आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाँग्रेस पक्ष वाढीसाठी महाराष्ट्रातच नव्हे तर गुजरात राज्यात जोमाने प्रयत्न करणाऱ्या माजी खासदार स्व. राजीव सातव यांच्या कुटुंबातील सदस्याला राज्यसभेच्या उमेदवारीतून डावलल्याने कार्यकर्त्यांमधून तिव्र असंतोष निर्माण झाला आहे. पक्षाकडूनच सातव कुटुंबीयांची उपेक्षा केली जात असल्याचा आरोप आता कार्यकर्त्यांमधून केला जात आहे.
लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेमध्ये विजय मिळविणाऱ्या माजी खासदार सातव यांनी पक्षासाठी पायाला भिंगरी लावल्या प्रमाणे कामे केली. काँग्रेसच्या नेत्या सोनीया गांधी, राहूल गांधी यांच्या निकटचे व्यक्तीमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. पक्षाने टाकलेली जबाबदारी विश्वासाने पूर्ण करण्यासाठी त्यांनी वेळोवेळी प्रयत्न केले तसेच सर्वच जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या. त्यानंतर त्यांना महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठविण्यात आले. माजी खासदार स्व. राजीव सातव यांनी महाराष्ट्रातच नव्हे तर गुजरात राज्यात तळ ठोकून त्या ठिकाणी पक्ष वाढीसाठी प्रयत्न केला. मात्र कोविड संसर्गामुळे चार महिन्यापुर्वीच त्यांचे निधन झाले.
दरम्यान, त्यांच्या पश्चात राज्यसभेवरील रिक्तजागेसाठी त्यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांना उमेदवारी द्यावी अशी मागणीही केली जाऊ लागली होती. तर पक्षश्रेष्ठींनी त्यांना दिल्ली येथे बोलावून काँग्रेसपक्ष नेहमीच सातव कुटुंबियाच्या पाठीशी राहणार असल्याचे आश्वासनही दिले होते. त्यामुळे डॉ. सातव यांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार हे निश्चित मानले जात होते. त्यातच डॉ. सातव यांची पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे जिल्हयातीलच नव्हे तर राज्यातील काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढल्या होत्या.
मात्र आज काँग्रेस पक्षाने राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून रजनी पाटील यांचे नांव जाहिर केले. त्यामुळे जिल्हयातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना चांगलाच धक्का बसला आहे. या प्रकारामुळे कार्यकर्त्यांमधून तिव्र असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र पक्षाकडून विधान परिषदेसाठी विचार होईल अशी अपेक्षाही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, या संदर्भात डॉ. प्रज्ञा सातव यांच्याशी दुरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क झाला नसल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.