आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठवल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. यानंतर भाजपने अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या सर्व घडामोडींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकारपरिषद घेऊन आपली बाजून मांडली. यानंतर आता माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'मी शरद पवारांची पत्रकार परिषद पाहिली. ते म्हणतात की, बदली झाल्यामुळे परमबीर सिंह यांनी हा आरोप लावला आहे. पण, सुबोध जैस्वाल, रश्मी शुक्ला यांची बदली नव्हती. त्यांनी तर पुराव्याच्या आधारावर सरकारकडे जो रिपोर्ट सादर केला होता. त्याचवेळी या संदर्भातील कारवाई झाली असती, तर आज ही वेळ आली नसती. शरद पवारांची पत्रकार परिषद ऐकल्यानंतर मला थोडं आश्चर्य देखील वाटलं, पण मी त्यांना दोष देणार नाही. या सरकारचे निर्माते ते आहेत, त्यामुळे निर्मात्यांना आपले सरकार कसेही वागले तरी त्याला वाचवण्याची भूमिका घ्यावी लागतते. त्यांनी ज्यावेळी हे सांगितले की वाझेंना परमबीर सिंह यांनीच पोलिस दलात परत घेतले, हे खरं आहे. परमबीर सिंह यांची समिती त्या ठिकाणी होती. त्या समितीत अनेक लोकं होते, त्यांनी निर्णय घेतला वाझेंना परत घेतले. त्यानंतर त्यांना सगळ्यात महत्वाची जागा देण्यात आली. तेव्हा काय सरकार झोपले होते का ? सरकारला माहिती नव्हतं ? सरकारला, मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना नियम माहिती नाही का? एखादा निलंबित व्यक्ती जर तुम्ही काही कारणास्तव परत घेतला, तर त्याला महत्वाचे अधिकारी पद देता येत नाही, हे सरकारला माहिती नाही ? एवढच नाही, तर सगळ्या महत्वाच्या केसेस, या त्यांच्याचकडे देण्यात आल्या, हे सरकारच्या आशीर्वादाशिवाय झाले का ? असा सवाल फडणवीसांनी विचारला.
फडणवीस पुढे म्हणाले की, 'पवार म्हणतात ते अर्धसत्य आहे. परमबीर सिंह यांच्याच समितीने वाझेंचे निलंबन रद्द करून, त्यांना पदावर घेतले. पण त्याचे पुढचे वाक्य ते विसरले, मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांच्या आशीर्वादाने व निर्देशाने हे काम परमबीर सिंह यांनी केलं आणि म्हणूनच एपीआय दर्जाचा व्यक्ती हा इतक्या महत्वाच्या पदावर गेला आणि नंतर त्यांनी काय केलं हे आपण सर्वांनी पाहिले. एपीआय वाझेंच्या अटकेनंतर विविध प्रकारचे जे खुलासे होत आहेत आणि त्यानंतर कालच मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्राच्या माध्यमातून जो काही खुलासा केला आहे. हे सगळे प्रकरण अत्यंत धक्कादायक आहे. पण अशाप्रकारचा खुलासा करणारे, परमबीर सिंह हे पहिले व्यक्ती नाही. या पूर्वी महाराष्ट्राचे महासंचालक सुबोध जैस्वाल यांनी देखील या संदर्भातील रिपोर्ट हा राज्य सरकार व मुख्यमंत्र्यांना सादर केला होता. पोलिसांच्या बदल्यांमधले रॅकेट, पैशांची देवाणघेवाण, त्यातली दलाली, या संदर्भातील संपूर्ण ट्रान्सक्रीप्टसह एक रिपोर्ट हा तत्कालीन पोलिस महासंचालक सुबोध जैस्वाल यांनी सादर केला होता. तेव्हाच्या कमिशनर इंटलिजन्सच्या माध्यमातून तो रिपोर्ट मुख्यमंत्र्यांकडे गेला होता. त्यानंतर तो रिपोर्ट मुख्यमंत्र्यांकडून गृहमंत्र्यांकडे गेला होता आणि त्याच्यावर कुठलीही पुढची कारवाई झाली नाही,' असेही फडणवीस म्हणाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.