आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:वसमत तालुक्यात 2.12 कोटी रुपयांचा वाळूसाठा जप्त, वसमत तहसीलच्या पथकाची कारवाई

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लिलावासाठी जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव सादर

वसमत तालुक्यातील वाळूघाटाच्या परिसरात ठेवलेला ४२४८ ब्रास वाळूसाठा तहसीलदार अरविंद बेळंगे यांच्या पथकाने जप्त केला आहे. बाजार किंमतीनुसार या वाळूची किंमत २.१२ कोटी रुपये एवढी आहे. सदर वाळूसाठ्याचा लिलाव करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.

वसमत तालुक्यात पुर्णा नदी व नाल्यातून वाळू उपसा केला जातो. या वाळूघाटांचा लिलाव झाल्यानंतर त्या ठिकाणावरून किती वाळू उपसा केला तसेच वाळू उपसा करून वाहतुकीची सर्व माहिती सादर करण्याच्या सुचना तहसीलदार अरविंद बेळंगे यांनी दिल्या होत्या. मात्र वाळू उपश्‍याचे कंत्राट घेणाऱ्या कंत्राटदारांनी याबाबत माहिती सादर केलीच नाही.

दरम्यान, वसमत तालुक्यातील सावंगी, परळी, माटेगाव व ढऊळगाव शिवारात मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा करून त्याचा साठा करून ठेवण्यात आल्याची माहिती तहसीलदार बेळंगे यांना मिळाली होती. त्यावरून जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, उपविभागीय अधिकारी प्रविण फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार बेळंगे, मंडळ अधिकारी किन्होळकर, गरूड, आहेरकर, मुसावळे यांच्या पथकाने शुक्रवारी ता. १८ या चारही ठिकाणी जाऊन पाहणी केली. यामध्ये मोठ्या प्रमाणात वाळूसाठा असल्याचे दिसून आले. या पथकाने माहिती घेतल्यानंतर तब्बल ४२४८ ब्रास वाळूसाठा असल्याचे स्पष्ट झाले. या पथकाने वाळूसाठा जप्त करून पंचनामा केला आहे. सदर वाळूसाठा शेतकऱ्यांच्या ताब्यात देण्यात आला अाहे.

दरम्यान, जप्त केलेल्या वाळू साठ्याची बाजारभावाची किंमत २.१२ कोटी रुपये असल्याचे तहसील कार्यालयाच्या सुत्रांनी सांगितले. तर सदर वाळूसाठा लिलाव करण्यास परवानगी देण्याचा प्रस्ताव तहसीलदार बेळंगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला आहे. वाळू लिलावाची परवानगी दिल्यानंतर तातडीने लिलाव केला जाणार असल्याचे तहसीलदार बेळंगे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...