आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहावी निकाल:दहावी बोर्डाचा निकाल आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात, सर्वाधिक निकाल लागण्याची शक्यता

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मंडळाने जाहीर केले अंतर्गत मूल्यमापनाचे वेळापत्रक

कोरोनामु‌ळे इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाल्यानंतर नववी आणि दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनावर आधारित निकाल जाहीर केला जाईल, असे शिक्षण विभागाने जाहीर केले होते. त्यानुसार राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. आता दहावीचा निकाल जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होईल, असे चित्र आहे.

मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील म्हणाले, ‘मूल्यमापन कसे करायचे, प्रत्यक्ष कार्यपद्धती आणि स्वरूप काय, याचे प्रशिक्षण शिक्षकांना देण्यासाठी कार्यशाळा घेतली जात आहे. मूल्यमापन करण्यासाठी स्वतंत्र संगणक प्रणाली बनवण्यात आली आहे. निकालासाठी शाळांमध्ये सात सदस्यीय निकाल समिती नेमण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन काही कारणांनी (लाॅकडाऊन नियमावली, जिल्हाबंदी, वस्ती सील होणे, तांत्रिक अडचणी आदी) अद्याप झालेले नाही, त्यांचे मूल्यमापन ११ ते २० जूनदरम्यान केले जाईल. नववीतील दोन घटक चाचण्या आणि सत्र परीक्षा (सहामाही) यांच्या आधारावर नववीच्या पन्नास गुणांचे मूल्यांकन केले जाईल. तसेच सवलतीच्या गुणांची कार्यवाही राज्य मंडळ स्तरावर केली जाईल. शाळापातळीवर हे गुण दिले जाणार नाहीत.’ अंतर्गत मूल्यमापनासंदर्भात शैक्षणिक वर्तुळात मात्र वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. याआधी अंतर्गत मूल्यमापनाचे २० गुण शाळांच्या स्तरावर दिले जात होते.

निकाल सर्वाधिक लागण्याची शक्यता
मंडळाने मूल्यमापनाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार नववी आणि दहावीचा एकत्रित विचार केला जाणार आहे. याआधी अंतर्गत मूल्यमापनाचे २० गुण शाळापातळीवर दिले जात होते. यंदा सर्वच गुण शाळांच्या हातात आहेत. त्यामुळे दहावीचा निकाल सर्वाधिक लागला, तर आश्चर्य वाटायला नको. याचा विचार हा निर्णय घेणाऱ्या मंडळींनी केला असेल, असे वाटते. - डॉ. वसंत काळपांडे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ

अशी आहे प्रक्रिया

  • अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल लागणार असल्याने नियमित, खासगी, पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन शाळा स्तरावर करण्यात येईल.
  • संबंधित शिक्षकांनी विषयनिहाय गुणतक्ते वर्गशिक्षकांकडे द्यायचे.
  • वर्गशिक्षकांनी निकाल शाळा समितीकडे २० जूनपर्यंत द्यावेत.
  • शाळांतील निकाल समित्यांनी परीक्षण २४ जूनपर्यंत करायचे.
  • मुख्याध्यापकांनी विषयनिहाय गुण मंडळाच्या संगणक प्रणालीत ३० जूनपर्यंत भरायचे.
  • निकाल मुख्याध्यापकांनी सीलबंद पाकिटातून विभागीय मंडळांकडे जमा करायचे.
  • ३ जुलैपासून राज्य मंडळाच्या स्तरावर अंतिम कारवाई सुरू.
बातम्या आणखी आहेत...