आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pooja Chavan Suicide Case News And Updates; 12 Audio Recordings Handed Over To Police; Fadnavis Demands Inquiry; The Matter Is Likely To Surround The Minister Of Vidarbha

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण:12 ध्वनिफिती पोलिसांकडे सुपूर्द; फडणवीसांची चौकशीची मागणी; प्रकरण विदर्भातील मंत्र्याला भोवण्याची शक्यता

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘त्या’ मंत्र्यावर तत्काळ गुन्हा नोंदवा : चित्रा वाघ यांची मागणी

तीन दिवसांपूर्वी आत्महत्या केलेल्या बीड जिल्ह्यातील परळी येथील पूजा चव्हाण या तरुणीच्या कथित ध्वनिफिती राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांना शुक्रवारी सादर केल्या. या प्रकरणाची चाैकशी करून घटनेचा उलगडा करावा, अशी मागणी त्यांनी शुक्रवारी केली आहे.

बीड जिल्ह्यातील परळी येथील २२ वर्षीय पूजा चव्हाण या तरुणीने दोन दिवसांपूर्वी पुण्यातील वानवडी भागात आत्महत्या केली. या तरुणीच्या आत्महत्येस महाराष्ट्र विकास आघाडी सरकारातील एक कॅबिनेट मंत्री जबाबदार असल्याची चर्चा आहे. पूजा ज्या व्यक्तीशी बोलत आहे, अशा अनेक ध्वनिफिती समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्या आहेत. त्यासंदर्भात फडणवीस यांनी राज्याचे पोलिस महासंचालक यांना पत्र लिहिले. तसेच ध्वनिफिती जोडल्या आहेत. या ध्वनिफितीमध्ये पुरुषी आवाज कोणाचा आहे, ती व्यक्ती काय बोलते, या मंत्रिपदावर असलेल्या व्यक्तीने पूजाला आत्महत्या करण्यास भाग पाडले काय, यासंदर्भात सर्वंकष चौकशी करावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.

‘त्या’ मंत्र्यावर तत्काळ गुन्हा नोंदवा : चित्रा वाघ यांची मागणी

पूजा चव्हाण आत्महत्येस जबाबदार ‘त्या’ मंत्र्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवावा, अशी मागणी भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी शुक्रवारी केली. यासदंर्भात समाजमाध्यमांवर वाघ यांनी ध्वनिचित्रफीत टाकली असून पूजाची आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप त्यांनी केला. पूजाचा मोबाइल व लॅपटाॅप दरवाजा तोडून ताब्यात घ्या, असे हे मंत्री तिच्यासोबतच्या मित्रास का सांगत आहेत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

पोलिस चौकशी करत आहेत : उपमुख्यमंत्री अजित पवार

या प्रकरणावर सरकारची काय भूमिका हे स्पष्ट करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. राजकीय पक्षांना दुसरे काही काम नसल्याने या प्रकरणावरून ते वादंग निर्माण करत आहेत. मंत्री धनंजय मुंडेंवरही आरोप झाले. नंतर सत्य सर्वांसमोर आले, असेही ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...