आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामीण भागाचे हाल:सत्तारांनी विचारले : कर्ज मिळते? तलाठी भेटतात? शेतकरी : काहीही मदत होत नाही

धारणीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • माझा एक दिवस बळीराजासाठी अभियानात कृषिमंत्र्यांचा विदर्भ दौरा

कृषिमंत्री अब्दुल सत्तारांनी धारणी गावातील शेतकऱ्यांना विचारले की, तुम्हाला वेळेवर कर्ज मिळते का? तलाठी, ग्रामसेवक दररोज भेटतात का? नुकसान भरपाई वेळेवर मिळते का? त्यावर शेतकरी म्हणाले, सरकारकडून काहीही मदत होत नाही. रोजगार हमी योजनेचा कारभार कागदावरच चालतो, अशी तक्रारही त्यांनी केली. त्यावर थेट शेतात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणे, हा एक महत्त्वाचा अनुभव होता. शेतकऱ्यांचे दु:ख सोडवण्यासाठी कृषी धोरण आखताना मला याचा उपयोग होईल, असे सत्तार म्हणाले.

राज्यातील शेती व शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून उपाययोजना करण्यासाठी ‘कृषी अधिकारी ते कर्मचारी माझा एक दिवस बळीराजासाठी’ अभियान राबवण्यात येत आहे. त्याची सुरुवात १ सप्टेंबर रोजी कृषिमंत्र्यांनी मेळघाटातील धारणी गावापासून केली. त्यासाठी ते बुधवारीच गावात शेतकऱ्याच्या घरी मुक्कामी गेले होते. गुरुवारी सकाळी त्यांनी शेतकऱ्यांना तुम्ही नेमकी कोणकोणती पिके घेता, असा पहिला प्रश्न विचारला. तेव्हा तांदूळ, ज्वारी, उडीद, मका, सोयाबीन असे उत्तर मिळाले. मग त्यांनी कृषी खात्याकडून तुम्हाला या भागात शासकीय योजनेचा लाभ मिळतो का? वेळेवर पीक कर्ज अथवा नुकसान भरपाई मिळते का? प्रति व्यक्तीमागे किती मजुरी मिळते? त्यातून तुमच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह नेमका कसा चालतो? सावकारी कर्ज घेता का? शेती गहाण ठेवता का? तलाठी, ग्रामसेवक गावात येतात का? गावात किती दिवस दिसतात, असे प्रश्न विचारून उत्तरे जाणून घेतली. आमच्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत, असेही विचारले. साद्रावाडीतील शेतकरी म्हणाले की, आमची शेतजमीन जंगल परिसरात मोडते. त्यामुळे शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही. जमीन मशागतीपासून पीक घरी येईपर्यंत शेतमजुरीचा रोजगार फक्त १०० दिवसांचाच असतो. २६५ दिवस पुरेसा रोजगार नाही. हमी योजना कागदोपत्रीच दाखवण्यात येते. या वेळी सत्तारांसोबत खासगी सचिव नरेंद्र कुलकर्णी, विशेष कार्यासन अधिकारी प्रशांत ठाकरे, रत्नाकर पगार, कृषी सहसंचालक किसन मुळे, विभागीय कृषी अधीक्षक अनिल खर्चान आदी उपस्थित होते.

औरंगाबादेतील ३०० गावे या अभियानात औरंगाबाद जिल्ह्यातील तीनशे कोरडवाहू गावांमधील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी काय करणे गरजेचे आहे, याबाबत नोंद घेऊन सरकारला कळवले जाणार आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...