आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Remedy The Errors In The Banthia Commission Report The NCP Delegation Met The Chief Minister, Deputy Chief Minister

बांठिया आयोगाच्या अहवालातील त्रुटींवर उपाययोजना करा:राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी समर्पित बांठिया आयोगाने सादर केलेला ओबीसींचा विश्लेषणात्मक अहवाल (इम्पिरिकल डाटा) सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आला. त्याआधारे ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत झाले. मात्र, ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी नेमलेल्या अहवालात अनेक त्रुटी होत्या. सुप्रिम कोर्टाने 92 नगरपरिषदांमध्ये ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याबाबत निर्णय दिला आहे. या निर्णयाविरोधात राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केली आहे.

चर्चा करतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे छगन भुजबळ, विरोधीपक्ष नेते अजित पवार, माजी राज्यमंत्री दत्ता भरणे, अनिल पाटील, सुनील भुसारा, नितीन पवार आदी.
चर्चा करतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे छगन भुजबळ, विरोधीपक्ष नेते अजित पवार, माजी राज्यमंत्री दत्ता भरणे, अनिल पाटील, सुनील भुसारा, नितीन पवार आदी.

ओबीसींच्या आरक्षणाबाबतच्या त्रुटी दूर करण्यासाठी राज्य सरकारने उपाययोजना कराव्यात. अशी मागणी भुजबळ यांनी केली आहे. राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने गुरुवारी 4 ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन याबाबत पत्र दिले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना लिहिलेल्या पत्रात छगन भुजबळ म्हणतात गेल्या काही वर्षांपासून ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे आपण अतिशय व्यथित झालेलो असून लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी केली आहे.

कमी वेळ मिळाला

मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात राष्ट्रवादीने म्हटले आहे, ओबीसी आरक्षण पूर्ववत होण्यासाठी सर्व राजकीय पक्ष आणि विविध ओबीसी संघटनांनी वेळोवेळी अनेकदा आंदोलने केली. त्या सर्वांचे हे सामुहिक यश आहे. बांठिया आयोगाला हा अहवाल तयार करण्यासाठी अतिशय कमी वेळ मिळाला. राज्यात प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 11 जुलै रोजी होणाऱ्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीपूर्वी अत्यंत अल्पावधीत ओबीसींची आकडेवारी संकलित करणे भाग होते. त्यामुळे ही आकडेवारी पाहिजे तितकी अचूक झाली नाही. शिवाय काही स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकसंख्येची आकडेवारी अत्यंत दोषपूर्ण आहे.

या गावांची पडताळणी

बांठीया आयोगाच्या अहवालात कशा पद्धतीने चुका आहेत हे सांगताना छगन भुजबळ यांनी यात म्हटले आहे की, सिन्नर तालुक्यातील (जि.नाशिक) ज्या चार गावांमधील ओबीसींची संख्या शून्य दाखविली आहे तेथील दोन गावांमधील पडताळणी केली असता फर्दापूर या ग्रामपंचायतमधील सरपंच पद ओबीसी महिला राखीव असून या जागेवर सुनिता रमेश कानडे या ओबीसी महिला सरपंचपदी कार्यरत आहेत. तर या ग्रामपंचायत मधील इतर दोन वॉर्ड हे ओबीसी राखीव असल्याचे दिसून आले.

त्याचप्रमाणे दुसऱ्या पांगरी खुर्द या गावातील ग्रामपंचायतीमधील दोन जागा या ओबीसींसाठी राखीव आहेत. तर तेथील पोलीस पाटील हे ओबीसी असल्याचे निष्पन्न झाले. म्हणजेच चौकशीअंती शून्य संख्या दाखविलेल्या गावांमधील संख्या ही 60 % पेक्षा जास्त असल्याचेही सिद्ध झाले आहे. त्यामुळे आगामी काळात ओबीसीचे मोठे नुकसान होईल.

राज्य सरकारचे मानले आभार

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घ्या, या आदेशाविरुद्ध राज्य सरकारने तातडीने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी मागणी माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केली. यावेळी त्यांनी दिल्लीमध्ये भारताचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता आणि ज्येष्ठ विधिज्ञ मनिंदर सिंग यांची भेट घेवून त्यांना महाराष्ट्र सरकारच्या बाजूने न्यायालयात बाजू मांडण्यासाठी उभे केले. त्याबद्दल राज्य सरकारचे आभार देखील मानले आहेत. यावेळी राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार, माजी राज्यमंत्री दत्ता भरणे, आ. अनिल पाटील, आ. सुनील भुसारा, आ. नितीन पवार उपस्थित होते.

राष्ट्रवादी शिष्टमंडळाच्या मागण्या

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.
  • जेथे ओबीसींची लोकसंख्या 52% पेक्षा म्हणजे 1931 च्या अधिकृत जनगणनेपेक्षा कमी आहे तेथे सखोल फेरसर्वेक्षण करूनच भविष्यातील निवडणुका घेण्यात याव्यात.
  • सर्वोच्च न्यायालयाच्या सूत्रानुसार अनुसूचित जाती-जमाती यांना आरक्षण देण्यात आल्यानंतर व 50% ची मर्यादा न ओलांडता ओबीसींना आरक्षण देय होऊ शकते. त्या तत्वानुसार आता ओबीसींसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिनियमात असलेली 27% मर्यादा तातडीने अध्यादेश काढून वगळण्यात येऊन त्याऐवजी ओबीसी आरक्षण हे लोकसंख्येच्या प्रमाणात लागू करावे.

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी उपाययोजना

विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात अतिवृष्टी व पूरामुळे नुकसान झालेल्या भागातील शेतकरी व नागरिकांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत व दिलासा मिळावा अशी मागणी देखील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने केली. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी हेक्टरी 75 हजार तर फळपिकांसाठी हेक्टरी दीड लाख रुपयांची तात्काळ मदत करावी, अशी मागणी राज्यपालांकडे करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...