आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1 जूनपासून महाराष्ट्र अनलॉक:निर्बंध सैल होणार, लसीकरणास गती, मान्सूनचे आगमन

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जून महिन्यात लस उपलब्ध झाल्यानंतर राज्यात २४ तास लसीकरण : मुख्यमंत्री
  • रुग्णसंख्या कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल : आरोग्यमंत्री

गेल्या दीड-दोन महिन्यांपासून कोरोना संकटाशी दोन हात करणाऱ्या राज्यातील नागरिकांसाठी जून महिना आनंदाची झुळूक घेऊन येणारा ठरणार आहे. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये आता कोरोनाचा प्रादुर्भाव घटताना िदसतो अाहे. त्यामुळे ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी आणि मृतांचा अाकडाही कमी असेल त्या जिल्ह्यांमध्ये १ जूननंतर लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल करण्याचे संकेत आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत. जून महिन्यात लसींचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्यानंतर राज्यभरात २४ तास लसीकरण मोहीम राबवण्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी बालरोगतज्ज्ञांच्या बैठकीत बोलताना दिली. तिसरी महत्त्वाची बातमी म्हणजे येत्या १० जून रोजी मान्सून तळकोकणात दाखल होईल, असे हवामान खात्याने सांगितले आहे.

सरलेल्या आठवड्यात १७ ते २२ मे या कालावधीत रुग्णसंख्या कमी होताना दिसत असून ती ३० हजारांच्या आत आली आहे. केवळ बुधवार, १९ मे रोजी संख्या ३० हजारांपेक्षा अधिक होती. नाशिक, कोल्हापूर व अहमदनगर जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या घटली असल्यानेच कडक लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी निर्बंध शिथिल करण्याचे संकेत दिले होते.

जून महिन्यात लस उपलब्ध झाल्यानंतर राज्यात २४ तास लसीकरण : मुख्यमंत्री
लसीकरणासाठी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी १२ कोटी लसी एकरकमी घेण्याची राज्याची तयारी आहे, पण लसी उपलब्ध नाहीत हीच अडचण आहे. जूननंतर लसी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार असून तेव्हा २४ तास लसीकरण राबवले जाईल, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जनतेला दिली.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसंदर्भात राज्य सरकार सध्या तयारी करत आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आज राज्यातील ६ हजार ३०० बालरोगतज्ज्ञांशी संवाद साधला. या वेळी मुख्यमंत्री म्हणाले, लहान मुलांच्या बाबतीत आपला डॉक्टर्सवर अंधविश्वास असतो. डॉक्टर जे सांगतील ते उपचार आपण लहान मुलांच्या बाबतीत आपण करतो. रोगापेक्षा इलाज भयंकर होऊ नये याची मात्र काळजी घ्या, अशी सूचना केली. काय करावे आणि काय करू नये ते नेमके आपल्या डॉक्टर्सकडून समजून घ्या. डॉक्टर्सनीदेखील मुलांच्या पालकांना अस्वस्थ नाही तर आश्वस्त करावे, असे त्यांनी बजावले. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा व इतर काही बाबींचा तुटवडा जाणवला. आता ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी ठोस पावले टाकली आहेत. जूननंतर लसपुरवठा सुरळीत सुरू होईल त्यानंतर सर्व नागरिकांचे लसीकरण वेगाने सुरू करू शकू, असे मुख्यमंत्री म्हणाले.

रुग्णसंख्या कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल : आरोग्यमंत्री

ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या आणि मृतांचा आकडा कमी असेल त्या-त्या जिल्ह्यांमध्ये १ जूननंतर लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता देणार असल्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिले.

१ जून रोजी सध्याचे लाॅकडाऊन संपत आहे. नव्याने लाॅकडाऊन वाढवणार का, याकडे सर्वाचे डोळे लागले आहेत. त्यासंदर्भात टोपे म्हणाले, १ जूनपासून लाॅकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात येणार असले तरी ते एकाच वेळी शिथिल होणार नाहीत. टप्प्याटप्प्याने नियमांमध्ये शिथिलता दिली जाईल. दुसऱ्या लाटेत ७० हजारांची रुग्णसंख्या ३० हजारांवर आली आहे. मात्र धोका टळलेला नाही, मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर लॉकडाऊनसंदर्भातले महत्त्वाचे निर्णय घेतले जातील, असेही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

तळकोकणात मान्सून १० जूनला पोहोचणार
अंदमान-निकोबार द्वीपसमूहात दाखल झालेला मान्सून बंगालच्या खाडीत वायव्य दिशेने पुढे सरकला आहे. केरळमध्ये पूर्वमोसमी पाऊस सुरू आहे. मान्सून दाखल होईपर्यंत तो सुरू राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पुढील आठवड्याच्या मध्यापर्यंत तो केरळमध्येही पोहोचेल. मान्सून तळकोकणात १० जूनला पोहोचेल, अशी अपेक्षा आहे. दरम्यान, ‘यास’ हे चक्रीवादळ २६ मे रोजी ओडिशाच्या पारादीप आणि पश्चिम बंगालचे सागर बेट यामधून जाईल. त्यानंतर ते किनाऱ्यांवर धडकेल. हवामान विभागाने रविवारी ही माहिती दिली. चक्रीवादळामुळे पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनारपट्टी भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

रविवारी राज्यात २६,६७२ रुग्ण,५९४ मृत्यूंची नोंद
राज्यामध्ये २६,६७२ नव्या रुग्णांची नोंद झाली. कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक म्हणजे २९,१७७ आहे. तर ५९४ मृत्यूंची नोंद झाली

मराठवाडा ३,१९६ रुग्ण, रविवारी ३,१९६ रुग्ण आढळले, १०२ जणांचा मृत्यू झाला. तर, ३,९८७ बरे झाले. रुग्ण व मृत्यू पुढीलप्रमाणे : औरंगाबाद ३७७ (२३), जालना ४१७ (४), परभणी ५४० (८), हिंगोली ८१ (१), नांदेड १०३ (७), लातूर ३२४ (२४), बीड ९६२ (२३), उस्मानाबाद ३९२ (१२)

मुलांच्या संसर्गाबाबत बेसावध राहू नका
मुलांमध्ये कोविड आणि कोविडशी संबंधित मानसिक व भावनिक आरोग्याकडे लक्ष देण्यावरदेखील चर्चा झाली. लहान मुलांमधील संसर्गाबाबत बेसावध राहू नका, वेळीच डॉक्टरला दाखवा, कोविडविरुद्धची आपली एकजुटीची साखळी मजबूत ठेवून या विषाणूला पराभूत करू, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...