकडो खांब कोसळले. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. आणखी दोन-तीन दिवस ही स्थिती असेल. पण प्रशासकीय यंत्रणेने १४ रुग्णालयांसाठी ४८ तासांचे बॅकअप देणारे जनरेटर तातडीने तैनात केले. मालवणमध्ये ५ जनरेटर लावले आहेत. अगदी मेणबत्ती, काडेपेटी पोहोचवली गेली. पण आता जनरेटर बिघडल्यास दुरुस्तीसाठी कोविड वॉर्ड असल्याने कोणी यायलाही तयार नाही. मालवण आणि परिसरात ५४८४ रुग्ण उपचार घेत आहेत. कुंभारमठमध्ये एकूण ७५ बेड असून पाच ऑक्सिजन बेड आहेत. मालवणमध्ये यापूर्वी २४ रुग्णांचा मृत्यू झाला असून ३१७ बाधित आहेत.

बातम्या आणखी आहेत...