आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्ध्यावरती डाव मोडला:‘कार्यकर्त्यांवर भावाप्रमाणे प्रेम करणारा नेता, सौराष्ट्रात राजीव यांच्यामुळेच काँग्रेसला यश’

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
खासदार राजीव सातव आणि डॉ. मनीष दोशी, मुख्य प्रवक्ते, गुजरात काँग्रेस. राहुल गांधींच्या गुजरात दाैऱ्यातील निवांत क्षण. - Divya Marathi
खासदार राजीव सातव आणि डॉ. मनीष दोशी, मुख्य प्रवक्ते, गुजरात काँग्रेस. राहुल गांधींच्या गुजरात दाैऱ्यातील निवांत क्षण.
  • चार दिवसांपूर्वी मतदारसंघातले काम लावले होते मार्गी

सारंच अनाकलनीय. सकाळी राज्यभर फोन खणखणत होते. समोरच्याच्या आवाजात कंप. राजीवभाऊ गेले. राजीव सातव गेले. राजीव सातव म्हणजे तरुण, तडफदार, प्रगल्भ, मृदुभाषी असे आश्वासक नेतृत्व. कुणीही बातमीवर विश्वास ठेवायला तयार नव्हते. प्रत्येकालाच ही बातमी खोटी वाटत होती. २३ दिवसांची झुंज अशी एकाएकी संपलीच कशी? ‘कोरोनापासून स्वत:ला सांभाळा,’ असे सर्वांना आवाहन करणाऱ्या राजीवभाऊंचा मृत्यू त्याच ‘कोरोना’ने झाला. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मतदारसंघातील लोकांना मदत करण्याचा त्यांचा ध्यास अखेरच्या क्षणीही त्यांनी जपला. चार दिवसांपूर्वी मतदारसंघात वीज नसल्याचा एका गावकर्‍याने मेसेज केला. ‘त्याचे काम करा’, अशी सूचना सातव यांनी शेवटच्या क्षणीही केली होती. अनेकांचा आधार बनत त्यांचं विश्व सातव यांनी उभारून दिलं. मराठवाड्याचा हा आधार गेला. अजून खूप काही बाकी होतं. राष्ट्रीय राजकारणात तेजाने तळपणाऱ्या ‘राहुल ब्रिगेड’च्या या निष्ठावंत नेत्याला आणखी खूप मजल मारायची होती. ‘पण अर्ध्यावरती डाव मोडला!

अॅड. सातव काेराेनातून बरे झाल्यानंतर फुप्फुसात न्यूमाेनियाचा संसर्ग झाला. प्रकृती बिघडत गेली व त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उत्तम संघटनकाैशल्य, संयमी व सुसंस्कृत राजकारणी म्हणून त्यांनी राष्ट्रीय राजकारणात अाेळख निर्माण केली. २३ एप्रिल राेजी त्यांना पुण्यातील जहांगीर रुग्णालयात दाखल करण्यात अाले हाेते. त्रास वाढल्याने २६ एप्रिल राेजी त्यांना अतिदक्षता विभागात हलवून व्हेंटिलेटरवर ठेवले हाेते. कळमनुरी तालुक्यातील मसोड येथील मूळ असलेले अॅड. सातव यांचा पंचायत समिती सदस्य ते खासदार असा प्रवास थक्क करणारा आहे. अाई रजनी सातव यांच्याकडून राजकारणाचे बाळकडू घेतल्यानंतर राष्ट्रीय राजकारणात त्यांनी चमक दाखवली.

काँग्रेसच्या वरिष्ठांच्या बैठकीतील धोरणात्मक निर्णयांमध्ये त्यांचा सहभाग असायचा. गुजरात काँग्रेस प्रभारी म्हणून विधानसभा निवडणुकीत त्यांनी साैराष्ट्र भागात उत्कृष्ट काम करत काँग्रेसला घवघवीत यश मिळवून दिले हाेते. पंजाब निवडणुकीतही पक्षाला यश मिळवून देण्याचा त्यांचा सिंहाचा वाटा होता. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद मिळाल्यानंतर त्यांनी युवकांची फळी निर्माण केली. सन २००९ मध्ये ते कळमनुरी विधानसभेेचे आमदार झाले. ते युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षही हाते.

हिंगोली लोकसभा मतदारसंघातून २०१४ मध्ये मोदी लाटेतही ते विजयी झाले. २०२० मध्ये त्यांची राज्यसभा सदस्य म्हणून निवड झाली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

चार वेळा संसदरत्न पुरस्कार
संसदेतील त्यांच्या लक्षवेधी व अभ्यासपूर्ण कामगिरीच्या बळावर त्यांना सलग चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. हिंगोलीच्या खासदारपदी असताना सातव यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, मनरेगा, दुष्काळ, रेल्वे यासारख्या अनेक मुद्द्यांवर संसदेत आवाज उठवला. संसदेत १०७५ प्रश्न विचारत २०५ वादविवादांमध्ये सातव सहभागी झाले होते. राजीव सातव यांची ८१ टक्के उपस्थितीही उल्लेखनीय होती.

कळमनुरी येथे खासदार राजीव सातव यांच्या निवासस्थानी रुग्णवाहिकेतून त्यांचे पार्थिव अाणण्यात अाले.

मागील काही वर्षांपासून अॅड. राजीव सातव यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. तरुणांसाठी प्रेरणादायी असे त्यांचे नेतृत्व होते. ते आमचे नेते तर होतेच, पण त्या पलीकडे जाऊन एका भावाप्रमाणे आमच्या सर्वांवर प्रेम करायचे. कोणी नेता आमच्याशी बोलतोय, असे कधी वाटलेच नाही. पक्ष प्रभारी असताना छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्यांशी ते नेहमी संवाद साधायचे, त्यांना प्रेरित करायचे. अनेकदा प्रभारी पद असले की नेते दिलेली जबाबदारी पार पाडतात. पण अॅड. सातव मात्र पूर्ण मन लावून पक्षाला उभारी देण्यासाठी अहोरात्र झटायचे. अॅड. सातव जाण्याने केवळ महाराष्ट्र- गुजरातच नव्हे, तर राष्ट्रीय काँग्रेसची न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. कितीही मोठे यश मिळाले तरी ते हुरळून जात नव्हते. ते स्वत: कधी चुकीचे करायचे नाही, इतरांनी केलेली चूक सहन करायचे नाहीत. पारदर्शकता हा त्यांच्या स्वभावातील सर्वात मोठा गुण होता. मी इतक्या वर्षांत अनेक नेत्यांसोबत काम केले, पण राजीव सातव यांच्या नेतृत्वात काम करताना एक कार्यकर्ता आणि नेता यांच्यातील संबंध कसा असायला हवा याची प्रचिती आली. गुजरातमध्ये काँग्रेसची सत्ता आणण्याचे त्यांचे स्वप्न होते. गुजरातच्या साैराष्ट्रमध्ये मिळालेले यश त्याचाच परिपाक हाेता. २०२२ मध्ये कुठल्याही स्थितीत गुजरातमध्ये सत्ता आणण्याचा चंग त्यांनी बांधला होता. त्या दृष्टीने कार्यकर्ते, नेत्यांची फळी त्यांनी निर्माण केली. विरोधकांवरही टीका करताना त्यांनी कधीही खालच्या स्तरावरची भाषा वापरली नाही. आपले म्हणणे नेमके आणि प्रभावीरीत्या कसे मांडायचे हे त्यांच्याकडून खरेच शिकण्यासारखे होते. ते आपल्यात नाहीत याची कल्पनाही आम्हाला करवत नाही.- डॉ. मनीष दोशी, मुख्य प्रवक्ते, गुजरात काँग्रेस

एका स्वप्नाचा मृत्यू!
सत्तेच्या जोरावर पैसा आणि पैशाच्या जोरावर सत्ता मिळवणाऱ्या नेत्यांपेक्षा राजीव वेगळे ठरले. कारण, त्यांची बांधिलकी विचारांशी होती. माणसं मरतात तेव्हा दुःख होतंच. पण, अशा स्वप्नाचा मृत्यू मात्र हुंदका आभाळभर करतो…

कळमनुरीत आज अंत्यसंस्कार
पुण्यात निधन झाल्यानंतर रविवारी सायंकाळी त्यांचे पार्थिव कळमनुरी येथे आणण्यात आले. त्यांच्या निवासस्थानासमोरील शेतात सोमवारी (दि. १७) सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. तत्पूर्वी सकाळी ६ वाजेपासून त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...