आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्राईम:परभणी कोवीड सेंटर मधून पळालेल्या एका आरोपीस पारडा शिवारातून अटक, मुलीच्या आठवणीमुळे पळाल्याची कबुली

हिंगोली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी येथील कोवीड सेंटर मधून पळालेल्या खूनाच्या गुन्ह्यातील आरोपी विकास गोविंदपुरे यास हिंगोली तालुक्यातील पारडा शिवारातून बासंबा पोलिसांच्या पथकाने बुधवारी ता. २ पहाटे अटक केली आहे. त्याला परभणी पोलिसांच्या हवाली केले जाणार आहे.

हिंगोली तालुक्यातील पारडा शिवारात सुमारे सात महिन्यापुर्वी जादूटोणा करण्याच्या कारणावरून शंकर अलझेंडे यांचा खून झाला होता. या प्रकरणी बासंबा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. बासंबा पोलिसांच्या पथकाने विकास गोविंदपुरे, बाळू तोरकड, विकास तोरकड यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. तेव्हा पासून विकास गोविंदपुरे हा परभणीच्या कारागृहात होता.

दरम्यान, त्याला कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यास कोवीड सेंटर मध्ये ठेवण्यात आले होते. मात्र दोन दिवसांपुर्वीच संधीचा गैरफायदा घेत विकास गोविंदपुरे व अन्य दोघे जण फरार झाले होते. या प्रकरणाची माहिती परभणी पोलिसांनी बासंबा पोलिसांना दिली होती. त्यावरून पोलिस अधिक्षक योगेशकुमार, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे, उपाधिक्षक रामेश्‍वर वैंजने यांच्या मार्गदर्शनाखाली बासंबा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश मलपिल्लु, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मगन पवार,जमादार सचिन गोरले, प्रविण राठोड यांच्या पथकाने मंगळवारी ता. १ सायंकाळ पासून पारडा शिवारात शोध मोहिम सुरु केली होती. त्यानंतर आज पहाटे तो एका शेतात लपून बसल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी अलगद टाकलेल्या वेढ्यात तो अडकला. पोलिसांना पाहताच विकास घाबरून गेला. मला मारू नका मी येण्यास तयार आहे असे सांगत तो पोलिसांच्या हवाली झाला. त्याला कोरोनाची लागण असल्याने पोलिसांनी त्यास सामाजिक अंतर पाळत अटक केली आहे. त्याला परभणी पोलिसांच्या हवाली केले जाणार असल्याचे बासंबा पोलिसांनी सांगितले.

मुलीची आठवण येत असल्याने पळालो
पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली असता, मुलगी एक वर्षाची आहे. मुलीची आठवण येत असल्याने आपण कोवीड सेंटर मधून पळाल्याचे त्याने बासंबा पोलिसांना चौकशीमध्ये सांगितले आहे.