आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंत रामदास हे शिवरायांचे गुरू होते. शिवाजी महाराजांनी स्वतःचे राज्य त्यांच्या चरणी अर्पण केले होते, असे वादग्रस्त वक्तव्य सद्गुरू नावाने प्रसिद्ध असलेल्या जग्गी वासुदेव यांनी केले आहे. त्यामुळे नवे वादंग निर्माण झाले आहे.
जग्गी वासुदेव यांनी शिवाजीराजांबद्दल हिणकस आणि खोटी माहिती प्रसारित करून अपमान केला आहे. राज्य सरकारने याबाबत कडक कायदेशीर कारवाई करावी. अन्यथा जनक्षोभ उसळेल, असा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.
नेमके प्रकरण काय?
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये जग्गी वासुदेव यांनी शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राचा अपमान केल्याचे म्हटले आहे. तसेच जग्गी वासुदेव यांनी नेमके काय म्हटले आहे, याच्या व्हिडिओची एक लिंकही आपल्या ट्विटमध्ये टाकली आहे. त्यात त्यांनी संत रामदास यांचा शिवाजी महाराजांचे गुरू असा उल्लेख केला आहे.
खोटी कथा प्रसारित
जितेंद्र आव्हाड आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, जग्गी वासुदेव यांनी छत्रपती शिवाजीराजांविषयी एक खोटी कथा (आणि अॅनिमेशन) प्रसारित केली आहे. ज्यानुसार रामदास हा शिवाजींचा गुरू होता; रामदासाला भिक्षा मागताना पाहून शिवाजींनी स्वतःचे राज्य आणि स्वतःला रामदासांच्या चरणी अर्पण केले; रामदासाच्या आदेशाने शिवाजी राज्य सोडून हाती कटोरा घेवून भिक्षा मागू लागले; पुढे रामदासाने स्वतःच्या अंगावरील भगवे वस्त्र शिवाजींना देवून त्याला राज्याचा झेंडा म्हणून वापरायला सांगितले आणि ते राज्य शिवाजींचे नाही हे ध्यानी ठेवत राज्य करायला सांगितले.
कारवाईची केली मागणी
जितेंद्र आव्हाड आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हणतात की, छत्रपती शिवाजीराजांबद्दल अशी हिणकस आणि खोटी माहिती वारंवार प्रसारित केली जाते आणि त्यांचा व महाराष्ट्राचा अपमान केला जातो. महाराष्ट्र हा अपमान सहन करणार नाही. राज्य सरकारला याबाबतीत कडक कायदेशीर कारवाई करावी लागेल, अन्यथा याने जनक्षोभ उसळेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
कोण आहेत सद्गुरू?
जग्गी वासुदेव हे सद्गुरू नावाने प्रसिद्ध आहेत. ते ईशा फाऊंडेशनचे संस्थापक आहेत. जगभरात ते योग, समुपदेशनाचे कार्यक्रम घेतात. सामाजिक, पर्यावरणविषयक, शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असतो. त्यांच्या अध्यात्मातील कामाबद्दल भारत सरकारने त्यांना 13 एप्रिल 2017 रोजी पद्मविभूषण पुरस्काराने गौरवले आहे. त्यांची सेव्ह सॉइल चळवळीमुळे वेगळी ओळख आहे. आपण माती वाचवायला सुरुवात केली नाही, तर येत्या 25 वर्षांत आपल्यावर अन्न संकट येईल, असे म्हणत त्यांनी या चळवळीची सुरुवात केली आहे.
संबंधित वृत्तः
Video: रणवीर सिंहसोबत सदगुरु जग्गी वासुदेव यांनी केला डान्स, व्हायरल होतोय व्हिडिओ
माती संवर्धनाचा जागर:‘मातीच्या संरक्षणामुळे जीवन फुलांसारखे सुगंधित होईल’
सदगुरू जग्गी वासुदेव:या 5 गोष्टींमुळे मिळेल आयुष्यातील प्रत्येक पाऊलांवर यश
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.