आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
'भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील आंदोलनाची चेष्टा केलीये, पण 'गोध्राकांड' आंदोलनामुळेच मोदी-शहा आज दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचले आहेत, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार आणि 'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी केली आहे. याशिवाय, पंतप्रधानांनी वापरलेल्या 'आंदोलनजीवी' या शब्दावरुनही राऊतांनी त्यांच्यावर निशाणा साधला. 'आणीबाणीपासून अयोध्या आंदोलनापर्यंत आणि महागाईपासून काश्मीरातील 370 कलम हटवण्यापर्यंत भाजपने सतत आंदोलनेच केली,' असे राऊत म्हणाले.
'संसद मृतप्राय होत आहे'
संजय राऊत पुढे म्हणतात की, 'ज्या लोकशाहीतले रस्ते सुनसान असतात त्या देशाची संसद मृतप्राय होते, असे एक विधान राम मनोहर लोहिया यांनी केल्याचे आठवते. आज लोहियांचे बोल खरे होताना दिसत आहेत. संसद दिवसेंदिवस मृतप्राय होत आहे. कारण रस्ते सुनसान व्हावेत असे फर्मान पंतप्रधान मोदी यांनी काढले आहे. देशातील आंदोलने थांबवा. आंदोलने म्हणजे परकीय शक्तीचा कट. काही लोक फक्त आंदोलनांवरच जगत आहेत. 'आंदोलनजीवी' असा उल्लेख करून पंतप्रधानांनी रस्त्यावर उतरणाऱ्या कार्यकर्त्यांची थट्टा केली आहे. ही थट्टा फक्त गाझीपूरला तीन महिन्यांपासून कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची नाही, तर देशाचे स्वातंत्र्य आणि लोकशाहीचे मूल्य राखण्यासाठी दीडशे वर्षांपासून आंदोलन करणाऱ्या प्रत्येकाची थट्टा आहे,' अशी टीका राऊत यांनी केली.
गोध्राकांड आंदोलनातून मोदी हिंदूंचे महिसा बनले
राऊत पुढे म्हणतात की, 'पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह हे आज आंदोलनाची खिल्ली उडवतात; पण साबरमती एक्प्रेस जाळल्यावर जे भयंकर गोध्राकांड झाले, त्यातूनच मोदी हे हिंदू समाजाचे नवे मसिहा बनले. मोदी यांच्या दृष्टीने गोध्राकांड हे उत्स्फूर्त आंदोलनच होते. हे आंदोलन 'परजीवी' आहे असे तेव्हाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी म्हटलेले नाही. त्याच गोध्राकांड आंदोलनाने मोदी व शाहा यांना दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचवले.'
महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सगळ्यात मोठे "आंदोलनजीवी'
'दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचे आंदोलन शांत आणि सौम्य आहे. शिस्त पाळून आहे. हे आंदोलन कॉर्पोरेट व्यवस्था आणि भांडवलदारांच्या विरोधात असल्यामुळे शेतकऱ्यांना बदनाम केले जात आहे. ज्यांना आज शेतकऱ्यांचे आंदोलन नको आहे त्यांनी स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास तपासायला हवा. देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनात शेतकरी मोठ्या प्रमाणावर उतरला होता. गुजरातमध्ये वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभा केला आहे. ब्रिटिशांच्या विरोधात साराबंदी, बार्डोली सत्याग्रह शेतकऱ्यांनी केला व त्याचे नेतृत्व वल्लभभाई पटेलांनी केले. पटेलांचे फक्त पुतळे निर्माण करून काय होणार? कायदेभंग, परदेशी कापडाची होळी, चले जाव, मिठाचा सत्याग्रह अशा अनेक आंदोलनांनी गांधीजींनी देश एका झेंड्याखाली एकवटवला. गांधीजींची उपोषणे हेसुद्धा आंदोलनच होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याचे आंदोलन केले. अस्पृश्यांच्या अस्मितेसाठी लढा दिला. ते आंदोलन नव्हते तर दुसरे काय होते? महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सगळ्यात मोठे "आंदोलनजीवी'' होते', असेही राऊत म्हणाले.
अयोध्येत रामाचे मंदिर उभे राहात आहे ते शेकडो कारसेवकांच्या बलिदानातून
राऊत पुढे म्हणतात की, 'पंजाबमध्ये लाला लजपत राय हे शेतकऱ्यांचे नेते होते. ब्रिटिश लाठीमारात ते मरण पावले. महाराष्ट्रात वसंतदादा पाटील, किसन वीर, नाना पाटील ही शेतकऱ्यांची पोरेच लढा देत होती. बंगालात राजा राममोहन रॉय यांनी सामाजिक सुधारणांसाठी लढा दिला. सतीची चाल बंद करावी लागली, हे आंदोलनच होते. दिल्लीत निर्भया बलात्कार प्रकरण घडले तेव्हा दिल्लीच्या रस्त्यांवर आणि संसदेत आंदोलन करणारे भाजपचेच लोक होते. आता एखाद्या निर्भयावर अत्याचार झाला तर ‘हाथरस’प्रमाणे तिला अंधारात पोलिस गुपचूप जाळून टाकतील व त्या घटनेचे वार्तांकन करणाऱ्यांना देशद्रोही ठरवतील. अयोध्येत रामाचे मंदिर उभे राहात आहे ते शेकडो कारसेवकांच्या बलिदानातून. हे सर्व हुतात्मे परकीय हस्तक किंवा परजीवीच होते, असेच आता म्हणावे लागेल', असा टोलाही राऊत यांनी लगावला.
'...तर सावरकर परजीवी किंवा आंदोलनजीवी होते असे म्हणू नका'
'एकेकाळी काँग्रेस पक्षच एक आंदोलन होते. काँग्रेसचा इतिहास जितका आंदोलनाचा आणि संघर्षाचा आहे तितका तर भाजपचा नाही. स्वातंत्र्याच्या आंदोलनांत भाजप कुठेच नव्हता. वीर सावरकर यांचे स्वातंत्र्याचे आंदोलन सशस्त्र होते व त्याबद्दल त्यांना इंग्रज सरकारने 50 वर्षांच्या काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली. अंदमानातून सुटल्यावर सावरकरांनी अस्पृश्यता निर्मूलन, भाषाशुद्धीसारखी आंदोलने केली. वीर सावरकरांना भारतरत्न करण्यात आले नाही. निदान सावरकर परजीवी किंवा आंदोलनजीवी होते असे म्हणू नका', असेही राऊत म्हणाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.