आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

हिंगोली:गलंडी पाटी येथे दुचाकी अपघातात राखीव दलातील जवानाचा मृत्यू

हिंगोली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली ते औंढा नागनाथ मार्गावर पाटीजवळ दुचाकीच्या अपघातामध्ये राज्य राखीव दलाचे जवान गणपत बाबुराव राठोड (३३) यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी २५ रात्री घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोलीच्या राज्य राखीव दलातील जवान गणपत राठोड (३३) हे शनिवारी ता. २५ सकाळी हिंगोली येथून दुचाकी वाहनावर काठोडातांडा या मूळ गावी गेले होते. रात्री नऊ वाजता ते गावाकडून परत हिंगोलीकडे येण्यासाठी निघाले. त्यांचे दुचाकी वाहन हिंगोली ते औंढा मार्गावर गलांडी पाटीजवळ आले असताना त्यांची दुचाकी घसरून दुचाकीला अपघात झाला. यामध्ये त्यांच्या डोक्याला व छातीला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस ठाण्याचे निरीक्षक वैजनाथ मुंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे , जमादार इक्बाल शेख यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी मयत राठोड यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केला आहे. या प्रकरणी औंढा पोलिस ठाण्यात अद्याप पर्यंत कुठल्याही प्रकारची नोंद झाली नाही.

दरम्यान मयत राठोड हे सन २०१० मध्ये हिंगोलीच्या राज्य राखीव दला मध्ये भरती झाली होते. सध्या ते प्रशासन कंपनीमध्ये कार्यरत होते. राखीव दलातील दहा वर्षांच्या सेवेत त्यांनी महाराष्ट्रासह बाहेर राज्यात निवडणुकीच्यावेळी तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या प्रसंगी कंपनीसोबत जबाबदारीने काम पार पाडले. अत्यंत मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व म्हणून ते राखीव दलात परिचित होते. यशवंत राज्य राखीव दलाच्या कबड्डी संघामध्ये त्यांचा सहभाग होता उत्कृष्ट कबड्डीपटू म्हणून त्यांची ओळख होती. मराठवाड्यातील विविध कबड्डी स्पर्धांमध्ये राज्य राखीव दल आला त्यांनी यश मिळवून दिले आहे. मयत राठोड यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी मुलगी, मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने काठोडा तांडा गावावर शोककळा पसरली आहे.