आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्जुन खोतकर यांच्या पत्नीने मांडली कुटुंबाची व्यथा:म्हणाल्या- यांना कुटुंबीयांची, आम्हाला त्यांची चिंता

जालना / सीमा खोतकर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मी घरात आलो की मला कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर चिंता दिसायची. या परिस्थितीत निर्णय घेणे क्रमप्राप्त होते त्यामुळेच आपण शिंदे साहेबांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेत आहे, असे ह्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ते खरेच आहे. त्यांना जशी कुटुंबीयांची चिंता होती तसेच ते चिंतेत असले की आम्हा कुटुंबीयांना त्यांची चिंता वाटायची. हा निर्णय घेतल्याने त्यांना एक सहारा मिळाला आहे. आता ते निश्चिंत झाले तर आम्हा कुटुंबीयांना त्यापेक्षा मोठा कोणताच आनंद असू शकत नाही.अर्जुन खोतकर गेली ४० वर्षे शिवसैनिक म्हणून काम करीत आहेत. माझे लग्न झाले तेव्हा ते आमदार होते. काेरोनाकाळातील काही दिवस सोडले तर ४० वर्षांत त्यांनी संपूर्ण दिवस कुटुंबाला दिला असे मला तरी कधी आठवत नाही. माझे माहेर पैठण. आमच्याकडे मुलींचा साखरपुडा झाला की नवरा मुलगा भावी वधूला घेऊन ज्ञानेश्वर उद्यान, नाथसागर परिसरात दुचाकीवर फिरवून आणायचा.

आपणही आपल्या भावी पतीसोबत असाच फेरफटका मारावा असे मलाही वाटायचे. परंतु, ह्यांना त्यासाठी कधी वेळ मिळाला नाही. शाखा उद्घाटने, बैठका, दौरे यातच ते बिझी असायचे. लग्नापूर्वीच ते आमदार होते. त्यामुळे त्यांचे हे बिझी असणे मी समजून घेतले. लग्नापूर्वी जालना जिल्ह्यापुरतेच त्यांचे काम मर्यादित होते. नंतरच्या काळात मराठवाडा आणि मंत्री असताना संपूर्ण राज्यात त्यांचे दौरे असत.

आपला स्वत:चा फोन ते कधीही पी.ए. किंवा ड्रायव्हरकडे देत नाहीत. प्रत्येक फोन ते स्वत: घ्यायचे करतात. अडचण सांगणाऱ्या प्रत्येकाशी ते बोलतात आणि त्याचे काम व्हावे म्हणून ज्या अधिकाऱ्यास फोन करायचा आहे, तिथे फोन करतात. दिवसभरात असे किती फोन येत असतील याची कल्पनाच न केलेली बरी. त्यामुळे त्यांनी खऱ्या अर्थाने पक्ष, कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यासाठी झोकून दिले आहे. सलग ४० वर्षे त्यांचा ध्यास आणि श्वास शिवसेना हाच राहिला आहे.

त्यामुळे आता पक्ष सोडत असताना त्यांना किती वेदना होत असतील माझ्याशिवाय इतर कुणीही समजू शकत नाही. याच वेदनेतून शुक्रवारी रात्रभर ते झोपू शकले नाहीत. परंतु, त्यांनी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवला आहे आणि पुढे सगळं सुरळीत होईल. ह्यांना कुटुंबीयांची चिंता वाटणार नाही आणि कुटुंबीयांना त्यांची चिंता वाटणार नाही, असा मला विश्वास आहे.

शिवसेनाप्रमुखांचे आशीर्वाद आजही आठवतात
तुमच्या लग्नाला येता आले नाही अशी खंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बोलून दाखवली होती. तेव्हा आम्ही त्यांना आमच्या घरी येण्याचे निमंत्रण दिले. लग्नानंतर साधारणत: दीड-दोन वर्षांनी ते जालना येथे मराठा बिल्डिंगला आमच्या घरी आले. मी फक्त ५-१० मिनिटे थांबेन असे ते येण्यापूर्वी म्हणाले होते. मात्र आमच्या घरी ते तब्बल तासभर थांबले होते. माँसाहेब, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे त्यांच्यासोबत होते. आमचे भले मोठे एकत्रित कुटुंब पाहून त्यांनी सर्वांचे कौतुक केले व आशीर्वाद दिले. आज हे शिवसेना पक्ष सोडत असताना हा प्रसंग माझ्या डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा आहे.

शब्दांकन : कृष्णा तिडके

बातम्या आणखी आहेत...