आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हतबलतेतून आलेली आत्मनिर्भरता!:रायगडकर अनुभवताहेत वादळानंतरचा अंधार...‘निसर्गा’च्या तडाख्यानंतर 18 दिवसांपासून वीज नाही

अलिबाग (जयप्रकाश पवार)एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वीज नाही म्हणून इंटरनेट नाही, नेट नाही म्हणून बँक नाही

झगमगत्या मुंबईपासून अवघ्या दीडशे किमीवर असलेल्या नागावमधील गल्लोगल्लीत गेल्या तब्बल १८ दिवसांपासून दाटलेला अंधार दूर करण्यासाठी आता रहिवाशांनाच ‘साथी हात बढाना’ म्हणत रस्त्यावर उतरणे भाग पडत आहे. निसर्ग चक्रीवादळानंतर तीन आठवडे उलटूनही नागाव-चौल परिसरात शासन-प्रशासन ढिम्मच असल्याचे पाहून गावकरीच आता त्यासाठी पुढे सरसावले आहेत. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी जागोजागी उन्मळून पडलेले वृक्ष, विजेचे खांब, तारा हटवण्याची गावकऱ्यांची सुरू असलेली केविलवाणी धडपड काळजाला चटका लावणारी आहे. एक प्रकारे ही हतबलतेतून आलेली आत्मनिर्भरताच असल्याचे म्हणावे लागेल.

३ जूनच्या निसर्ग वादळाने झालेली धूळधाण सावरण्यासाठी नागावच्या प्रत्येक गल्लीत सध्या लोक घोळक्या घोळक्याने रस्त्यांवर उतरलेले दिसतात. काही जण आडव्या पडलेल्या झाडांच्या फांद्या तोडताना दिसतात, तर काही जण कमरेतून वाकलेले लोखंडाचे जुने खांब उतरवून सिमेंटचे खांब उभारण्यासाठी झुंजताना दिसतात. १८ दिवसांपासून जिल्ह्यात अजून वीज नाही. सारा दिवस या कामात जातो, पण रात्र जास्तच अंगावर येते...असे प्रदीप प्रधान सांगत होते. शिक्षक असलेले प्रधान मार्चमध्ये गावाकडे आले आणि लॉकडाऊनमध्ये अडकले. लाइट नसल्याने इथली सर्वच कामे ठप्प झाली आहेत. पिठाची गिरणी बंद, पाण्याचा पंप बंद, वाडीतली मोटर बंद, घरातला पंखा बंद. सर्वात महत्त्वाचा वांदा म्हणजे मोबाईल बंद. त्यामुळे संपर्क आणि संवादही तुटलेला. त्यामुळे कोकणवासीयांची अवस्था आता केवळ रात्रीच नाही तर ‘रात्रंदिवस विजेसाठी खेळ चाले’ अशी झाली आहे. त्यातच पावसानं साचलेल्या डबक्यात डासांची बेसुमार पैदास झालीये. रात्रभर या डासांच्या झुंडी लोकांना धड झोपूही देत नाहीत... अशी व्यथा गावकऱ्यांनी दिव्य मराठीच्या चमूकडे व्यक्त केली.

महाराष्ट्र शासनाने दिलेल्या मोफत रॉकेलचा खूप आधार झाल्याचे इथले लोक सांगतात. बाकी प्रशासकीय यंत्रणेचा अंधारच असल्याचे त्यांचे मत आहे. वादळ झाल्यावर जिल्हा प्रशासनाचा दावा होता ३६ तासांत लाइट येईल. प्रत्यक्ष जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबागमधील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातला वीज पुरवठा सुरू व्हायला पाच दिवस लागले. वादळाचा फटका बसलेल्या ग्रामीण भागातील लोक मात्र १८ दिवसांपासून अंधारात आहेत.

वीज नाही म्हणून इंटरनेट नाही, नेट नाही म्हणून बँक नाही : ‘कसलं प्रशासन, आपणच शासन’, मोबाइल टॉर्चच्या प्रकाशात चौल चौकीजवळच्या विजेच्या खांबाची उभारणी करणारे नयन वैद्य सांगत होते. लोक वर्गणी काढून भाड्याने जनरेटर आणून मोबाइल चार्ज करीत आहेत. अजून पाच दिवस लाइट येण्याची त्याना आशा नाही. शासनाने जाहीर केलेली ६ हजारांची ‘तातडी’ची मदत दोन आठवडे उलटून गेले तरी यांच्यापर्यंत पोहोचलेली नाही कारण लाइट नाही म्हणून इंटरनेट नाही आणि नेट नाही म्हणून बँक नाही.

बाकीची मदत सोडा, पहिल्यांदा लाइट द्या! : आधी कोरोनामुळे पर्यटक बंद झाले, मग लॉकडाऊनमुळे गाव बंदी झाली आणि आता चक्रीवादळामुळे पार होत्याचं नव्हतं झालं. अर्थात, झालेल्या लाखोंच्या नुकसानीच्या तुलनेत शासनाची मदत म्हणजे फाटलेल्या आभाळावर ठिगळ असल्याचे आक्षीचे उपसरपंच राकेश म्हात्रे सांगत होते. अखेर त्यांनीच गावातील प्रत्येक आळीच्या गावकऱ्यांच्या टीम करून विजेचे खांब उभारण्याचा आणि तारा जोडण्याचा सपाटा लावला आहे. एकूणात, रायगडच्या वादळग्रस्त भागातील लोकांचा सध्याचा सूर ‘बाकीची मदत सोडा, पहिल्यांदा लाइट द्या!’ एवढाच आहे.

आता दुकानांमधल्या मेणबत्त्याही संपल्या

पर्यटन हा इथला मुख्य व्यवसाय. उन्हाळ्याचे २ महिने म्हणजे तर वर्षाच्या कमाईची बेगमी. यंदा कोरोना व लॉकडाऊनमुळे ८ मार्चपासूनच सर्व व्यवहार ठप्प असल्याचे अमोल शेवडे सांगत होते. वीज नसल्याने त्यांच्या कोकण फूड बाजारातल्या आंबावड्यांचा माल फ्रिजअभावी खराब झाला होता. शेजारच्या रेशन दुकानात रॉकेलसाठी लांब रांग होती. १८ दिवसांपासून वीज नसल्याने दुकानांमधल्या मेणबत्त्याही संपल्या आहेत.

रायगड जिल्ह्यात लाखभर झाडे कोसळली

रायगड जिल्ह्यात वादळाने लाखभर झाडे कोसळली आहेत. नारळ, सुपाऱ्या, आंबा, फणस यांची झाडे पडल्याने खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी विद्युत विभागाने अभियंत्यांची जादा कुमक मागवली आहे. पण नुकसान एवढे प्रचंड आहे की प्रशासकीय यंत्रणा बरीच तोकडी पडत आहे.

१२ हजार कर्मचारी मागवले

विजेची कामे करण्यासाठी जिल्ह्याबाहेरून १२ हजार कर्मचारी मागवले आहेत. मात्र १६ हजार ५०० खांब पडले आहेत. ४ स्टेशन, ३२ सबस्टेशन कोसळली आहेत. पाऊस, चिखलामुळे विलंब होतोय. - निधी चौधरी, जिल्हाधिकारी, रायगड

बातम्या आणखी आहेत...