आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'सुशांत सिंह हा बेकार माणूस आहे, जर खोलात गेलं तर काही तर लफडेबाज जीवन असेल आणि त्यामुळे त्याने आत्महत्या केली असेल,' असे वक्तव्य शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी केले आहे. आज सांगलीत त्यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी संभाजी भिडे यांनी राम मंदिर भूमिपूजन, कोरोना आणि सुशांत सिंह राजपूत प्रकरणावर भाष्य केले.
यावेळी संभाजी भिडे म्हणाले की, 'आज समाजाने आदर्श मानले आहे त्या सिनेमातील नट-नट्याची पात्रता काय? लायकी काय? त्यांची उंची काय? या नट नट्यांना आपल्या देशातील समाज मार्गदर्शक आणि दिशादर्शक म्हणून स्वीकारतो म्हणजे या देशाचे लवकरात लवकर वाटोळे होणार आहे', असे भिडे म्हणाले.
पुढे ते म्हणाले, 'सुशांत सिंह बद्दल बोलून आयुष्य वाया घालवणं चूकीच आहे, हे आपण करायला नको. सुशांत सिंह हा बेकार माणूस आहे, जर खोलात गेलं तर काही तर लफडेबाज जीवन असेल आणि त्यामुळे त्याने आत्महत्या केली असेल. दुर्दैव हे आहे की उगवता तरुण वर्ग हा नट आणि नट्यांच्या थिल्लर अत्यंत उथळ, टाकाऊ मार्गाचे आकर्षण घेऊन जगतोय, हे या देशाचे दुर्दैव आहे. आज देशाला भगवान श्री कृष्ण, प्रभू रामचंद्र, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्शाची गरज आहे. सुशांत हा लायकीचा पण माणूस नाही', अशी भूमिका संभाजी भिडे यांनी मांडली.
'भगवान रामाचा मिशा असलेला फोटो हवा'
यादरम्यान, राम मंदिर भूमिपूजनावर बोलताना संभाजी भिडे म्हणाले की, 'कोरोना आणि सोशल डिस्टन्सिंगमध्ये तथ्य नाही. देशातील नेत्यांनी घेतलेला लॉकडाऊनचा निर्णय चुकीचा आहे. 5 ऑगस्ट रोजी साधू संत, महंत, नेते हे अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी एकत्र येत आहेत. मांगल्याचा आनंदाचा सण आहे. हा दिवस देशभरातील हिंदूंनी दसरा आणि दिवाळी सारखा आनंद उत्सव करावा. यापुढे रामाचा फोटो, मूर्तीमध्ये मिशा असलेला असावा', अशी प्रतिक्रीया संभाजी भिडे यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.