आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसे वर्धापन दिन:'तुमच्या हातून जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवणार'; राज ठाकरेंच्या मनसैनिकांना शुभेच्छा

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मनसेच्या 15 व्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना उद्देशून एक ऑडिओ क्लिप तयार केली आहे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज 15 वा वर्धापन दिन आहे. राज्यात असलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मनसेने वर्धापन दिन सोहळा रद्द केला. पण, आज सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ॲाडिओ मेसेजद्वारे राज ठाकरेंनी येणाऱ्या काळात पक्षाला भरभरून यश मिळण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला आहे.

शुभेच्छा देताना राज ठाकरे म्हणाले की, 'आपण पाहिलेल्या स्वप्नाला आज 15 वर्षे पूर्ण झाली. 15 वर्षापूर्वी एका ध्येयाने बाहेर पडून पक्षाची स्थापना केली त्यावेळी मनात धाकधूक होती. महाराष्ट्रासाठी काहीतरी नवीन करण्यासाठी केलेली धडपड तुम्ही आणि लोक हे कसे स्वीकारणार याची शंका होती. 19 मार्च 2006 पक्ष स्थापन केला. त्या दिवशी शिवाजी पार्कवरची सभा आणि समोर असलेला अलोट जनसागर पाहिला आणि मनातील सर्व शंका दूर झाल्या. मनसे सैनिकांची अचाट शक्ती होती. त्यांचा माझ्यावर अढळ विश्वास आहे. कितीही संकटे, खचखळगे आले तरी मनसे सैनिक रुपी ही शक्ती माझ्यासोबत टिकून आहे. आपल्यातील काहीजण सोडून गेले, त्यांना त्यांचा निर्णय त्यांना लखलाभ. पण तुम्ही सह्याद्रीच्या कड्यासारखे टणक राहीलात.'

पक्षाचे यश फक्त तुमच्यामुळे

'पक्षाला भविष्यात जे काही यश मिळेल, ते तुमच्याचमुळे असेल. तुमच्या हातून जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवणार. मनापासून सांगतो, 15 वर्षात जे काही तुम्ही करुन दाखवलय ते अचाट आहे. कोणतीही धनशक्ती मागे नसताना तुम्ही जे काही केले ते कौतुकास्पद आहे. तुम्ही हजारो आंदोलने, मोर्चे, अटकवाऱ्या केल्या. हे सर्व कशासाठी? आपल्या भाषेसाठी, मराठी माणसाच्या हक्कासाठी आणि स्वधर्म रक्षणासाठी. या सर्वाबद्दल माझ्या मनात कृतज्ञता तर आहेच आणि ती आयुष्यभर राहील. मला खात्री आहे की महाराष्ट्राच्या मनातही ती कायम असेल. आपण निवडणुकीत यश पाहिले, पराभव पाहिला. पण या पराभवानंतरही तुमच्या मनातील लढण्याची उर्मी कमी झाली नाही. याचा मला खरोखरच अभिमान वाटतो. महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाला जेव्हा असे वाटते की आपला प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण पक्षच सोडवू शकतो त्यावेळी यातच भविष्याच्या यशाची बीजे रोवली आहेत हे विसरू नका.'

कोरोना परिस्थितीमुळे भेटू शकत नाही

राज ठाकरे पुढे म्हणाले की, 'कोरोनाच्या परिस्थितीमुळे हा पहिलाच वर्धापन दिन असेल की, आपण भेटू शकत नाही. सध्याची परिस्थिती पाहता गर्दी टाळणे आवश्यक आहे, तुम्हाला भेटता येणार नाही त्यामुळे हा रेकॉर्डेड संदेश तयार केला आहे. ही परिस्थिती निवळली की आपण भेटणार हे नक्की. वर्धापन दिनानिमित्त 14 मार्चपासून आपण पक्षाची सदस्य नोंदणी पुन्हा एकदा सुरुवात करत आहोत. सदस्य नोंदणी म्हणजे महाराष्ट्राला दिलेलं आश्वासन, वचन आणि व्यक्त केलेली बांधिलकी आहे,' असे राज ठाकरे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...